जन्म शाळेचा

परीक्षा तुझ्यासारख्या पोरांनी द्यायच्या नसतात. तुमची औकात तरी आहे काय रे शाळेत शिकायची. म्हणे परीक्षेला का बसून देत नाहीत.” एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक आपल्या शाळेतील विद्यार्थ्याला झापत होते.
“पुन मना ६० % परल्न मागचे सामाईन” तो विद्यार्थी खाली मान घालून आपल्या सरांना आपली योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करत होता.
“तुझ्या बापाला येऊन भेटायला सांग, त्याला सांगतो मी तुला किती मार्क पडलेत ते.....” इति मुख्याध्यापक
*******************

“मास्तर येऊ का?” एक शेतकरी वेशातील माणूस उभा होता.
“कोण रे तू ?” मुख्याध्यापक गरजले
“मी ते बोकडवीरा गावांशी पाटील, पोराला काल निरोप दिल्ताव म्हन्गुन आलतू” तो शेतकरी म्हणाला
“हं..” एखाद्या तुच्छ किड्याबरोबर बोलावे तसे ते मुख्याध्यापक बोलत होते. “तुझ्या पोराला परीक्षा द्यायची आहे तेव्हा 2 पोती तांदळाची माझ्या घरी पाठवून दे, तर तुझ्या पोराला परीक्षा देता येईल, नाहीतर नाही समजल?”
“बर मास्तर, देतो पाठवून” आपल्या पोराच्या भविष्यासाठी कोणताही वादविवाद न करता त्याने ते कबुल केले.
त्याच शेतकऱ्याची नाही तर संपूर्ण महालणातल्या (महालण तालुक्यातील १२ गाव म्हणजे एक महालण) घराघरात हीच परिस्थिती होती. ह्या महालणाचा एकाच देव तो म्हणजे वाजेकर शेठ.

*****************************

सगळे शेतकरी वाजेकर शेठला भेटायला आले “शेट, कयतरी करा तो किंद्रे मास्तर आपले पोरांना परीक्षा नय देऊन देय, कोणाला ४ पोती, कोणाला ३ पोती, २ पोती अस चावूल त्याचे घरा पोचवला सांगतय, अस चावूल दिला तर खावाच काय? आणि दिलं नय तर पोरांना शिकू नय देवाचा तो.......
हाच तो क्षण जिथे महालण हायस्कूल म्हणजेच तू. ह. वाजेकर हायस्कूल चा जन्म झाला.....

*****************

वाजेकर शेठ घरी आले आणि आपल्या जावयाला भेटले व सगळी कथा सांगितल्यावर विचारले “जनार्दन, कस करायचं रे पोरांचं भविष्य टांगणीला आहे. काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. तू पोरांना शिकवू शकतोस का?”
“शिकवायला मी शिकवेन पण शाळा सुरु कशी करायची?” जनार्दनने आपल्या सासऱ्याना प्रतिप्रश्न केला.
“त्याची चिंता तू नको करू मी माझ्या ओळखी वापरतो. त्यावेळी वाजेकर शेतकरी कामगार पक्षात होते आणि एन. डी. पाटील (रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत) हे हि शेतकरी कामगार पक्षात होते. त्यामुळे त्यांनी वाजेकर व रयत शिक्षण संस्था सातारा यांचा संवाद घडवून आणला व येथे उरण येथे गरीब मुलांसाठी शाळा काढावी हि विनंती केली. ती विनंती लगेच मान्य झाली. तुम्ही जागा द्या आम्ही लगेच शाळा काढतो. म्हणून वाजेकरांकडे निरोप आला.

*****************

MSEB (त्यावेळी MSEBच होते आता ते maha-GENCO म्हणून ओळखले जाते) बोकडवीरा चे पदाधिकारी “नमस्कार पाटील साहेब, तुमचे नवीन घर पूर्ण झाल्याचे कळले, एक काम होते. आपल्याला MSEB साठी ऑफिस करायचे होते. तुम्ही तसंही मुंबईला राहता तेव्हा गावाचे घर भाड्याने दिलेत तर बरे होईल.... आम्ही महिना ३०००/- भाडे देऊ (१९६३ साली MSEB ने हि रक्कम ऑफर केली होती.) किमान 2 ते ३ वर्षासाठी हवे आहे  तोपर्यंत MSEBची इमारत तयार होईल, भाडे वाढवून हवे असेल तर ६ महिन्याने वाढवू आपण, बघा विचार करा.”
“भाडे ठीक आहे पण मला येथे महालणातल्या मुलांसाठी शाळा चालू करायची आहे, त्यामुळे मी तुम्हाला जागा देऊ शकत नाही असे स्पष्टपणे सांगून ती ऑफर नाकारली.

आणि ६ जून १९६४ साली इयत्ता आठवीचा वर्ग सुरु करून महालण सभा विद्यालयाच्या शुभारंभाचा श्रीफळ वाजेकरांच्या हस्ते श्री जनार्दन पाटील बोकडवीर यांच्या घरी फोडला गेला व शाळा सुरु झाली. आणि किंद्रे मास्तरांच्या जाचातून मुलांची सुटका झाली. गावात ७ वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा होती तेव्हा त्यामुळे आठवीचा वर्ग सुरु केला गेला. पुढे पुढच्या वर्षी ९ वी चा वर्ग गावाच्या देवळात भरला परंतु दहावीचा वर्ग कुठे भरवणार ह्या प्रश्नाने डोक वर काढायला सुरुवात केली.

एका मोठ्या जागेचा शोध सुरु झाला आणि ह्या १२ गावातील ‘फुंडे’ या गावाने हा प्रश्न आपली जमीन शाळेसाठी दान देऊन सोडवला. पण बांधकाम करायचे म्हणून कामावर जाणाऱ्या प्रत्येकाला शाळेच्या कामासाठी श्रमदान करणे सक्तीचे केले. तसेच पैसे उभे करण्यासाठी कार्यक्रम केले जायचे त्यासाठी तिकीट हि प्रत्येकाला सक्तीची केले होते.

पैसे उभे करण्यासाठी वाजेकर मोठ्या लोकांना जाऊन भेटायचे व त्यांचे कार्यक्रम ठरवायचे यातच संगीतकार कल्याणजी आनंदजी यांचाही कार्यक्रम झाला. प्र. के. अत्रेंनी तर आपले नाटकाचे प्रयोग करण्याची परवानगी दिली व मला कोणतेही मानधन देऊ नका गरज नाही ते पैसे शाळेसाठी वापरा म्हणून सांगितले. अशा प्रकारे 10 वीचा वर्ग आला तेव्हा तेथे ३ खोल्या उभारल्या गेल्या होत्या व हळू हळू शाळा आणि तिची इमारत वाढवली गेली.

१९८१ साली वाजेकर गेल्यावर त्या शाळेला नाव “तू. ह वाजेकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे” असे नामकरण करण्यात आले. मी स्वत ह्याच शाळेत शिकले आम्ही जेव्हा या शाळेत शिकायला गेलो. तेव्हा कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय हि सुरु झाले होते. आज ह्या शाळेत तुम्ही ५ वी साठी प्रवेश घेतला तर किमान कला, विज्ञान, वाणिज्य या डिग्री पर्यंत  शिक्षण घेता येते. आज या शाळेला 50 वर्ष पूर्ण झालीत (१९६४ ते २०१४).

मी गर्वाने सांगू शकते कि ज्या जनार्दन पाटीलांच्या घराचा उल्लेख झाला ते माझ घर आहे त्या घरात माझे सगळ बालपण गेल. ते जनार्दन पाटील माझे आजोबा आणि तू. ह. वाजेकर माझे पणजोबा आहेत. तुम्हा दोघांना हि धन्यवाद तुम्ही शिक्षक नाही झालात पण महालणातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक मिळवून दिलेत. फुंडे ग्रामस्थांनी कोणताही मोबदला न घेता जमीन दान दिली आज त्या जमिनीची किंमत काही कोटी रुपयात आहेत. तुमचे उपकार विसरता येणार नाही तुम्ही नसतात तर आजही कुठल्यातरी शाळेचा मुख्याध्यापक आमची औकात काढत असता आम्ही आम्ही खाली मान घालून उभे राहून ऐकत असतो.






Comments

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!