टर्मिनस- अस्वस्थ करणार्‍या ताज्या गूढकथा

मराठी ललित साहित्याला विशेषत: कथा-कादंबर्‍यांच्या प्रांतात थोडी मरगळ आलेली आहे की काय अशी वाटणारी आजची परिस्थिती.  त्यातच गूढकथा-विज्ञानकथा आदी आधीच दुर्लक्षित  साहित्यप्रकारांमध्ये लेखणी आजमावणारे नवोदित लेखक सापडणं दुर्मिळच. अशा काळात  अभिषेक अनिल वाघमारे या नवोदित लेखकाने आपल्या टर्मिनस या पहिल्याच कथासंग्रहाद्वारे गूढकथांच्या या प्रांतात दमदार पाऊल टाकले आहे.
      हा कथासंग्रह छोटेखानीच असला तरी त्यातील एकंदर दहा कथा या परस्परांपासून वेगळ्या आहेत. येथे सरसकट सगळ्या कथांना गूढकथा जरी म्हटलं असलं तरी त्या रूढार्थाने तशा नाहीत.  उदा. सर्किट व पाऊलखुणा या विज्ञानकथा या सदरातही मोडू शकतात. तर, ऑब्जेक्ट्स इन द मिरर...’, खोळ यासारख्या कथांना एक सामाजिक अंग देखील आहे. चूक ?’ आणि टर्मिनस या कथा तत्वज्ञानाचे चिंतन करणार्‍या आहेत तर सुरकुत्या’,  काचेचे ग्लास या कथा कुटुंबकथेच्या वाटेने जाणार्‍या गूढकथा आहेत.

      शैलीदार लेखन कमी झाल्याच्या काळात वाघमारे स्वत:ची वेगळी शैली निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. मांडणीतील सुटसुटीतपणा, एक मिष्किल विनोदाचा अंडरकरंट ,मध्येच पेरलेली चमकदार वाक्ये उदा. गरज ही गरज असावी, तिला भावनेची फोडणी दिली म्हणजे दोन्ही नासतात’; लुगडं काही विटत नाही अन् जीव काही आटत नाही’; सवय कुणाला गुलाम करून घेताना काही भेदभाव करत नाही इ. अशी एक नवीनच शैली लेखकाने आपल्यासमोर मांडली आहे.  कथाविषयांची निवड व त्याला सुसंगत निवेदन , विषयापासून न भरकटण्याची हातोटी, आवश्यक तेथे धक्कातंत्र, निरीक्षणातून आलेली चित्रमय मांडणी आदी वैशिष्ट्यांमुळे या कथा वाचकाला बांधून ठेवण्यात यशस्वी होतात. बर्‍याच कथांचे शेवट हे लेखकाने  स्वत: स्पष्ट न करता  वाचकांवर सोपवल्यामुळे कथा एक वेगळी पातळी गाठतात उदा. शोध पाउलखुणा , चूक ?’ इ.

काही कथांमधून लेखकाचे नवखेपण जाणवत असले तरी एकंदर कथाकथन व लेखनाच्या तंत्राशी लेखकाचा चांगला परिचय आहे हे जाणवते. त्यामुळे कथेच्या गरजेप्रमाणे लेखक भाषेला वळवताना दिसतो.  उदा. चूक?’ व टर्मिनस यासारख्या तत्वज्ञानप्रधान कथांची थोडीशी जड वाटणारी भाषा जी.ए. कुलकर्णींची आठवण करून देते तर ऑब्जेक्टस इन द मिरर व सर्किट या कथांमधून आधुनिक जगाची भाषा लेखकाने वापरली आहे.

या संग्रहातील काही कथा या यापूर्वी काही नियतकालिके उदा. नागपूर तरूण भारत व काही दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे शब्दसंख्येवर आलेली बंधने काही ठिकाणी जाणवतात. म्हणूनच कदाचित या लघुकथा असल्या तरी कथांची लांबी एक सारखी नाही. पण त्यामुळे कथाविष्कारात फारसा फरक पडतो असे वाटत नाही. लेखकाचे हे पहिलेच पुस्तक असले तरीही पुस्तकाला लेखकाची स्वत:ची किंवा कुण्या ज्येष्ठ साहित्यिकाची आशीर्वादपर प्रस्तावना नाही हे आजच्या स्वस्तुतीमग्न लेखकांच्या युगात उल्लेखनीय म्हणावे लागेल. जोडीला राज जैन यांचं मुखपृष्ठही पूरक व लक्षवेधी आहे.  मुद्रितशोधनात मात्र अजून परिश्रम घेण्याची गरज होती.

आज दूरचित्रवाणी, चित्रपट, साहित्य याद्वारे सर्वत्र सोपं, पचायला हलकं असंच आपल्या पानात वाढण्यात येत असताना अभिषेक वाघमारेंचं हे थोडं गंभीर , वाचकाला थोडं विचार करायला लावणारं तरीही रंजक असं लेखन नक्कीच वाचनीय झालं आहे. बौद्धिक रंजनाच्या शोधात असणार्‍या चोखंदळ वाचकांनी तर नक्कीच वाचावं असं हे पुस्तक. आपल्या या दमदार आगमनाने अभिषेक वाघमारेंनी यापुढे वाचकांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढवल्या आहेत हे नक्की. 


पुस्तकाचे शीर्षक: टर्मिनस
लेखक: अभिषेक वाघमारे
पृष्ठसंख्या: ८८
किंमत: रू. १००/-


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!