नमन नटवरा!!!!!!!!!!!

                ‘बालगंधर्व’ ही पाचच अक्षरे आहेत पण महाराष्ट्राचे अवघे पंचप्राण या पाच अक्षरांत सामावलेले आहेत, असे आचार्य अत्रे म्हणायचे. शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात कलेची जाण असणा-या मातीमध्ये बालगंधर्व नावाचे रोपटे तरारले आणि नंतरची ५०-६० वर्षे हा गायनाचा, अभिनयाचा कल्पवृक्ष सतत बहरत राहिला. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण बालगंधर्व या नावाची जादू काही ओसरली नाही. संगीत नाटकाचा सुनहरा जमाना संपला तरीही महाराष्ट्राने बालगंधर्वांना दूर लोटले नाही. पल्लेदार नाट्यगीते गाणारा हा आवाज पुढे भक्तिगीते आणि अभंग गाऊ लागला. वृद्धत्व आले, अपंगत्व आले तरीही महाराष्ट्र्राचे या व्यक्तिमत्त्वावरचे प्रेम काही कमी झाले नाही. बालगंधर्वांनीहि महाराष्ट्राला भरभरून दिले.

                लोकमान्य टिळकांचा तो सुवर्णकाळ होता. त्यांनीच नारायण राजहंस या सुरिल्या गळ्याच्या मुलाला ‘बालगंधर्व’ ही उपाधी दिली. लोकमान्य टिळक यांनी गायकवाड वाड्यातील गणेशोत्सवामध्ये छोट्या नारायण राजहंसाचे गाणे ऐकले. खरे तर हे गायन चालू असताना लोकमान्य ‘केसरी’ च्या अग्रलेखाचे लेखन करीत होते. पण नारायणाच्या आवाजाची, आलापाची जादू अशी होती की, लोकमान्यांनी हे लेखन अर्धवट सोडले आणि ते स्वर्गीय स्वर ऐकण्यासाठी ते वाड्याच्या चौकात आले.स्वतः टिळक महाराज तेथे आल्यामुळे श्रोतेही सावध झाले. लोकमान्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले, ‘अरे हा तर बालगंधर्व आहे.’ हे बालगंधर्व विशेषण नारायणराव राजहंस यांना आयुष्यभर चिकटले, नव्हे त्यांचे मूळ नाव मागे पडून केवळ बालगंधर्व एवढेच त्यांचे नाव प्रचलित झाले. ‘गंधर्व’ म्हणजे काय? असा बालसुलभ प्रश्न छोट्या नारायणाने विचारला तेव्हा ‘स्वर्गातील देवदेवतांसाठी सुरेल गाणारा देव म्हणजे गंधर्व’ असे त्याला सांगण्यात आले. ‘गंधर्व’ या बिरुदाची मोहिनी आजही संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय.

जन्म

            बालगंधर्वांसारखा लोकोत्तर कलाकार शंभर वर्षांतून एकदाच जन्माला येतो. या रंगभूमीच्या बादशाहाने सुमारे चार तपे मराठी मनावर राज्य केलं. नारायण श्रीपाद राजहंस, बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अपवादानेच अभिनय करीत असतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. अशा या सव्यसाची कलावंताचा जन्म २६ जून १८८८ रोजी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात नागठाणे या गावी झाला. सतत शोध घेऊनही बालगंधर्वांना लाभलेले विभूतीमत्व कशामुळे? याचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही असे पु.ल. देशपांडे म्हणतात. याचे कारण म्हणजे बालगंधर्व हे प्रचलित मापदंडापलीकडचे व्यक्तिमत्त्व होते.

रंगमंच प्रवेश

                  ``काय सुरेख गातो बुवा हा बालगंधर्व।'' असे लोकमान्य टिळकांनी उद्गार काढले, आणि त्यांचे हे उद्गार सर्व दूरवर पसरले. त्या दिवशी दै. केसरीतील बातमीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ``नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे गाणे लोकमान्यांनी ऐकून त्यांचे कौतुक केले.'' या बातमीने सर्व नाटक कंपन्यांचे लक्ष्य बालगंधर्वकडे गेले. नारायणरावांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत शाहूमहाराजांच्या सूचनेप्रमाणे प्रवेश केला. गोविंद बल्लाळ देवलांच्या हाताखाली बालगंधर्व नाट्याभिनयाचे धडे गिरवू लागले. परंतु बालगंधर्वांची रंगभूमीवरील कारकीर्द किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेत १९०५ मध्ये सुरु झाली असली तरी किर्लोस्कर संगीत मंडळीची स्थापना ता. ३१ ऑक्टोबर १८८० या तारखेस झाली. स्वत: अण्णासाहेब किर्लोस्कर, शंकरराव मुजुमदार, भाऊराव कोल्हटकर, बाळकोबा नाटेकर हा पहिल्या अमदानीतला नटवर्ग - नंतर केशवराव भोसले, बालगंधर्व व दीनानाथ मंगेशकर. हे तिघेही नट-गायक ‘स्वदेश हितचिंतक’ व किर्लोस्कर संगीत मंडळीच्या अंकावर वाढले. हे तीन चिरस्मरणीय झालेले कलावंत म्हणजे महाराष्ट्राच्या नाट्य-नटेश्वराचे त्रि-नेत्रच होते.

                     पुढे किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेचे एक भागीदार नानासाहेब जोगळेकर यांच्या १९११ मध्ये निधनानंतर संस्थेत वाद झाले. परिणामी १९१३ मध्ये बालगंधर्वांनी, गणेश गोविंद (गणपतराव) बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह ती संस्था सोडली आणि गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. या संस्थेने संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवला. संगीत सौभद्र, मृच्छकटिक, शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, मूकनायक, स्वयंवर, विद्याहरण, एकच प्याला अशा अनेक संगीत नाटकांनी व त्यातील बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकांनी रसिकांवर त्या काळी मोहिनी घातली होती. या नाटकांच्या प्रयोगांबाबत बालगंधर्वांच्या गीतांना २- ३ वेळा वन्समोअर; सातत्याने ‘हाऊस फुल्ल’ होणारे प्रयोग आणि पहाटेपर्यंत चालणारे प्रयोग ह्या गोष्टी नित्याच्याच झाल्या होत्या. त्यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्याबरोबर केलेला ‘संयुक्त मानापमान’ या नाटकाचा प्रयोगही प्रचंड गाजला. त्यांनी एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. साधारण १९१० ते १९३० हा कालखंड रंगभूमीचा, नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो, तो प्रामुख्याने बालगंधर्वांच्या कर्तृत्वामुळेच.

                 आपल्या तान्ह्या कन्येचे निधन झाले असतानाही आपल्या मायबाप प्रेक्षकांची निराशा होऊ नये महणून `मानापमान'चा पहिला प्रयोग त्यांनी रद्द केला नाही. गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस यांच्या बरोबर `गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. पुढे अंतर्गत वादामुळे अन कर्जबाजारीपणाने ती बंद पडली. बॅ. जमनादास मेहता, डॉ. भडकमकर आणि वालचंद हिराचंद यांनी बालगंधर्वांना कर्जमुक्त करण्यासाठी फंड उभारण्याचा निर्णय घेतला पण बालगंधर्वांनी, `देवा माझ्यासाठी फंड जमवू नका, माझ्या चुकीने ते कर्ज झाले आहे, मी ते फेडीन` असे स्पष्ट सांगितले. १९२१ मध्ये कर्जात अडकलेल्या या नव्या कंपनीचे नारायणराव राजहंस हे एकमेव मालक होते. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यापुढच्या सात वर्षांत कंपनीने सर्व देणी फेडली. मात्र त्यापुढच्या काळात या संस्थेची आर्थिक स्थिती चढउताराचीच राहिली. नाटकाच्या प्रॉपर्टीसह अनेक गोष्टींमध्ये दर्जा आणि अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह हेही त्याचे एक कारण सांगितले जाते.

                    बालगंधर्वांनी रंगमंचावर पाऊल टाकले तरी त्यांच्या दर्शनाने हजारो प्रेक्षक अक्षरशः वेडे होत. ते कोणत्याही भूमिकेत आणि कोणत्याही प्रकारची वस्रे परिधान करून येवोत, लोक त्यांच्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहात राहात. अबोध शकुंतला म्हणून येवोत, अर्जुनाच्या प्रेमाने पागल झालेली सुभद्रा म्हणून येवोत, नटखट भामिनी आणि लवलवती वसंतसेना म्हणून येवोत किंवा प्रणय देवता रुक्मिणी म्हणून येवोत किंवा अगदी फाटके लुगडे नेसून येणारी सुधाकराची सिंधू म्हणून येवोत, लोक आपल्या आसनावर ठार खलास होऊन जात. नंतर त्यांचा अभिनय आणि गाणे असे. पण बालगंधर्वांचे प्रथमदर्शनच मुळी किलिंग असे. स्रियांच्या वेषातून पुरुष अशा नजाकतीने वावरायचा की, सौंदर्यवती महिलाही त्यांचे अनुकरण करायच्या. शब्दाचा घाट, त्याचा लाडिकपणा, त्याची अचूक फेक यातून बालगंधर्वांच्या दर्शनाएवढेच बोलणेही प्रसन्न व्हायचे. संवादातून सहजपणे ते गाणे सुरू करायचे. गाणे कसे गावे आणि गाणे कसे ऐकावे हे बालगंधर्वांनी महाराष्ट्राला शिकविले. बालगंधर्व हे नुसत्या गळ्याने कधी गात नसत. ते ओठांनी गात, चेह-याने गात, हसण्याने गात, गालावरच्या खळीने गात, चेह-यावरच्या मिश्किल हावभावाने गात. त्यांचे गद्य बोलणे हेही सुरेल संगीतासारखे सुमधुर वाटायचे. मग ते गायला लागले तर सा-या रंगमंचावर आणि नाट्यगृहात सप्तसुरांचे जणू कारंजे उडत राहायचे. ‘शाकुंतल’ नाटकातील ‘मना तळमळशी’ , ‘सौभद्र’ मधील ‘किती किती सांगू तुला’ , ‘पांडू नृपती जनक जया’ , ‘मानापमान’ मधील ‘टकमक पाही’ , ‘खरा तो प्रेमा’ किंवा ‘मला मदन भासे’ किंवा ‘नाही मी बोलत आता’ , ‘विद्याहरण’ मधील ‘मधुमधुरा गिरा मोहना’ , ‘मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला’ , ‘स्वयंवर’ मधील ‘नाथ हा माझा’ , ‘सुजन कसा मन चोरी’ , ‘मम आत्मा रमला’ , ‘संशयकल्लोळ’ मधील ‘संशय का मनी आला’ किंवा ‘मजवरी तयांचे प्रेम खरे’ , ‘एकच प्याला’ मधील ‘कशी या त्यजू पदाला’ , ‘सत्य वदे वचनाला नाथा’ अशी पदे म्हणजे रागदारी आणि सुगम संगीताचा अमृतानुभव असे.

                 ``कशी या त्यजू पदाला'' `सत्य वदे वचनाला नाथा' `प्रभू अजि गमला' काय आठवतात का ही गाणी? नाही म्हणणारच हो. पण ती तुमच्याआमच्या वडिलांच्या पिढीची गाणी म्हणून दुर्लक्षून कस चालेल. ही गाणी तिचे गायक, बालगंधर्व हे तर अवघ्या महाराष्ट्राचे भूषणच होते. `दादा ते आले ना` हा डायलॉग तर त्याकाळी घरोघर पोहोचला होता. स्वयंवर नि एकच प्याला एका पाठोपाठ रंगभूमीवर आली. स्वयंवरातली ही हाक कृष्णदर्शनासाठी अधीर झालेली, बावरलेली रुक्मीणीची पहिलीच एंट्री प्रेक्षकांना जिंकून जाई. `काय कला ही सदना आली', त्या मदन मनोरम रुपी', माडीवरी चल ग गडे, `प्रियासी रमवाया जाऊ' हे प्रत्येक पद अभिनयात भिजून जो तो प्रसंगी डोळ्यासमोर उभा राही.

         १९३१ साली रत्नाकर मासिकाचा `बालगंधर्व' विशेषांक प्रसिद्ध झाला होता. संशयकल्लोळमधील बालगंधर्वांची भूमिका हीच पहिली सामाजिक भूमिका त्यांची अल्लड, किंचित हट्टी `रेवती' रसिकांच्या विशेषत: तरुणांच्या मनात प्रेयसींचे चित्र उभारुन गेली. `मजवरी तयांचे प्रेम खरे' `संशय का मनी आला, ` `नित्य जीवनक्रम आमुचा` अशी कितीतरी पदे लोकांच्या तोंडी घोळू लागली. बालगंधर्व मात्र म्हणत, ``आपण मला बालगंधर्व म्हणता पण मायबाप हो, मी अजून खरोखरच बाल आहे. अजून मला कितीतरी शिकायचे आहे.' नाट्यसृष्टीत अनेक नायिका आपल्या अभिनयाने साकार करणारे बालगंधर्व एरवी सुध्दा विनम्र आणि गोड बोलत.

                  भाऊराव कोल्हटकरांच्या १९०१ मधील निधनानंतर जेंव्हा संगीत नाटक परंपरेला उतरती कळा आली, त्यानंतर बालगंधर्वांनी या परंपरेत मोलाची भर घालत ती पुढे नेण्याचे महत्वाचे कार्य केले. बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारतानाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली.

                   १९३३ च्या सुमारास बोलपटांचे युग सुरू झाले. साहाजिकच रंगभूमीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. बालगंधर्वांनीही प्रभातच्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटात संत एकनाथांची भूमिका केली. ‘पण प्रेक्षकांशी थेट संगीत संवाद साधणारा बालगंधर्व यांच्यासारखा कलाकार या प्रसार माध्यमात रमला नाही. तीन मिनिटांमध्ये नाट्यगीत किंवा अभंग बसविणे आणि त्याची रेकॉर्ड काढणे बालगंधर्वांना त्रासदायक वाटू लागले. बोलपटात त्यांचे मन रमेना. मात्र नंतरच्या ध्वनिमुद्रिकाद्वारे गायक घरोघरी जाऊ लागले, आकाशवाणीमुळे रेडिओ घरोघरी आले. तरीही त्यांचा ओढा रंगभूमीकडेच राहिला. १९३९ च्या सुमारास त्यांनी रंगभूमीवर पुरुष भूमिका साकारल्या. त्यामुळे स्त्री भूमिकांसाठी महिला कलाकारांची गरज निर्माण झाल्यानंतर एप्रिल १९३८ मध्ये गोहर कर्नाटकी यांचा गंधर्व नाटक मंडळीत समावेश झाला. गोहरबाईनी चित्रपटांतूनही भूमिका केल्या होत्या. मात्र मराठी रसिकांनी गोहरबाईनां स्वीकारले नाही. बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकाच प्रेक्षकांना जास्त प्रिय होत्या. बालगंधर्वांच्या पुरुषी भूमिका स्वीकारायची लोकांची तयारी नव्हती. यानंतर मात्र रंगभूमीचा एक सम्राट जणू त्याचे कलेचे राज्य खालसा झाल्याप्रमाणे वावरू लागला.

राजहंस माझा निजला

                    कान्होपात्रा नाटकातील, `अवघाची संसार`, `पतित तू पावना` इ. गीते म्हणताना शक्ती खर्च होई म्हणून ते प्रत्येक प्रवेशानंतर ते एक ग्लासभर दूध घेत. माझ्या मायबापांसाठी मला अक्षरश: माझे रक्त आटवावे लागते याची कल्पना इतरांना येत नाही. असे ते म्हणत. अशाच एका मुक्कामात बालगंधर्वांना खूप खोकला झाला डॉक्टरांनी त्यांना, अति दूध पिणे बंद करा, असे सुचविले.चहा घ्या खूप बरं वाटेल तुम्हाला. बालगंधर्व हसले आणि म्हणाले. दादा गेले (लोकमान्य टिळकांना ते दादा म्हणत) त्या दिवसापासून चहा सोडला आहे. चार दोन वर्षे आणखी जगण्यासाठी चहा घेऊ? १९५५ रोजी त्यांनी एकच प्याला नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली.

                   गोहरबाईने अपंग झाल्यावरही बालगंधर्वांना सांभाळले. अखेरच्या काळात गोहरबाई आचार्य अत्रे यांना ‘शिवशक्ती’ मध्ये भेटत असे आणि आपण किती काळ बालगंधर्वांची सेवा करायची असे विचारीत असे. बालगंधर्वांची हार्मोनियम आचार्य अत्रे यांनी गोहरबाईकडून विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवली होती. पुढे गोहरबाईचे निधन झाले आणि गोहरबाईच्या निधनानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १५ जुलै १९६७ या दिवशी वयाच्या ७९ वर्षी जीवनाच्या रंगमंचावरून कायमची या अभिनयसम्राटाने  निवृत्ती घेतली.

पुरस्कार

                     १९२९ सालच्या २४ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. १९२९ साठी पुणे येथे झालेल्या नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. १९४४ ला नाट्यशताब्दी महात्सवाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. १९५५ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचे राष्ट्रपतीपदक मिळाले. १९६४ साली त्यांना पद्मभूषण मिळाले. महात्मा गांधींनी ज्यांना मुंबईत बोलावून त्यांचे गाणे ऐकले, राजधानी दिल्लीत पंतप्रधान नेहरू यांची दोन तासांची मैफिल ऐकून गेले.

                   नाटकांमधील त्यांची अनेक पदे गाजली. शास्त्राचा बाज राखून, अभिनयाला अनुकूल असे गाणे त्यांनी गायले. त्यांची गाणी घरोघरी पोचली. नाट्यसंगीताच्या माध्यमातून बालगंधर्वांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला हातभार लावला. एका अर्थाने त्यांनी शास्त्रीय संगीत सोपे करून रसिकांसमोर मांडले. नाट्यसंगीताची अभिरूची सामान्य रसिकांमध्ये निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालगंधर्वांनी केले. आपल्या हयातीतच आख्यायिका बनून राहिलेल्या या असामान्य कलाकाराची स्मृती रसिकांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने जतन करून ठेवली आहे. १९६८ साली पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिर हे नाट्यगृह त्यांचे स्मृतीमंदिर तयार केले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी यात पुढाकार घेतला होता, तर त्याचे उद्घाटन आचार्य अत्रे यांनी केले. खुद्द बालगंधर्व हयात असताना त्यांच्याहस्ते जिमखान्यावर या वास्तूसाठी भूमिपूजन झाले होते. सांस्कृतिक पुण्याचे केंदबिंदू मानले जाणारे बालगंधर्व रंगमंदिर २६ जून रोजी चाळीशी पूर्ण करत असून बालगंधर्व उर्फ नारायणराव राजहंसांचा हा १२० वा जन्मदिन आहे.

अशा या सव्यसाची कलावंताला कोटी कोटी प्रणाम अन् मनाचा मुजरा

संकल्पना व शब्दांकन : निवेदिता पाटील
माहितीस्त्रोत : अंतरजाल 

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

  1. tu itka abhyas kartes kadhi g. itake kase kuni lihi shakate. kharach tu gr8 ahes. mottya vyakti baddal lihayala pan daring lagate

    ReplyDelete
  2. keval apratim...... surekh shabdankan ....

    ReplyDelete
  3. आभार मित्र-मैत्रिणीनो!

    लेखाला भार्बाह्रून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................