Friday, October 18, 2013

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पुस्तक: 
चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद
लेखक: 
मारुती चित्तमपल्ली
प्रकाशक: 
मौज प्रकाशन गृह 

परवाच अमेयदाना काही पुस्तके पाठवली त्यात मारुती चित्तमपल्ली चकवाचांदण हि होते, पुस्तके मिळताच त्यांनी चकवाचांदण बरेच दिवस शोधात होतो आता मिळाले अशा आशयाची पोस्ट फेसबुक वर टाकली त्यावेळी सर्वांचे लाडके मामाश्री व अमेयदा यांच्याशी झालेल्या बोलण्यामुळे वाटून गेले कि आपण चकवाचांदण वर लिहावे खरे तर मी खूप आधी हे पुस्तक वाचले होते, त्यावर लिहूनही ठेवले होते पण ते प्रकाशित केले नव्हते J आज अमेयदामुळे ती जुनी वही काढून लिहिते आहे......

पुस्तक वाचन म्हणजे एक व्यसनच असत. त्याच व्यसनामुळे आजपर्यंत बरीच पुस्तके वाचनात आली, त्यातली काही मनाला भावली, काहींनी तर मनात घरच करून ठेवले, अशाच काही पुस्तकांपैकी एक पुस्तक म्हणजे “चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद”. हे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा वाटले होते कि त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे वन्यजीवनावर आधारित असेल पण वाचताना हळू हळू लक्षात येऊ लागले कि  हे पुस्तक म्हणजे चितमपल्ली याचं आत्मकथन आहे.


ह्या पुस्तकात पहिल्या १२३ पानापर्यंत त्यांच्या घराची माहिती त्यांनी दिली आहे. सोलापूर आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी सरधोपट वाटा न चोखाळता सरळ कोइम्बतुर येथील  State Forest Service College ला अ‍ॅडमिशन घेतले व वनाधिकारी झाले.

 

वनाधिकारी असलेले मारुती चित्तमपल्ली हे एक उत्तम लेखक हि आहेत. भारतीय वन आणि वन्य जीवनामध्ये जेवढी विविधता आढळून येते तशी जगाच्या पाठीवर अन्य कुठेही आढळून येत नाही, हे आपल्या लेखनाने त्याने दाखवून दिलेले आहे. ह्या जंगलांच्या वाटेवरच त्यांचे अनुभव विश्व आधारलेले आहे. ते नांदेड येते वन अधिकारी असताना, त्यांना कळले कि काही पक्ष्यांची महिती हि संस्कॄत मधे उपलब्ध असल्याने त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी ते वयाच्या ३५ व्या वर्षी शिकवणीला जात होते.


असे हे मारुती चित्तमपल्ली  वनाधिकारी असताना त्यांना भारताला विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली तमिळ नाडू ,कोडाई,कर्नाटक,बँगलोर, महाराष्ट्रातील महाबळेश्वर वडगाव, नांदेड, इसालापूर, बोटा, राजूर, पनवेल, पुणे, कर्नाळा, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी त्यांनी काम केल...प्रत्येक ठिकाणी आदिवासी त्यांच्या भाषा राहणीमान, खान पिन, याविषयी नोंदी केल्या. काही ठिकाणी खूप त्रास झाला कारण आदिवासींची भाषाच समाजत नव्हती...आदिवासी फोरेस्ट officers ना खूप घाबरतात हे नव्यानेच कळल...एरवी जंगलात राहणारी हि जात वनाधिका‌‌‍र्‍यांना का घाबरते याच कारणही दिल आहे..शिकारीवर घातलेले निर्बंध,वनातला प्रदेश शेतीखाली आणू नये याचे निर्बंध यामुळे ते गरीब लोक घाबरतात... त्यांच्या राहाणिमानाच अतिशय सुंदर वर्णन या पुस्तकात केल आहे. 


चित्रकार आलमेलकर, पु.ल.देशपांडे, बाबा आमटे, साधना ताई, व्यंकटेश माडगुळकर, गो.नि.दांडेकर, जि.ए.कुलकर्णी, सलिम अलि यांच्यासोबत घालवलेल्या मह्त्वपूर्ण क्षणांच वर्णनही दिल आहे.

 

हे पुस्तक हातात घेतल्यावर पुस्तकाची खटकणारी गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेल घुबडाच चित्र पाहिलं कि पहिला प्रश्न आपल्या मनात येतो तो म्हणजे चकवाचांदण इतका सुंदर काव्यमय नाव आणि चित्र घुबडाच ? पण लेखकाने या प्रश्नाला खरच खूप छान उत्तर दिलय. रानावनात राहणारे पारधी, आदिवासी घुबडाला 'चकवाचांदणं ' म्हणतात. ज्या घुबडाला आपण अशुभ मानतो त्याच नाव इतका काव्यमय असू शकत? म्हणून लेखकाने ह्या गोष्टीचा अर्थ पारध्यांना विचारला असता, तेव्हा पारध्यांनी सांगितले कि  हा अभद्र पक्षी सांजेच्या वेळी ओरडून त्यांची दिशाभूल करतो व त्यांना चकवा लागतो. अशावेळी हे पारधी-आदिवासी  जंगलात जिथे असतील तिथेच  बसून राहतात. पण अभाळात शुक्राची चांदणी दिसू लागताच हा चकवा निघून जातो आणि त्यांना त्यांची वाट सापडते, म्हणून घुबडाला ते 'चकवा चांदण' अस म्हणतात.

 

चित्तमपल्ली यांना हे नाव फार भावले व ते त्यांच्या जीवनप्रवासाप्रमाणे होते. त्यामुळे ज्यांनी रानातला संधिप्रकाश व घुबडाचे ओरडणे ऐकले त्यांना या नावाची प्रचीती नक्की येईल. पुन्हा पुन्हा वाचावे असे हे पुस्तक आहे.  पुस्तकाची किमत थोडी जास्त वाटू शकते पण पुस्तक वाचल्यावर आपल्या विचारातील (किमतीचा) ठीतेपणा जाणवतो.सर्वच वयातील वाचकांनी वाचावे असे आणि आपल्या संग्रहात असावे असे हे पुस्तक तुम्हालाही नक्कीच आवडेल अशी अशा करते...


~●๋•Nivedita Patil - Jain ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Thursday, August 29, 2013

गोविंदा

आज घराची फार आठवण झाली, घराशेजारी गणपतीचे मंदिर आहे माझ्या बेडरूम ची खिडकी उघडली कि देवळाचा कळस दिसायचा.  गणेश जन्मापासून ते एकादशी पर्यंत सगळे उत्सव साजरे होतात, जन्माष्टमी म्हटली कि रात्री १० नंतर देवळात कीर्तनाला सुरुवात व्हायची ( जन्म रात्री १२चा असल्याने सगळे आवरून कीर्तनाला सुरुवात करायचे)

नेहमीची श्रीकृष्ण जन्मकथा अगदी रंगवून सांगितली जायची दरवर्षी नवीन कीर्तनकार असायचे प्रत्येकाची सादरीकरणाची पद्धत वेगळी असायची, रात्री कीर्तन म्हटल्यावर वैताग यायचा कारण हे १ वाजेपर्यंत कीर्तन करणार मग झोपेचे खोबरे दुसर्या दिवशी श्रीकृष्णाची पालखी आणि संध्याकाळी band च्या गजरात दही हंडी फोडली जायची.

त्यावेळी त्या कीर्तनाचा त्रास व्हायचा, काय हे रात्री कीर्तन करत बसतात शांतपणे साजरा नाही का करू शकत ;पण आज हे जाणवते आहे कि देवळातले कीर्तन किती शांत आणि संस्कार घडवणारे होते,  कीर्तनातून सांगितली जाणारी श्रीकृष्ण जन्मकथा प्रत्येकवेळी काहीतरी नवीन विचार शिकवणारी होती. आणि आज शिकणे सोडून द्या; ह्या दणदणाटा पुढे साधा विचार हि करता येत नाही, कसलीतरी फालतू गाणी आणि गोंगाट हेच स्वरूप झाले आहे... त्यापेक्षा आमचा गाव बरा होता  


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, August 20, 2013

PMPL - एक अनुभव

आज मुंबईला जायचे म्हणून सकाळी नऱ्हेगाव ते स्वारगेट एसटी पकडली जाता जाता सारसबागेतील गणपतीचे दर्शन घेऊ म्हणून उतरले तर लक्षात आले कि बस मध्ये पर्स पडली  ( जन्माने वेंधळी असल्यामुळे असे छोटे - छोटे पराक्रम मी करत असते ) आता ती बस गाठणे आले, बस स्वारगेट बस stop पाशी वळसा घालून येणार तो पर्यंत पर्स हरवली तर म्हणून मी धाव ठोकली आणि सरळ रस्त्याने बस च्या आधीच तिकडे जाऊन पोहोचली ( असे मला वाटले ) पण वळसा घालून पण बस आधी पोहोचली होती. मी आपली तिथे उपस्थित असलेल्या कंडक्टर काकांना माझी व्यथा सांगितली त्यांनी ती बस मला दाखवली " आताच बस आली आहे" इति कंडक्टर काका.

मी पळत ती बस गाठली तर माझी पर्स सिट खाली आरामात विसावली होती मी ती उचलली व समस्त कंडक्टर/ driver काकांचे आभार मानले (इथे माझ्यापेक्षा माझी पर्स मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत होता.) पर्स मधील काही हरवले नव्हते. 

मी पर्स मिळाली त्या आनंदात सारस बाग गणपतीचे दर्शन घेतले व प्रसाद मात्र समस्त कंडक्टर/ driver काकांना वाटून टाकला

तेव्हा त्यातले एक काका म्हणाले " आपल्या बसेस लय भारी आहेत, कुठे काय पडलेले असेल ते दिसत नाही" त्या विनोदावर सगळेच हसलो आम्ही!!




~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, July 29, 2013

सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ 8

मागील भाग
२०१० जुलै मध्ये " सन १८५७ च्या वीर महिला" हि मालिका लिहायला सुरुवात केली आजही ती अपूर्ण आहे. आज त्यात एका नावाची भर पडली आहे ते नाव म्हणजे "राणी द्रोपदी बाई"!! राणी द्रौपदी म्हटले कि आपल्याला महाभारत आठवते पण हा लेख वाचाल्यावर तुम्हा महाभारता बरोबर १८५७ चे स्वातंत्र्यसमर हि आठवेल. २२ मे १८५७ ते ३० ऑक्टोबर १८५७ ह्या ५ ते ६ महिन्याच्या काळात ह्या राणीने ब्रिटिशानां घाम फोडला होता!!!
धारच पुर्वैतिहास

धार हे १८५७ च्या युद्धातले एक महत्वपूर्ण ठाणे होतं. २२ जुलै १७३२ रोजी थोरल्या बाजीराव पेशव्याने आनंदराव पवाराला धार आणि आसपासच्या परगण्यांचा हक्क दिला. त्यातून संस्थानाचा उगम झाला. मराठ्यात महत्वाच्या ठरलेल्या शिंदे- होळकर- पवार ह्या त्रयी पैकी हे पवारांच घराणे.

स. १८१७ त इंग्रज जेव्हां पेंढाऱ्याच्या उच्छेदाकरितां माळव्यांत शिरले तेव्हां पवारांच्या ताब्यांत केवळ धार शहरच होतें पुढें इंग्रजांचा व धारकर यांचा तह होऊन इंग्रजांनीं राज्याचें रक्षण करण्याचें काम पत्करून ३५ हजार वसुलाचा मुलुखहि मिळवून दिला. त्यानंतर १८१९ मध्ये भिल्ल पलटणी ठेवायची इच्छा इंग्रजांची नसली तरी धार हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आजूबाजूचा परिसर सहज हाताखाली येईल म्हणून ह्या पलटणीला मान्यता दिली व माळवा भिल्ल पलटणी साठी संस्थानाने सालिना सु. ६००० रु. द्यावे असे ठरले. काळ पुढे सरकत गेला परंतु पवारांची सत्ता कायम धार नगरीवर राहिली.

१८२२ च्या सुमारास राजे यशवंतराव(II) पवार यांचा जन्म झाला व ते धार नगरीचे ८ वे राजे म्हणून १८३३ साली गादीवर आले. त्यांचा विवाह द्रौपदी बाईसाहेबांसोबत झाला.

१८५७ ची पार्श्वभूमी

राजा यशवंतराव(II) पवार आजारी पडले. आपल्याला वारस नसल्याने हि गादी इंग्रजांच्या हाती जाईल कि काय ह्याची भीती त्यांना लागून राहिली होती. म्हणून त्यांनी आपल्या नात्यातल्या एका मुलाला २० मे १८५७ रोजी दत्तक घेतले होते. त्यांचे नाव आनंदराव(III) पवार त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे २२ मे १८५७ राजा यशवंतराव(II) पवार यांचा मृत्यू झाला. ह्या वेळी इंग्रजांनी इतर संस्थानाप्रमाणे न वागता आनंदराव(III) पवार यांच्या दत्तक विधानाला मंजुरी दिली व त्यांचा राज्याभिषेक करून, आनंदराव(III) अल्पवयीन असल्याने कारभाराची सूत्रे महाराणी दौपदी बाईसाहेबांनी आपल्या हातात दिली.

संग्रामात उडी

आपण दत्तक विधानास मान्यता दिली असता राणी आपल्या विरोधात जाणार नाही असा कयास होता. परंतु राणीने ब्रिटीशांची चाल ओळखून त्याच्याबरोबर मैत्री करण्याएवजी क्रांतीकारकांशी सख्य केले. ह्याच वेळी ग्वाल्हेर हे शिंद्याचे संस्थान होते व ते झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब ह्याना मदत करेल तेव्हा त्या भागात ब्रिटिशांनी तेथील पहारा मजबूत केला. व राणी लक्ष्मीबाई व नानासाहेब ह्याना तेथून काढता पाय घ्यावा लागला होता अशा वेळी त्यांना आश्रय मिळाला तो धार च्या किल्ल्यात त्याच बरोबर गुलखान, बादशाह खान, सआदत खान हे क्रांतिकारी हि धार च्या किल्ल्यात आश्रयाला होते. आपल्यातल्याच फितुरीमुळे राणीचे हे वागणे ब्रिटीशांना कळाले. Caption Hutchinson ला हि बातमी कळाली व त्याने कर्नल ड़्यूरेन्ड़ ला ह्या बातमीचा रिपोर्ट केला.

कर्नल ड़्यूरेन्ड़ ला आधीच हे दत्तक विधान नामंजूर होते. त्याला हे संस्थान खालसा करावयाचे होते पण लॉर्ड डलहौसी मुळे काही करता आले नव्हते. त्यामुळे त्याने हि बातमी हाती लागताच त्याने जुलै १८५७ मधेय धार नगरीवर हल्ला केला. राणीने आपल्या भिल्ल पलटणीच्या मदतीने त्यांना थोपवून धरले.

संग्राम आणि शेवट

राणीने आधी सर्व क्रांतीकारकांची व्यवस्था लावली त्यांना किल्ल्याच्या आत असलेल्या गुप्त मार्गाने बाहेर काढले. व स्वत: इंग्रजांशी टक्कर देत बसली. परंतु सैनिक कमी त्यात माजलेली फितुरी. ह्यामुळे राणीची पीछेहाट होऊ लागली.

ब्रिटीशांनी धार किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर ताब्यात घेतला होता. ऑक्टोबर १८५७ च्या सुरुवातीस दीवाण रामचंद्र बापूनां बंदी बनवले. त्यांना वाटले होते बापुंकडून काही माहिती मिळेल. परंतु बापू फुटले नाहीत ब्रिटीशांनी त्यांचे हाल – हाल करून मारले. १५ ऑक्टोबर १८५७ रोजी किल्ल्याला वेढा पडला. राणी व तिच्या सहकार्यांनी अफाट चिकाटी दाखवली किल्ल्याचा आजूबाजूचा प्रदेश ब्रिटीशांच्या ताब्यात गेल्यामुळे किल्ल्याला बाहेरून मिळणारी रसद बंद झाली, त्यातच रामचंद्र बापू यांचे पकडले जाणे, किल्ल्यात असलेल्या रसदेपैकी अर्धी रसद क्रांतीकारकांना पुढच्या प्रवासाला उपयोगी पडेल म्हणून सोबत दिलेली, अशाही स्थितीत राणीने आपल्या २००० च्या भिल्ल पलटणी सोबत किल्ला झुंजत ठेवला होता. १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर घमासान युद्ध झाले.

ब्रिटीशांच्या तोफांमुळे किल्ल्याच्या भिंतीना खिंडारे पडू लागली. त्यामुळे राणीने एका रात्रीत किल्ला सोडण्याच्या निर्णय घेतला. किल्ल्याला असलेल्या गुप्तद्वारातून ती आपल्या सैन्यासह बाहेर पडली. तिने बाजूच्या जंगलांचा आधार घ्यायचे ठरवले. ३१ ऑक्टोबर १८५७ ला ब्रिटीश सैन्य किल्ल्यात घुसले तेव्हा त्यांना राणी हाती लागली नाही.

त्यानंतर राणीची शोध मोहीम हाती घेण्यात आली. पाठीवर ब्रिटीश सैन्य खेळवत राणी जंगलातून जात होती जोडीला १३ वर्षाचे आनंदराव(III) पवार होते. आनंदरावांची व्यवस्था ग्वाल्हेर येथे केली व राणी पुन्हा एकदा ब्रिटीशांना टक्कर द्यायला मोकळी झाली. राणी स्वत: बेघर होऊनही जमेल तशी मदत क्रांतिकारकांना करत होती. शेवटी ती एकटी असताना आपण ब्रिटीशांच्या हातात सापडू नये म्हणून तिने स्वत:च तलवारीने आपले आयुष्य संपवले. तिच्याच भिल्ल पलटणीने तिचे अंतिम संस्कार केले.

नवा डाव

1860 साली पुन्हा एकदा आनंदराव(III) पवार यांचा राज्याभिषेक झाला व ते अल्पवयीन असल्याने त्यांच्या वतीने ब्रिटीश कौन्सिल राज्यकारभार बघत होती. आणि ते कुणी क्रांतिकारी असेल तर त्याला मदत करीत असत तेही ब्रिटीशांच्या नकळत.

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐