किल्ले वज्रगड आणि किल्ले पुरंदर : मीमकर-माबोकर मावळ्यांची एकत्रीत चढाई

मागच्या आठवड्यात म्हणजे १ जुलै ला किल्ले पुरंदर व किल्ले वज्रगडला मीमराठी वर्षाविहार निमित्ताने भेट दिली त्याचा वृत्तांत श्री. विशाल कुलकर्णी यांनी मीमराठी वर टाकला होता त्यांच्या परवानगीने मी तो येथे देत आहे.

वृत्तांत

"हॅलो, कुठेयस बे?"
"अरे नर्‍ह्यातच आहे, सॅंडविच घ्यायलो बे. ते मंदार आणि बाकीचे लोक पोचलेत तिथे. मी पण येतोच आहे दहा मिनीटात. समीर रानडे आणि त्याचा मित्र पिंगूबरोबर त्यांच्या गाडीने आधीच येवुन पोचलेत."
"वंडर सिटीपाशीच ना?"
"यस्स."
आम्ही बाईकला किक मारली , गिअर टाकायच्या आधी मागे गृहमंत्री बसलेत ना हे बघून घेतलं. हो; नाहीतर परत "तुझा वेंधळेपणा कधी कमी होणार आहे कोण जाणे?" हे सुभाषित ऐकुन घ्यावं लागलं असतं. वंडर सिटीपाशी पोचलो तर तिथे एक छोटासा टँपो उभा होता, ते छोटा हत्ती का काय म्हणतात ना तसला. म्हणलं "च्यायला सम्याने, फोर्डची गाडी घेतली होती ती विकली काय?"
पण आजुबाजुला कोणीच दिसेनात तेव्हा श्रीश्री रमतारामप्रभुंना फोन लावला. त्यांनी सांगितलं आम्ही इथे 'राज्याच्या' (श्रीमान राजेश जाधव) घरापाशीच येवुन थांबलो आहोत. तू ये, मी बाहेर येवुन थांबतो. आम्ही राज्याच्या घराकडे कुच केले, जरा पुढे गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजुला ररा मीमराठीचा पांढरा टीशर्ट घालून एका इमारतीपाशी उभे होते. (खरा मीमकर हो wink ) .

आम्ही ररांकडे गाडी वळवली आणि तितक्यात त्या इमारतीच्या नावाकडे लक्ष गेले "चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटर"! आम्ही कच्चकन गाडी डाव्या बाजुला वळवली, तर झकासराव आणि पिंगूशेट एकदम समोर उभे.
बरं झालं झक्या आणि पिंगू बाहेरच उभे होते ते, नाहीतर बेरकी म्हतार्‍यानं आम्हाला 'राज्या' इथेच राहतो म्हणत 'चैतन्य मेंटल......" वगैरे वगैरे मध्ये न्यायला पण कमी केलं नसतं. तिथे गेल्यावर कळलं की मालकांनी तीन जणांना तीन आश्वासन दिलं होती. ररांसाठी राजे आत्ता निघत होते, झकाससाठी ते पाच मिनीटात पोहोचत होते तर आमच्यासाठी ते 'सँडविच' घेत होते. ररांमधला गणिती जागा झाला, सर्व कॅलक्युलेशन्स करुन त्यांनी मालक पंधरा मिनीटात पोचतील असा ठोकताळा वर्तवला आणि मग पुढे जावून त्यांनी झक्याला राजे आल्यानंतर उशीरा येण्याची काय काय कारणे देतील यांची एक यादीच वाचून दाखवली. (कृपया ती यादी जाणुन घेण्यास उत्सुक असलेल्यांनी ररांशी संपर्क साधावा किंवा त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहाची) अर्थात त्यांच्या अंदाजाप्रमाणे पंधरा मिनीटात राजे (सह) येवुन पोचले आणि उशीर का झाला याची कारणे सांगायला सुरुवात केली. प्रत्येक कारणाला झक्या ररांकडून एक टाळी घेत होता. wink
एकीकडे वयोवृद्धांची रडगाणी सुरुच होती.." आजकालच्या पोराटोरांना वडीलधार्‍यांबद्दल काही आदर म्हणून उरला नाही."
त्यामुळे मी आणि झक्याने गडावर वयोवृद्धांच्या पायावर नतमस्तक होत असतानाचे फोटो काढायचे असा निश्चय केला.
झक्याकडून अजुन राज्याची आंघोळ झालेली नसल्याचे वर्तमान कळतच होते की दस्तुरखुद्द 'राज्या' हातात एक बादली घेवुन येताना दिसला. घराकडे जाता जाता काही चिरपरिचीत खुणा करुन त्याने आत्ताच उरकून आल्याचे सांगितले (त्याच्या खुणा झक्यालाच फक्त कळल्या). या कामासाठी राज्याला तीन जिने उतरुन खाली येण्याची गरज का पडावी याचाच विचार करत होतो , तेवढ्यात राज्याची गोड लेक बाबांनी घरी बोलावलेय म्हणून सांगत आली. आता वर नक्कीच चहा-नाष्ट्याची सोय होणार हे ओळखून आम्ही तयार झालो. सगळी मंडळी तिसर्‍या मजल्यावर असलेल्या राज्याच्या घरी पोचली. मी आणि राजे बाईक्स नीट लावून नेहमीप्रमाणे आधी भलत्याच इमारतीत शिरलो, चार जिने वर चढून त्या इमारतीच्या टेरेसची पाहणी करून मग परत राज्याला फोन केला, तेव्हा कळले की आम्ही भलतीकडेच आलो होतो. शेवटी एकदाचे राज्याच्या घरी पोचलो. परम दानशुर, कृपावंत राजेंनी आदल्या दिवशी झालेल्या वाढदिवसाबद्दल मित्रांना वाटायला म्हणून चॉकलेटस आणली होती. (इंपोर्टेड कॉफी बाईट चॉकलेट्स होती म्हटलं, चक्क प्रत्येकाला एक! आहात कुठे? ) चॉकलेट्स खाऊनच पोट एवढे तुडुंब भरले की वहिनींनी (सौ. राज्या) केलेल्या गरमागरम, चविष्ट कांदेपोह्यांसाठी पोटात जागाच उरली नव्हती, पण 'राज्या' त्याच्या कारने आमच्यापैकी पाच जणांना घेवून जाणार होता म्हणून नाईलाजाने खावे लागले. वर राज्याने अतिशय प्रेमळपणाने ....
"अजुन हवे आहेत का? हवे असल्यास खाली होटेलात जाऊन ऑर्डर देवून या" असे सांगितले आणि आमचे हृदय अगदी गहिवरून, उचंबळून वगैरे आले. ओळखपरेड आधीच झाली होती. त्यामुळे इथे नुसताच एक फोटो काढून घेतला.
राज्याच्या घरात कांदेपोह्यांच्या मस्त वासाने कासाविस होत कधी एकदा डिश हातात येतेय याची वाट पाहणारे मीमकर आणि माबोकर !

गरमा गरम कांदेपोहे आणि चहाचा आस्वाद घेवून, वहिनींचे मनापासून आभार मानुन राज्याच्या घराबाहेर पडलो. दहा माणसे आणि दोन कार असल्याने अर्थातच बाईकचा विचार रद्द झाला, बाईक्स राज्याच्या घरापाशी लावून आम्ही बाहेर पडलो. आता कुठल्या कारमध्ये कोण बसणार यावर काही खल सुरू व्हायच्या आधीच महिला वर्गाने ररा आमच्याबरोबरच येणार हे ठरवून टाकले. महिला वर्ग राज्याच्या कारमध्ये बसणार असल्याने एक परग्रहावरचा वाहनचालक आणि दोन पृथ्वीतलावरच्या सुविद्य महिला यांच्यात गरीब बिचार्‍या ररांचे सँडविच होवू नये म्हणून आम्ही अतिशय उदार मनाने त्याच कारमधून जायचा निर्णय घेतला आणि राजेंनी सुटकेचा श्वास सोडला. कारण सम्याच्या गाडीत झक्या आणि पिगूशेट वगळता राजेंसहीत बाकीचे दोघेही 'मुरलीधर' होते. येता जाता बासरी वाजवायला मोकळे. (मुरलीधर या शब्दाबद्दल काही शंका - लघुशंका असल्यास कृपया व्यनित विचारावे, इथे उत्तर देण्यात येणार नाही)
कोण म्हणतं आंतरजालावर कंपुबाजी चालते? आम्ही बघा, मीमकर आणि माबोकर दोन्ही मिळून हा ट्रेक करायचे ठरवले होते.
सौ. निवेदिता राज जैन, प.पु. आदिपुरुष, वयोवृद्ध, धायरी निवासी, मीम हृदय सम्राट श्री श्री श्री रमतारामश्री आणि पिंगूशेट हे मीमराठीकर, समीर रानडे, राज्या हे माबोकर, माबोकर किंवा मीमकर कोणीच नसलेले समीरचा मित्र तुषार आणि आमच्या माननीय गृहमंत्री सौ. सायली, तर मीमराठीकर आणि माबोकर असे दोन्ही असलेले झकासराव, राज जैन आणि अस्मादिक असा मस्त आंतरसंस्थळीय (हायला नवीन शब्द सापडला wink ) गृप होता या भ्रमंतीसाठी.
गाड्या काढल्या ते थेट नारायणपूर फाट्यालाच थांबलो. (तसे मध्ये आमच्या गाडीचा पेट्रोलसाठी तर सम्याच्या गाडीचा बासरीवादनासाठी एक स्टॉप झाला होता म्हणा) तिथे फाट्यावरील एका हॉटेलमध्ये पोटासाठी काही खाद्यपदार्थ खरेदी केले आणि थेट मोहिमेला सुरुवात केली. साधारण एक वाजता पुरंदरच्या पायथ्याशी येवुन धडकलो. गडावर जाण्यापूर्वी सुरुवातीलाच 'वीर मुरारबाजींचा' पुर्णाकृती पुतळा दोन हातातल्या दोन तलवारी सरसावून जणु काही कळिकाळाला आव्हान देत आपल्याही शरीरात रक्त आहे आणि ते सळसळू शकते याची सुखद जाणीव करुन देत आपले स्वागत करतो.

गडाच्या आसमंतात प्रवेश करतानाच लष्कराच्या अस्तित्वाची जाणिव झाली. तिथे उपस्थित लष्करी जवांनांनी वज्रगडावर जाण्याची परवानगी नाही असे सांगुन धक्का दिला. "हमारे जैसाही एक जवान होगा उस रास्तेपे, जो आपको आगे नही जाने देगा" असे सांगत त्याने आमची दांडी उडवली. "बघु, पुढचे पुढे" म्हणत आम्ही चाल सुरू केली.

पाचच मिनीटात आम्ही वज्रगड आणि किल्ले पुरंदरच्या मध्यावर असलेल्या भैरवखिंडीच्या मुखावर येवून ठेपलो. इथे श्री शिवरायांचा एक अर्धपुतळा प्रतिष्ठापीत केलेला आहे. चोरांनी महाराजांना देखील सोडलेले नाही. महाराजांच्या डोक्यावरील छत्र गायब आहे.


थोडावेळ तिथे उभे राहून पुरंदर आणि वज्रगडाला अभेद्य बनवणार्‍या त्या रुद्रभीषण भैरवखिंडीचे भारावून जात दर्शन घेतले. समोर मध्येच एक एकाकी पण अभेद्य सुळका दिसत होता.

थोड्या वेळात वज्रगडावर जावून आलेले काही जण भेटले. त्यांनी जायला काही हरकत नाही, तिथे कोणीही अडवणारे नाही अशी ग्वाही दिल्यानंतर आम्ही आमचा मोर्चा वज्रगडाकडे वळवला.
पुरंदराच्या पायथ्यापासून दिसणारा वज्रगड

वज्रगड अथवा रुद्रमाळ या नावाने ओळखला जाणार हा गड. एका दंतकथेनुसार गौतम ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी देवेंद्राने ज्या इंद्रनील पर्वतावर तपःसाधना केली तो इंद्रनील पर्वत म्हणजे आजचा पुरंदर. पुरंदर हे इंद्राचेच एक नाव आहे. इंद्रनील पर्वतरांगांवर बांधलेला हा किल्ला म्हणून त्याचे नाव 'पुरंदर' ठेवले गेले अशी एक दंतकथा आहे. तर 'पुरंदराचे' म्हणजे 'इंद्राचे शस्त्र ते वज्र' म्हणून किल्ले पुरंदरासमोर बांधलेला हा पुरंदराचा जुळा किल्ला म्हणजे 'वज्रगड'. रुद्रेश्वर उर्फ शिव हा वज्रगडाचा अधिपती म्हणवला जातो. वज्रगडावर या रुद्रेश्वराचे एक मंदीरही आहे. या रुद्रेश्वराच्या अधिवासामुळे 'वज्रगडाला' रुद्रमाळही म्हणले जाते. याबद्दल एक पुराणकालीन दंतकथा अशीही सांगितली जाते की राम-रावण युद्धादरम्यान मुर्छीत झालेल्या लक्ष्मणासाठी मारुतीरायाने द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. तो लंकेकडे जात असताना मध्येच द्रोणागिरीचा एक तुकडा तुटून पडला, तोच हा नारायणपुराजवळील इंद्रनील पर्वतरांगांचा भाग. नंतर इथे यादव राजांनी पुरंदर आणि वज्रगडाचे बांधकाम केले.
वज्रगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे १३४८ मीटर. पायथ्याशी असलेल्या भिवडी गावापासुन रडतोंडीच्या घाटातुनही किल्ल्यावर जाता येते. शेवटी आम्ही शिवप्रभूंचे नाव घेवून वज्रगडाकडे कुच केले.
वज्रगडाच्या दिशेने कुच

साधारण अर्ध्यातासात अतिशय सोपी असलेली चढणीची पायवाट चढून आपण वज्रगडाच्या महाद्वारापाशी पोहोचतो. तरीही आमची बर्‍यापैकी दमछाक झालेली होती. त्यात मध्येच बोरींग मशीनचे काही अवजड स्पेअर पार्टस गडावर घेवून जाणार्‍या काही कामगारांची एक टोळी आम्हाला दिसली. शेकडो किलो वजनाचे ते जड लोखंडी भांग खांद्यावर उचलून गडावर चढवणारे ते कामगार बंधू बघीतले आणि पुर्वीच्या काळी मावळ्यांनी इतक्या उंच गड-किल्ल्यांवर अवजड तोफा कशा चढवल्या असतील याबद्दल वाटणारे नवल आपसुकच कमी झाले. महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर लगेचच आत अजुन एक दरवाजा आहे. गडावर शिल्लक असलेल्या मोजक्या बांधकामापैकी हे दोन दरवाजे. तटबंदी कधीच ढासळलेली आहे. या दरवाज्यांव्यतिरिक्त गडावर अजुनही शाबूत असलेले बांधकाम म्हणजे मारुतीरायाचे एक मंदीर आणि रुद्रेश्वराचे छोटेसे मंदीर.
महाद्वारमहाद्वाराचा आतल्या बाजुचा दरवाजा

वज्रगडाच्या सरदरवाज्यात वीर समीरबाजी रानडेप्रभु wink


गडावर सद्ध्या तिथे असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये काही काम चालु आहे, त्यामुळे बहुदा पाणी उपसुन काढले जात आहे. आम्हाला रस्त्यात भेटलेले ते कामगार बंधु याच कामासाठी ते अवजड मशिन गडावर घेवुन जात होते. महाद्वारातून आत शिरल्यावर समोर उभा राहतो तो अजिंक्य, अवाढव्य आणि मुरारबाजींच्या पराक्रमाने आणि बलिदानाने पावन झालेला पुरंदर.

किल्ल्यास भग्नावस्थेत असलेली तटबंदी असुन एकुण पाच बुरुज असावेत. त्यापैकी दोन बुरुज पुरंदराच्या समोर येतात. इतिहास सांगतो की दिलेरखानाने पुरंदर जिंकण्यासाठी आधी वज्रगड जिंकला आणि येथुन तोफांचा मारा करुन अभेद्य अश्या पुरंदरावर हल्ला चढवला. यावरून गडाला वज्रगड हे नाव का दिलेले असावे याची कल्पना आणि नावाच्या सार्थकतेबद्दलची खात्री पटते.
गडाच्या महाद्वारातून आत शिरले की पुर्वेकडच्या बाजुला अतिशय उंच आणि प्रचंड असे रौद्र कातळाचे सुळके आपले स्वागत करतात. हा गडाचा सर्वोच्च भाग. काही गिर्यारोहण संघटना प्रस्तरारोहण प्रशिक्षणासाठी या कातळांचा उपयोग करतात असेही समजले. त्या उंचच उंच गेलेल्या सुळक्यांकडे बघताना त्यांच्या रौद्रस्वरुपाची कल्पना येत होती.

त्या सुळक्यांना सलामी देत आम्ही पुढे पुर्वेकडच्या माचीकडे प्रयाण केले. मी मात्र त्या कातळात फारसा रमलो नाही. (कारण सौ. बरोबर होत्या, त्यामुळे तिथे वर जाणे सर्वथा अशक्य आहे याची खेदकारक जाणिव मनाला होती) त्यामुळे मनावर तेच कातळ ठेवून मी आपला काही फुले-पाने टिपायच्या मागे लागलो. तिथे काटेरी निवडुंगाच्या आधाराने मनसोक्त बहरलेली ही कोवळी, नाजुक वेल बघीतली आणि निसर्गाच्या अफलातुन रसिकतेचे कौतुक वाटले.

तिथेच टिपलेली ही काही फुले...
गडावर मोकळेपणाने फिरताना आम्ही मीमराठीकर, आम्ही मायबोलीकर या भिंती कधीच गळून पडल्या होत्या. जणु काही वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखतोय अश्या पद्धतीने एकमेकांची चेष्टा-मस्करी करणे चालु होते. सुदैवाने (परमभाग्य म्हणावे का याला?) मीमचे आदिपुरुष श्री रमताराम बरोबर असल्याने अनेक प्रकारच्या तात्विक विषयांवर चर्चा बहरात आलेल्या होत्या. त्यापैकी मुख्य आणि गंभीर विषय मीमराठी चालक-मालक श्री. राज जैन उर्फ राजे यांचे 'शिक्षण' हा होता. या विषयावर आपले बहुमुल्य विचार आणि आठवणी प्रकट करताना गहिवरून जावून राजेंनी एक जुनी आठवण सांगितली. त्यांनी जेव्हा कोल्हापुरच्या बाहुबली हॉस्टेलला प्रवेश घेतला तेव्हा म्हणे हॉस्टेलला अजिबात कुंपण नव्हते. मात्र आपल्या तिथल्या वास्तव्यादरम्यान श्रीमान राजेंनी इतक्या वेळा हॉस्टेलमधुन पळून जाण्याचा उपक्रम प्रामाणिकपणे आणि सातत्याने राबवला की आता बाहुबली हॉस्टेलला चौपदरी भिंतींचे कुंपण घालण्यात आलेले आहे. धन्य ते राजे (मीमचे) आणि धन्य ते बाहुबली हॉस्टेल !
या व्यतिरीक्त अजुन एक लै लै कान्पिडेन्शल गोष्ट म्हंजे सौ. राजेंनी एका बेसावध क्षणी मालकांना बेसावध पकडून त्यांचा किती लाखाचा विमा आहे हे काढून घेतले आणि त्यानंतर संपुर्ण भ्रमंतीत एखादा बेलाग कडा किंवा दुर्गम दरी दिसली की मालकांच्या त्या विम्या पॉलीसीचा कसा फायदा करून घेता येइल यावर सुनबाई आणि सासरेबुवांचा अखंडीत खल चालू होता. यापुढे म्हतारा आणि मालकिणबैंसोबत कुठल्याही ट्रेकला जाण्यापुर्वी ट्रेकर्स योग्य ती काळजी घेतील अशी खात्री बाळगतो.
इथल्या एका बुरुजावर बसुन सर्व मावळ्यांचा एक एकत्रित फोटो काढण्याचा निर्णय झाला. पण आजुबाजुला अन्य कोणीच (फोटो काढण्यासाठी) नसल्याने दोन वेगवेगळे फोटो काढावे लागले. एका फोटोत तुम्हाला झकासराव दिसतील तर दुसर्‍यात अस्मादिक !


झकासरावांचे फोटोग्राफीचे विलक्षण (की विक्षीप्तपणाचे) प्रयोग चालुच होते. आपली 'सोनी'बाय सांभाळत आपला छंद (की शौक) पुरे करणारे झकासराव ! नक्की कशाचे फोटो काढत होता देवच जाणे....


सौ. कुलकर्णीबाई आणि सौ. राजे

आणि अखेर तो क्षण आला. राजेंच्या शिक्षणाबद्दलच्या चर्चेतुन हाती आलेल्या माहितीवरून गदगदीत झालेल्या मायबोलीकर श्रीयुत राज्याश्रेष्ठींनी एका विवक्षीत क्षणी जाणता-अजाणता श्रीमन राजेमालकांना 'अंगणवाडी एंट्रन्स फेल' ही आजतागायत कुणालाही न मिळालेली पदवी देवून आमची ही सहल सार्थक करुन टाकली. आनंद आणि भावनातिरेकाने गदगदून आलेले राजेमालक आपल्या छोट्याश्या आभार प्रदर्शक भाषणाला प्रारंभ करणारच होते, पण तेवढ्यात सर्व मंडळी तटबंदीला असलेल्या एका छोट्याश्या पण भग्न दरवाज्यातुन माचीवर उतरती झाली आणि मालकांनी नाईलाजाने आपले भाषण स्वतःपाशीच ठेवले.
माचीकडे प्रयाण...

सगळी मंडळी माचीवर उतरल्यावर दमलो बुवा म्हणून त्या पडक्या दरवाज्यातच ठण मांडून बसलेले झकासराव !

पुर्वेकडील माचीचा हा देखणा परिसर

या वेळेपावेतो दोन वाजुन गेलेले होते. सकाळी वहिंनींनी प्रेमाने खाऊ घातलेल्या पोह्यांचा असर आता कमी झाला होता. पोटात कावळे आणि हत्ती एकाच वेळेला ओरडायला लागले होते. आम्ही पोटपुजेसाठी एखादी चांगली जागा शोधायला लागलो. माचीवर उतरल्यावर आधी दृष्टीस पडते ते तीन भागात खोदलेले एक तळे (पाण्याचे टाके) आणि त्याच्या किनारी असलेले मारुतीरायांचे एक मंदीर.

या मंदीरातील मारुतीरायाची मुर्ती सर्वसाधारण मारुतीमंदीरांपेक्षा आकाराने काकणभर मोठीच आहे.

मारुतीरायाला वंदन करुन थोडी चढण चढली की श्री रुद्रेश्वराचे देवस्थान आहे. हे एक छोटेसेच पण दुर्लक्षीत मंदीर वाटते. हा रुद्रेश्वर म्हणजे वज्रगडाचा अधिपती.

इथुन थोडेसे पुढे गेल्यास काही भग्नावस्थेतील बांधकाम आढळते. असे म्हटले जाते की ब्रिटीशकाळात आद्य क्रांतिकारकांपैकी एक गणले गेलेले वीर उमाजी नाईक इथे वास्तव्यास होते. त्याच बाजुला तटबंदीच्या अगदी कडेला असलेल्या आणखी एक भग्नावशेषांवरून राजेंनी हे तत्कालीच शौचकूप असावे असा अंदाज बांधला आणि डोक्याला हात (मनोमन नाकालाही) लावत आम्ही तिथुन पुढे निघालो. आता जठराग्नि खुपच भडकलेला होता. लवकरच एक चांगली शांत, सावली असलेली जागा सापडली आणि आम्ही शिदोरी सोडली.

एक पेशल फोटो खास मीमकरांसाठी

शाकाहारी सॅंडविचेस, इडली-चटणीची पाकिटे, भडंग, परोठे, सामोसे, सुकी भेळ, केळी आणि वर स्लाईसच्या दोन मोठ्या बाटल्या असा जंगी बेत होता. मंडळी पोटपुजेत दंग झाली.
मी आणि झकासराव आमची फोटोग्राफीची हौस भागवून घेत होतो.

किल्याच्या वायव्येकडील बुरुजापासून एक डोंगरांची रांग खाली उतरत जाते. असे कळते की या डोंगररांगेच्या पायथ्याशी 'कपिलेश्वर' या नावाने विख्यात शिवाचे एक जागृत स्थान आहे. या कपिलेश्वराच्या नावावरून या डोंगररांगेला कपिलधार असे म्हटले जाते. वज्रगड कधी बांधला गेला असावा याची माहिती उपलब्ध नाही. पण आंतरजालावर उपलब्ध असलेल्या त्रोटक माहितीवरुन हा किल्ला शिवपूर्वकालीन असावा. ईसवीसन १६६५ मध्ये जेव्हा दिलेरखानाने पुरंदराला वेढा दिला तेव्हा त्याला पुरंदराचे अभेद्यपण लक्षात आले असावे आणि पुरंदर घ्यायचा असेल तर आधी वज्रगड ताब्यात येणे अतिशय आवश्यक आहे हे त्या मुत्सद्दी सेनानीने ओळखले नसेल तरच नवल. तर दिलेरखानाने या कपिलधारेच्या बाजुने वज्रगडावर तीन तोफा चढवण्यास सुरुवात केली. वज्रगडाचे तत्कालिन किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांनी अवघ्या तीनशे मावळ्यांच्या मदतीने दिलेरखानाला निकराची लढत दिली. १५ दिवस जिवाच्या आकांताने किल्ला झुंजवला, पण दिलेरखानांच्या तोफांच्या मार्‍यापुढे गडाचा वायव्य बुरूज ढासळला आणि गड दिलेरखानाच्या ताब्यात गेला. पुरंदराच्या अस्तित्वाला बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का होता.
तीन वाजत आले होते. आम्हाला अजून पुरंदरची माती कपाळाला लावायची होती. त्यामुळे वज्रगड उतरायला सुरुवात केली. समोर पुरंदरकडे डोंगर चढून येणार्‍या नागमोडी रस्त्याचे दृश्य डोळ्यांना खुणावत होते. अर्ध्या तासात गड उतरून पुन्हा महाराजांच्या पायापाशी आलोसुद्धा !

आता समोर पुरंदर खुणावत होता.

किल्ले पुरंदर !
हिंदवी स्वराज्याचे सुरुवातीचे डावपेच जिथून आखले गेले तो गड. महाराजांच्या स्वराज्याच्या मोहिमेतील पहिल्या लढाईसाठी जिथून महाराजांनी कुच केले होते व बेलसर येथे ती लढाई जिंकली होती तो अभेद्य पुरंदर. पुष्पौषधी आणि वेगवेगळ्या दुर्मिळ वनस्पतींचे आगर असलेला पुरंदर ! जिथे हिंदवी स्वराज्याच्या नंतर धर्मवीर, छावा अशा नावाने ओळखल्या गेलेल्या महापराक्रमी पण दुर्दैवी युवराजाने जन्म घेतला तो पुरंदर !
पुरंदराने आपल्या आयुष्यात अनेक राजवटी पाहिल्या आहेत. सर्वप्रथम पुरंदरावर राज्य केले ते यादवकुलीन राजांनी. नंतर बिदरच्या बहामनी सुलतानाने हा गड यादवांकडून जिंकून घेतला. बहामनी साम्राज्याचे तुकडे झाले आणि गड अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. निजामशहाने वेरुळच्या मालोजीराव भोसल्यांच्या पराक्रमावर खुश होवून हा 'पुरंदर' इनाम म्हणून मालोजीरावांना बहाल केला. नंतर कालौघात पुरंदर आदिलशाही साम्राज्याच्या ताब्यात गेला. ईसवी सन १६३७ च्या सुमारास पुरंदरचे तत्कालीन किल्लेदार महादजी निळकंठ यांच्या मृत्युनंतर त्यांच्या वारसात किल्लेदारीवरून वाद सुरू झाले. तेव्हा शिवरायांनी त्यांच्यात मध्यस्थी करून , गोडी गुलाबीने पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आणला. इथेच सन १६५७ मध्ये महाराणी सईबाईसाहेबांच्या पोटी, महापराक्रमी छत्रपती संभाजीराजांचा जन्म झाला. अगदी पेशवाईत देखील जेव्हा जेव्हा पुण्यावर बाह्य आक्रमणाचे बिकट प्रसंग आले तेव्हा पेशव्यांनाही पुरंदरनेच भरवश्याचा आसरा दिलेला आहे. बारभाई कारस्थानामुळे अल्पकालीन पेशवेपद लाभलेले श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांचाही जन्म पुरंदरवरचाच. पण सांप्रत इथे त्याबद्दल काहीच माहिती अथवा अवशेष सापडत नाहीत.
असो. महाराजांचे दर्शन घेवून आम्ही तिथल्या छ. संभाजीराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घ्यायला निघालो. आता तिथे तत्कालीन बांधकामाची कुठलीच खुण शिल्लक नाहीये. १८१८ मध्ये किल्ला ताब्यात घेतल्यावर ब्रिटीशांनी अनेक जुनी बांधकामे पाडून किंवा आधीच भग्न झालेल्या इमारतींच्या जागी काही नवीन इमारती बांधल्या. यात त्यांच्या अधिकार्‍यांसाठी बांधण्यात आलेली निवासस्थाने, प्रार्थनालये यांचा समावेश आहे.
सद्ध्या शंभुराजांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणीही प्रार्थनालय सदृष्य इमारत आहे. पण आता त्यात प्रार्थनालय वाटावे असे काहीच अवशेष शिल्लक नाहीत. त्या रिकाम्या इमारतीतच आता छत्रपती संभाजीराजांची एक मुर्ती (अर्धपुतळा) प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे.आणि आदीपुरूष श्रीमान रराश्रेष्ठी

या ठिकाणी असलेले किल्ले पुरंदराचे मानचित्र

स्वराज्याच्या दुसर्‍या छत्रपतींचे दर्शन घेवून आम्ही पुरंदर चढायला सुरूवात केली.


थेट वरपर्यंत जाणारी थोडी चढणीची पण सोपी पायवाट असल्याने वाट अगदीच सोपी होती. तरी त्यातल्या त्यात काही ठिकाणी असलेले काही सोपे रॉकपॅचेस पाहून आम्ही आपली हौस भागवून घेतली.

आता पुरंदरच्या महाद्वारापर्यंत पोचणे खुप सोपे झाले आहे. याला 'सरदरवाजा' असे नाव आहे. पुर्वी पुरंदराला एकुण पाच द्वारे होती असे ऐकिवात आहे. सद्ध्या फक्त सरदरवाजाच काय तो उपलब्ध आहे. थोडी चढणीची वाट आणि काही पायर्‍या चढत आम्ही सरदरवाज्यापर्यंत येवुन पोचलो. सगळीकडे असते तसेच इथेही सरदरवाज्याबाहेर मारुतीरायाचे अस्तित्व होतेच. मारुतीरायाचे दर्शन घेवून आम्ही गडावर पाऊल ठेवले.


सरदरवाज्यातून आत गेले की पुढे अजुन दोन दरवाजे आहेत. एक बालेकिल्ल्याचा दिल्ली दरवाजा आणि दुसरा गणेशदरवाजा. दिल्ली दरवाज्यातून बाहेर पडलो की आपण थेट खंदकड्यावर पोचतो. येथे जवळच एक पाण्याचे टाके आहे. तर विरुद्ध बाजुच्या तटबंदीत कुठेतरी एक चोर दरवाजा आहे जो गडाच्या मागच्या बाजुच्या खिंडीत कुठेतरी उतरतो असे कळले. झकासरावांच्या कृपेने तो दरवाजा कुठे उघडतो ते कळाले , पण जिथुन सुरू होतो ती जागा काही बघायला मिळाली नाही.

आम्ही आधी कुंदकड्यावरून वज्रगडाच्या दिशेने असलेल्या माचीकडे प्रस्थान केले. मजल-दरमजल करत टोकावर येवून पोचलो.


समोर देखणा वज्रगड दिसत होता.

पुरंदरच्या पायथ्याशी असलेला पद्मावती तलाव आणि ब्रिटीशकालीन इमारती....थोडा वेळ इथल्या बुरुजावर काढून आम्ही परत गणेशदरवाज्याकडे निघालो. आधी केदारेश्वराचे दर्शन आणि नंतर जमल्यास बालेकिल्ल्याची चढाई असा बेत होता. तसेही बालेकिल्ला यावेळी अवघडच वाटत होता. कारण इथेच आम्हाला सव्वा-चार वाजले होते. केदारेश्वराच्या दर्शनाला जावे की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. कारण वेळ कितपत साथ देइल याची खात्री नव्हती. आणि वातावरणात पावसाचे चिन्ह दिसायला सुरुवात झाली होती. जिथे उभे होतो तिथुन केदार टेकडीवरील केदारेश्वर बर्‍यापैकी लांब अंतरावर दिसत होते.


पण थोड्याश्या चर्चेनंतर इथपर्यंत आलोच आहोत तर केदारेश्वर करुनच जायचे असे ठरले आणि आम्ही केदारेश्वराकडे जायला प्रस्थान ठेवले. परत उलट पावली गणेश दरवाज्याकडे परतलो.
गणेशदरवाजा

गणेशदरवाज्यातून आत गेलो की समोर अजुन एक उत्तराभिमूख दरवाजा लागतो, त्याला निशाण दरवाजा असे म्हटले जाते. निशाण दरवाज्या शेजारीच निशाण बुरूज आहे. इथे हिंदवी स्वराज्याचे निशाण असणारा जरी पटका मानाने फडकत होता. मायबोलीकर श्रीमंत राज्याश्रेष्ठींनी लगेच ध्वजासोबत आपले फोटो काढून घेण्याचा मनसुबा जाहीर केला.


इथुन पुरंदरच्या शेवटच्या टोकापर्यंत अभेद्य अशी तटबंदी आहे. अजुनही बर्‍यापैकी चांगल्या अवस्थेत असलेल्या या तटबंदीला निशाण दरवाज्यापासून काही अंतरावरच एक बुरूज आहे. हा शेंदर्‍या बुरुज. इथुन जरा पुढे गेल्यावर जवळच साखरी तलाव, पुढे एक तिहेरी बुरुज आहे, हत्ती बुरूज. हत्ती बुरुजाच्या नैरुत्य दिशेस कोकण्या बुरुज आहे. आमचे लक्ष्य केदार टेकडी असल्याने आम्ही कुठेही फारसा वेळ न घालवता तडक केदार टेकडीकडे निघालो.
बाहेरच्या बाजुनी दिसणारी किल्ले पुरंदरची तटबंदी

निशाण दरवाज्यातून बाहेर पडलो की समोर दिसणारी हिरवीगार टेकडी म्हणजे पुरंदरचा बालेकिल्ला. राजगादी ! फोटोतील डाव्या बाजुची हिरवीगार टेकडी म्हणजे पुरंदरचा अभेद्य आणि दुर्गम बालेकिल्ला...

इथे काही जुन्या इमारतींचे अवशेष, पाण्याची टाकी आहेत. पण वेळेची कमतरता असल्याने आम्ही नाईलाजाने बालेकिल्ल्यावर जायचे टाळून केदारेश्वराकडे जायला निघालो. या राजगादीवरच त्या काळी रसद तसेच दारुगोळ्याची कोठारे होती. आता फक्त भग्नावशेष आहेत. बालेकिल्ल्याला स्पर्श करत आम्ही केदार टेकडीकडे निघालो. केदार टेकडीच्या दक्षीण दिशेला पुर्वी एक दरवाजा होता, ज्याला केदार दरवाजा म्हणून ओळखले जाई. आता त्या बाजुची सर्व तटबंदी नष्ट झाली आहे. त्या बरोबर कदाचित केदार दरवाजाही.....
आता हवेत गारवा जाणवायला लागला होता. जसजसे केदार टेकडी जवळ यायला लागली तस तसे जाणीवायला लागले की आपला इथे येण्याचा निर्णय योग्यच होता.
शेवटच्या टप्प्यात किमान ७० पायर्‍या आहेत. इथे येइपर्यंत आमच्या गृपमध्ये थोडी फारकत झालेली होती. सर्वश्री रमताराम, झकासराव, पिंगूशेट आणि सम्याचा मित्र आधीच पायर्‍यांपाशी पोचले होते. त्यानंतर थोड्या वेळाने सौ.सहीत अस्मादिक पोचले, त्यानंतर राजे आणि सौ. राजे व शेवटी राज्या आणि सम्या असे टप्प्या टप्प्याने येवून पोचले. मध्ये एका ठिकाणी राजे मला राज्या आणि सम्यासाठी थांबुया म्हणत होते. त्यांना म्हणलं " चल, त्या दोघांसाठी थांबत बसलो तर इथेच रात्र होइल." नेमके माझे हेच शब्द माझ्या मागे पोचलेल्या राज्याने ऐकले. आणि "काय बे काय बोलतो माझ्यामागे, माझ्याबद्दल, तुला काय वाटलं तुझी बायको बरोबर आहे म्हणून विचारायला घाबरतो की काय मी?" असे म्हणत आमच्या सौंच्या चेहर्‍यावर थोडावेळ टेन्शन आणले आणि दुसर्‍याच क्षणी काही झालेच नाही अश्या आविर्भावात आमच्या गळ्यात हात टाकून श्रेष्ठी पुढे निघाले.
पायर्‍यांपाशी वाट पाहात बसलेली गँग बघून आम्हीही लगेच संधी साधली आणि जमीनीला टेकलो. आयुष्यात प्रथमच ट्रेकला आलेल्या आणि पहिल्याच ट्रेकला दोन दोन गड सर केलेल्या कुलकर्णीबाई बर्‍याच दमल्या होत्या. पण सुदैवाने केदार टेकडीच्या पायथ्याशी पोचल्यावर तिथले वातावरन बघून आपला सगळा थकवा विसरल्या. थोडा वेळ तिथेच विसावलो..


थोड्या वेळाने पायर्‍या चढून वर जायला निघालो तेव्हा आमच्या आदिपुरुष म्हतार्‍याने वर यायला नकार दिला. कारण सांगितले मला नास्तिकाला वर येवून काय करायचे आहे? मी आधी बघीतलाय तो परिसर. तुम्ही या जावून.
पण परत म्हतार्‍यालाच काय वाटलं की, म्हणालं .
" मीच जगावर लक्ष ठेवायसाठी नेमलेला ठेकेदार आहे तो. चला आलोच आहे तर निदान ऑडीट तरी करून घेवू"
असे म्हणून केदारेश्वराला उपकृत करण्यासाठी रमताराम आजोबा टेकडीच्या पायर्‍या चढायला लागले.

झकासरावांनी टिपलेला केदारेश्वराकडे जाणार्‍या पायर्‍यांचा हा एक अफलातून फोटो. पायर्‍यांची सुरुवात तर दिसत्येय, पण कुठे संपणार ते मात्र अज्ञात आहे. हा फोटो बघतानाच जाणीव होते की या पायर्‍या चढून वर गेलो की जणुकाही आपण थेट स्वर्गभूमीत प्रवेश करणार आहोत. हास्य

सगळ्या पायर्‍या चढून वर आलो. आजुबाजुला सहज नजर फिरवली...
"गर फिरदौस जमी अस्त, हमी अस्त, हमी अस्त !"
दुसरी कुठली भावना मनात येणं शक्यच नव्हतं. आजुबाजुचा आसमंत अक्षरशः भारावून टाकणारा होता.

समोर छोटेसेच पण अतिशय सुबक असे केदारेश्वराचे मंदीर. मंदीरासमोर एका छोट्या मेघडंबरीत नंदीमहाराज बसलेले आहेत.


मग सुरू झाला वैयक्तीक फोटोसेशनसोहळा wink

राजे, राज्या आणि अस्मादिक

अचानक झकोबांच्या काय मनात आले की, त्यांनी फरमान सोडले "विशल्या, तुझा आणि वहिनींचा एक फोटो काढतो बस्स तिथे."
कोल्हापुरकर पाटलांची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही लगेच पोज दिली आणि एखाद्या सेलिब्रिटीच्या थाटात आमचे फोटोसेशन सुरू झाले. (आम्ही फेसबुकवर टाकलेला हा फोटो बघून एका सदगृहस्थाच्या मनातली जळजळ बाहेर पडली होती. wink )

फायनल रिजल्ट कर्टसी झकोबा हास्य

इथे म्हतार्‍यालाबी मोह आवरला न्हाय आन त्यानं फेबुसाठी प्रोफाईल पिक काढण्याची आर्डर पुर्ण करून घेतली.

लगोलग पिंगूशेट आणि मालकिणबाईंनीपण...


आता हवेतला गारवा चांगलाच जाणवायला लागला होता. हळु हळू ढगांची चादर पुरंदराच्या अंगाखांद्यावर पांघरायला सुरूवात झाली होती. तशात राज्याने लवकर उतरा , पावसाची लक्षणे आहेत आणि आपल्या गाडीचे वायपर्स बंद पडले आहेत अशी सुवार्ता ऐकवली आणि आम्ही केदारेश्वराला नमस्कार करून परतीचा रस्ता धरला.
परतताना ररांच्या सांगण्यावरून (नाही ते फुला, पानांचे फोटो घेत बसतो, आता हे टीप ना अशी तयंची प्रेमळ सुचना) केदारेश्वर ते बालेकिल्ल्याचा पायथा अशा चिंचोळ्या वाटेवर हे थोडेसे चित्रीकरण केले
येताना पुरंदराचा अधिपती जो पुरंदरेश्वर त्याचे दुरूनच दर्शन घेतले आणि पायथ्याला उतरलो.

शेवटी पायथ्यापाशी असलेल्या एका चहाच्या टपरीवर तिथल्या चहा बनवणार्‍या काकांच्या डोक्याला थोडा ताप दिला. प्रत्येक जण चहाच्या कपांची काहीतरी वेगळीच संख्या सांगत होता. काका थोडे कावलेच होते. पण गरमागरम चहा पिऊन शेवटी परतीच्या प्रवासास सज्ज झालो...

परत फिरलो तेव्हा पुरंदर हळुहळू ढग आणि धुक्यांची चादर ओढून अदृष्य होवू लागला होता.


भास्कररावही आपल्या घरी परत निघाले होते, त्यांच्यासोबत आम्ही देखील घरचा रस्ता धरला....

इथे कसे जाल?
दोन मार्ग आहेत.
१. पुणे-हडपसर-दिवेघाट-सासवड-नारायणपूर- नारायणपूरपासुन अवघ्या ७ किमी अंतरावर पुरंदर.
२. पुणे-कात्रज-कात्रज घाट-खेड शिवापूर-केतकावळे फाटा-नारायणपूर.
मुक्कामाची सोय:
गडावरील काही घरांमध्ये, मिलिटरी बंगल्यात होऊ शकते. अर्थातच पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक आहे. तसे पाहायला गेले तर एका दिवसात दोन्ही गद आरामात होत असल्याने मुक्कामाची आवश्यकता नाही.
आसपासचा भेट देण्याजोगी ठिकाणे म्हणाल तर नारायणपूरचे एकमुखी श्रीदत्त मंदिर, केतकावळ्याचे श्री. बालाजी मंदिर, जेजुरी, सासवड, दिवेघाटातला मस्तानी तलाव, बनेश्वर ई.

तळटीप : या सगळ्या गोंधळात माझा आणि झक्याचा गडावर, वयोवृद्धांच्या पायावर नतमस्तक होत असतानाचे फोटो काढायचा निर्धार नकळता विसरला गेला. तेव्हा ते काम पुढच्या ट्रेकच्या वेळी करायचे असे ठरवून वयोवृद्धांची समजुत काढायचे काम श्रीमान प्रतिसादसम्राट, कोल्लापुरकर अशोकराव पाटीलकाका यांच्यावर सोपवायचे असा माझा आणि झक्याचा बहुमताने निर्णय झाला.

तळटीप २ : लेखातली सर्व छायाचित्रे अस्मादिक, राजे आणि झकासराव अशा तीन जणांच्या कॅमेर्‍यातुन घेण्यात आलेली आहेत. राजे आणि झकास यांचे मनःपूर्वक आभार मानण्याची आम्हाला गरज वाटत नाहीये

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

२६/११ च्या निमित्ताने....................................