अमू...........


चित्रपटाचे नाव : अमू

वर्ष : 7 January 2005

संगीतकार : नंदलाल नायक 

दिग्दर्शक: शोनाली बोस

कथाकार / लेखक: शोनाली बोस

कलाकार: कोंकणा सेनशर्मा, वृंदा करट , अंकुर खन्ना 

 रक्षाबंधनाच्या वेळी घरी असताना डिश टीव्ही बंद असल्याने असल्याने सीडीज किंवा डीव्हीडीज लावून चित्रपट पाहणे हा उद्योग चालू असे. अशातच अमू हा चित्रपट पाहिला आणि सुन्न झाले. अवघ्या १ तास ४२ मिनिटात हा चित्रपट संपतो पण आपला ठसा मागे ठेवूनच, आणि याचे श्रेय जाते ते चित्रपटाची दिग्दर्शिका शोनाली बोस हिला.

राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी जातीवरून, धर्मावरून लोकांना चिथवतात, आपल्या हातातील माणसाकडून हत्या घडवून आणतात आणि माथी भडकावली जातात. मग माणूस बेभान होऊन आपल्याच माणसाचि कत्तल करत फिरतो; आपल्या देशावर तर हे संकट अनेकदा कोसळले आहे.

“अमू” चे कथानक यावरच आहे, पण “अमू” ह्या पलीकडे जाऊन विचार करायला लावतो. जाती व धर्माच्या नावाखाली जेव्हा दंगली तेव्हा हजारो निरपराध लोक ठार होतात, लाखोंचे संसार उद्ध्वस्त होतात आपण ह्या घटना बातम्या म्हणून पहातो, ऐकतो, वाचतो आपल्या जिवंतपणाचे द्योतक म्हणून क्षणभर तीव्र दुख: व संताप व्यक्त करत तावातावाने चर्चा देखील करतो; पण ते तेवढ्यापुरतेच. पण ज्यांनी हे संकट सोसले, भोगले त्यांचे काय, त्यांच्या पुढच्या पिढीचे काय होत असेल. आपल्या सारख साध सरळमार्गी जीवन त्यांच्या नशिबात येत का? त्यांचा भूतकाळ त्यांना स्वस्थ बसू देतो? त्यांची हतबलता अगतिकता ह्या सारख्या बऱ्याच गोष्टींसाठी “अमू” पहावा.

ह्या सिनेमाची सुरवात होते ती २००२ सालात जिथे एक मुलगी नुकतीच अमेरिकेवरून आली आहे आणि आपल्या मामा मामी सोबत नवी दिल्ली फिरायला बाहेर पडली आहे.याच फिरण्यात शोनाली बोस ने तिचा अमेरिकेत असणारया आई बरोबरचा संवाद पण दाखवला आहे. असेच एके दिवशी ही नायिका आपल्या कझिन बरोबर एका पार्टीला जाते. येथे तिची ओळख कबीर म्हणजेच कथानायकसोबत होते तिथेच ती आपली ओळख करून देते “मै काजोरी रॉय!काजू!”. येथे काजू भारत भेटीला आली आहे हे कळल्यावर “कोणता भारत बघायचा आहे?” असे पहिल्याच भेटीत थोडा उद्धटपणे बोलणारा नायक दिसून येतो ह्यावरून ही कथा नेहमीच्या वळणाने जाणार असे वाटते त्यातच भर म्हणजे आता नायिकेला एकटीला दिल्ली फिरायची इच्छा होते. मग त्याची सुरवात म्हणून ती तिच्या आईचे कॉलेज बघायला जाते, येथे पुन्हा तिला कबीर भेटतो. मग पुढे तिच्या कझिनची शिफारस कि नायिकेने एकटीने दिल्ली फिरण्याऐवजी कबीर सोबत फिरावे त्याला पूर्ण दिल्लीची माहिती आहे. घरच्यांची ह्या प्रस्तावाला मान्यता देखील मिळते. आता शोनाली बोस यांची लव्ह स्टोरी रंगवणार अशी खात्री होत असतानाच कथानक वेगळे वळण घेते.

आईचे कॉलेज बघायला गेलेली असताना काजू छोले- भटुरे खाण्यासाठी बलबीर च्या ढाब्यावर जाते इथे भेट होते ती गोविंदभाईची. ह्याच गोविंदभाइंच्या मुलाचा डान्स बघण्यासाठी दिल्लीतील झोपडपट्टीत जाते. ह्याच झोपडपट्टीत फिरताना इथे आपण आधी पण येऊन गेलोत आहोत याची हलकीशी जाणीव तीच्या डोक्यात तरळून जाते. ह्या पुढे तिचे त्या झोपडपट्टीत येणे नित्याचाच भाग बनून जातो. एकाच ठिकाणी रोज येण्यात काय अर्थ आहे असे कबिर तिला समजवायला जातो. तेव्हा मी असल्याच कुठल्यातरी झोपडपट्टीत जन्म घेतला आहे. ३ वर्षाची असताना मला दत्तक घेतले व माझी आई अमेरिकेत सेटल झाली. मला माझ्या भूतकाळाचा शोध घ्यायचा आहे म्हणून मी भारतात आली. इथून चित्रपट वेग धरू लागतो. ह्यातच काजूची आई किया रॉय (Keya Roy) भारतात येते. किया रॉय (Keya Roy) एक समाजसेविका आहे जी लॉस एंजेलिस येथे राहून समाजसेवा करीत असते. इकडे काजूचे झोपडपट्टीत भटकणे चालूच असते. एकदा ते गोविंदभाईच्या काकाकडे येतात आणि त्यांना १९८४ च्या दंगलींची माहिती मिळते.

इथून कथानक आपल्याला हळूहळू २० वर्ष मागे १९८४ च्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर घेऊन जाते. १९८४, भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि त्यांना गोळी घालाणारे त्यांचे अंगरक्षक शीख होते, म्हणून शिखांविरुद्ध दंगल उसळली; राजकारण्यांनी लोकांची माथी भडकवून हजारो शिखांची कत्तल घडवून आणली. येथे चित्रपटात कोठेही सोनालीने कत्तलीचे, हाणामारीचे, बलात्कारांची दृश्य यांचे कोणतेही अवास्तव चित्रण केले नाही. काही मोजक्या दृश्यातून व लोकांच्या संवादातून तिने ही भीषणता अतिशय परिणामकारकरित्या दाखवली आहे.

१९८४ च्या वेळी ती ३ वर्षाची असल्याने तिला काहीच आठवत नसते; त्यातच किया रॉय (Keya Roy) ने तिला दिलेल्या त्रोटक माहिती नुसार तिला १९८५ ला दत्तक घेतलेले असते ह्या सर्व विचारांचा परिणाम होऊन मनात खोलवर कुठे तरी अनामिक जाणीव मात्र होत असते कि ह्या सगळ्याचा आपल्या भूतकाळाचा संबध आहे. ह्या सगळ्याचा शोध घेत असताना काहीतरी कागदपत्रे मिळतील ह्या आशेने ती आईच्या ट्रंक पर्यत पोहोचते त्यात तिला तिच्या जन्मदात्री आईचा मृत्याचा दाखला मिळतो. पण त्याला फार वर्षे झालेली असल्याने अक्षरे पुसट असतात, आईचे नाव कळत नाही. तरीही काजूची आई किया रॉय (Keya Roy) मौन बाळगून राहते, ते फक्त सत्य कळाले तर काजूला त्रास होईल व काजू हे सत्य पचवू शकली नाही तर ह्या भीतीने. दुसरीकडे ह्या सर्वाचा शोध घेत असताना काबिरला आपले वडील सरकारी खात्यात असूनही त्यांनी या सगळ्या दंगलीला थांबवण्याचे प्रयत्न केले नाही हे सत्य उमजते. त्याचे वडील आपली त्यावेळची परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात.

इकडे काजू गोविंद आणि कबीरच्या मदतीने भेटलेल्या कृष्णकुमार यालाच आपले वडील मानून त्यांना भेटायला जाते व कृष्णकुमारला आपण त्याची मुलगी आहोत हे सांगण्यासाठी जाणार तेवढ्यात काजूची आई किया रॉय (Keya Roy) काजूला तिच्या आई-वडिलांचे काय झाले ह्याचे रहस्य सांगते.
काजूचे खरे नाव ‘अमृत’ असते तिचा छोटा भाऊ तिला अमू अशी हाक मारत असतो त्यामुळे सगळेच तिला ‘अमू’ म्हणतात. दिल्लीच्या एका झोपडपट्टीत अमू तिचा भाऊ अर्जुन आपल्या आई- वडिलांसोबत रहात असतात. त्यांचे कुटुंब शीख असते. बाहेर कसलातरी आवाज येतो आहे म्हणून जेवणावरून बाहेर पडलेल्या वडिलांच्या किंचाळ्या ऐकू येतात; अमुची आई घाबरून अमू व तिचा भाऊ अर्जुन याना एका पडद्याआड लपवते व बाहेर पाडू नका असे बजावते. आपले वडील किंचाळत आहेत. आई बाहेर कुठे गेली हे पाहण्यासाठी छोटी अमू पडद्याआडून बाहेर येते. खिडकीतून बघते तेव्हा आई मारेकऱ्यांना विनंती करते कि त्यांना मारू नका. इतक्यात तिच्या आईला जवळच पोलीस उभे असलेले दिसतात अमुची आई त्यांची मदत घायला धावते पण पोलीस मदत ना करत शांत उभे राहतात, त्यातच आमुच्या आईला रेल्वे लाईन पलीकडे एक मंत्री उभा असलेला दिसतो , ती त्याच्या कडे मदत मागायला पळते; पण तोही तिच्याकडे दुर्लक्ष करतो. इकडे भेदरलेली अमू आई कुठे गेली याचा शोध घेत आईच्या मागे पळते. इथे छोट्या अमुची भूमिका एकता सूद ह्या मुलीने केली आहे. २ क्षणापूर्वी आई-वडिलांच्या बरोबर हसत खेळत जेवणारी अमू, वडिलांना मारताना बघताना भेदरलेली अमू अतिशय समर्थपणे साकारली आहे. शेवटी पोटतीडकीने मॉ अर्जुन! असे असहायपणे ओरडणारी अमू अक्षरशः काळजाला हेलावून सोडते.

येथे नशीब आडवे येते, ट्रेन मधेच येते त्यामुळे अमुच्या आईला वेळेवर तिच्या पर्यंत पोहोचता येत नाही; ह्यातच तिचा छोटा भाऊ अर्जुन आणि वडील मारले जातात. त्यानंतर सगळा अंधार पसरलेला असतो. घर उधवस्त झालेले असते. अमू आणि तिची आई दंगलग्रस्तांच्या छावणीत राहायला येतात येथेच अमुची आई आणि किया रॉय (Keya Roy) यांची भेट होते.

एक दिवस दंगलग्रस्तांच्या छावणीत ब्लँकेट वाटायला येतो. त्याला अमुची आई ओळखते कि हाच तो नेता ज्याच्याकडे आपण मदत मागायला गेलो होतो आणि हाच लोकांना चिथावणी देऊन शिखांना मारायला सांगत होता. अमुची आई संतापाने बेभान होऊन ते ब्लँकेट त्याच्या तोंडावर मारते. सगळ्यांना ओरडून सांगते कि, या नेत्यामुळेच दंगला उसळली होती. पण कुणीच तिचे ऐकत नाही सगळे तिला वेडी ठरवतात. आणि लाखोंचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नेता ब्लँकेट साठी लोकांचे धन्यवाद घेऊन निघून जातो.

छावणीतील लोकाचे पुनर्वसन त्यांच्याच घरात केले जाते. अमुची आई तिच्यासाठी अमुसाठी जगण्याचा निश्चय करते पण त्याच घरात परत राहायला यावे लागते. किया रॉय (Keya Roy) अमूला भेटायला रोज येत असते. तिचे येणे हे अमुच्या आईला धीर देण्याचे काम करत असते पण दंगलीच्या आघाताने पूर्णपणे खचलेली अमुची आई आणि त्या घरात जुन्या आठवणींनी अधिकच खचत जाते आणि आमूला मागे ठेवून आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या करते. आईला काय झाले हे न कळल्याने भेदरलेली अमू एका हातागाडीच्या खाली लपून बसते. इथे पुन्हा एकदा एकता सूद ने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

काजूला आपले आई-वडील खरे कोण होते, त्यांचे काय झाले, हे सत्य कळल्यावर तिच्या मनावर आघात होतात त्यातून ती सावरते. तिचा मित्र कबीर तिला अमूच म्हणतो. ते जेथे हत्याकांड घडले त्या बस्तीला भेट द्यायला आलेले असतात. नंतर अमू आणि कबीर हे दोघे चालत जातात आणि त्याच वेळी टीव्हीवर बातमी फ्लॅश होते “ गोध्रामध्ये साबरमती एस्प्रेस जाळण्यात आली!” पुन्हा एकदा तसलेच संकट, पुन्हा एक नवी “अमू”!!

एकता सूद ने लहानपाणीची अमू अप्रतिमरित्या साकारली आहे. तिच्या चेहऱ्यावरचे व डोळ्यातील बदलत भुमिकेनुसार बदलत जाणारे भाव तिने सहजरीत्या दाखवले आहेत. कोंकणा सेनशर्मा ची भूमिका अतिशय उत्तमपणे साकारली आहे. वृंदा करट या खरोखरीच्या समाजसेविका आहेत त्यांनी शोनाली बोस व Bedabrata Pain यांच्या विनंती वरून केली. अंकुर खन्ना याने आपली उपस्थिती जाणवून दिली आहे. कॉलेजची पार्टी, घरी अमेरिकेवरून बहिण आली म्हणून साजरी केलेली पार्टी, कबीरच्या घरची पार्टी, हे सगळे कथानकात कुठेही घुसडून बसवलेले वाटत नाही उलट ते कथानक मजबूत व्हायाला मदतच करते आहे. तेव्हा “अमू” नक्की पाहावा.



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

  1. निवेदिता खूपच सुंदर लेखन, आता चित्रपट पाहायचा मोह अजिबात आवरत नाही खूपच छान, धन्यवाद एका ज्वलंत विषयावर तु तुझे मत मांडल्या बद्दल .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!