ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता, लक्ष द्या हो विनविते, मराठी तुमची माता..............................


२७ फेब्रुवारी हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन  आपण सारे मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतोय. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विचार केला कि, " पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका." हा त्यांचा पटका आठवतो. कारण गांभीर्याने विचार केला कि ह्या पटक्यात कुसुमाग्रजांनी मराठीची दैन्यावस्था मांडली हे जाणवते. आपल्या शासनाने त्यातल्या काही ओळी शिधापत्रिकेवर छापल्या, आणि कर्तव्य पूर्तीचा श्वास घेतला. पण मराठीचे दशावतार आजही संपले नाहीत. मराठी भाषेची उपेक्षा आधी संस्कृतकडून आणि आता इंग्रजीकडून होत आहे. ह्या भाषेच्या जन्मापासून हि भाषा लढते आहे. तिचा लढा अखंड चालू आहे. तो अजूनही संपलेला नाही; पण ज्या अर्थी भाषा लढत आहे आणि अजूनही टिकून आहे त्या अर्थी हि भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवेल. मराठी भाषा दिनानिमित्त घेतलेला हा आढावा. मराठी बद्दल लिहितेय पण लेखाची सुरवात काय करू? आरंभापासून प्रारंभ करू कि प्रारंभापासून आरंभ करून सुरवात करू तेच कळत नव्हते कारण आमची मराठी अनादी अनंत आहे.


भाषा म्हटले कि ती नदी सारखी असते. जमिनिच्या पोटातून अचानक उसळलेला पाण्याचा उद्रेक ओसंडून पुढे जाऊ लागतो आणि बघता - बघता त्याचा प्रवाह होतो. अडचणीतून वाट काढत पुढे जाताना त्याचा विस्तार वाढत गेला त्याची होते नदी - अखंड वाहणारी दोन्ही काठांना समृद्ध करणारी! मनातील भावनांचा उद्रेक अचानक शब्दरूप घेऊन बाहेर पडतो  आणि बघता - बघता त्याची भाषा होते. मनतील भावना, विचार नेमका व्यक्त करताना येणारे अडथळे ओलांडत नव्या शब्दांची देवाण - घेवाण होताना येणाऱ्या अडचणीतून वाट काढत जाताना शब्द संख्येचा विस्तार होत जातो. सामर्थ्य वाढत जाते आणि शब्दांची भाषा होते - अखंड वापरली जाणारी, ती वापरणाऱ्या मानव समूहाला सांस्कृतिक समृद्धी देणारी!!!अनेक छोटे - मोठे  जिवंत झरे, जागोजागी नदीला येऊन मिळतात आणि तिच्या जल संपत्तीत मोलाची भर घालतात. नदीच्या पात्रात इतर झरयांबरोबर मिसळून मूळ नदीचा स्त्रोत अधिक रुंदावतात. नदीची खरी ताकत ह्या झरयांमध्ये साठलेली असते. तसेच जागोजागच्या बोली भाषा, प्रमाण भाषा, हे भाषेला जिवंतपणा प्रदान करतात. तिचे सामर्थ्य वाढवतात. मराठी भाषेचा अभिमान ओवी, अभंग, लावणी, पोवाडा, पटका, कथा, कादंबर्या, अश्या अनेक रचनांतून व्यक्त झालेला आपण पाहत आलोत. आज मराठीच्या वेगवेगळ्या बोलींमधून लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून  उत्स्पुर्त, जिवंत शब्दांचे झरे प्रमाण भाषेच्या प्रवाहाला समृद्धी देतात. मात्र इंग्रजी - हिंदी च्या प्रभावामुळे त्या भाषांतील शब्दांचा, वाक्य  रचनेचा अकारण आणि अतिरेकी वापर मराठी भाषेचा प्रभाव दुषित करत आहेत.  

आज प्रामुख्याने मराठीची तुलना इंग्रजीशी  होत आहे. इंग्रजी ही पोटाची भाषा आहे आणि मराठी ही आत्म्याची भाषा आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी आपण आपला आत्म्याचा आवाज दाबत आहोत. इंग्रजी हि ज्ञानभाषा जागतिक स्तरावर स्वीकारली गेल्यामुळे तिचा प्रभाव सगळीकडे, वाढताना दिसतो आहे. त्याला महाराष्ट्रही  अपवाद नाही. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याची तीव्र इच्छा आपल्या मनात असणे आज काळशी सुसंगत आहे. परंतु " इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मराठीकडे आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल." हा मात्र अतिशय घातक समज आजच्या सुशिक्षित समाजात पसरत चाललाय. १५० वर्षाच्या इंग्रजांच्या पारतंत्र्याची राजवट आजही न संपल्याची हि लक्षणे दिसून येत आहेत. "ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता, लक्ष द्या हो विनविते, मराठी तुमची माता" असा टाहो फोडण्याची वेळ मराठीची आहे.

आज संगणकाने आणि अंतरजालाने सारे जग जवळ आणले आहे आणि शेकडो भाषा यूनिकोड (पर्यायी मरठी शब्द माहित नाही) द्वारे एकत्र गुंफल्या आहेत. भाषा आणि नदी यामधले साम्य येथेही आढळते. कारण लहान मोठी कोणतीही नदी हि शेवटी समुद्रातच विलीन होते. आज सर्व भाषा एकमेकीत अश्याच मिसळून जात आहेत. मात्र जसे समुद्रात मिसळण्या पूर्वी प्रत्येक नदीला स्वतंत्र अस्तित्व असते त्याच प्रमाणे भाषेलाही तिचे स्वतंत्र अस्तित्व असते आणि हा स्वतंत्र प्रवाह जितका समृद्ध असेल तितका विश्वभाषेत तिच्या शब्दांचा भरणा अधिक. 

अनेक शतकांची समृद्धी लाभलेली मराठी भाषा आज संगणकाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचू शकते किंबहुना ती पोहोचवली जाते. पण यूनिकोड मध्ये तिच्या वैशिष्ट्याना जागा मिळायला हवी. ती मिळावी असा आग्रह, आपण  आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहोत का ?  "कितीजण मराठी भाषा वापरतात ? ह्या प्रश्नाला उत्तर देताना दरवर्षी हि संख्या घटणार असेल तर जगामधल्या समृद्ध भाषेमध्ये  जिची गणना होते अशा मराठीचे उद्याचे भवितव्य काय ? आपल्या मातृभाषेवरील प्रेम फक्त मनात ठेवून चालणार नाही ना!  पुढच्या पिढीला मराठीचे महत्व तिची गोडी आपणाला पटवून द्यावी लागेल तरच  उद्याच्या जगात मराठीचे स्वतंत्र अस्तित्व टिकून राहील व विश्वभाषेतही तिला महत्वाचे स्थान मिळेल. तसे न करता जर आपण तिच्याकडे पाठ फिरवली तर तिची "सरस्वती नदी" होऊन जाईल व आपणास म्हणावे लागेल 

" ज्ञानदेवे गीता सांगितली | तुकारामांची गाथा तरंगली|
तेथेच मराठीस कोणी ना वाली| फोडीयेला टाहो||"

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

 1. निवी,
  मराठी भाषा दिनी उत्त्म लेख...

  >> पण यूनिकोड मध्ये तिच्या वैशिष्ट्याना जागा मिळायला हवी.
  हे खेरे..
  इतर भाषांसोबत पुढे जाण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

  ReplyDelete
 2. इंग्रजी हि पोटाची भाषा आहे आणि मराठी हि आत्म्याची भाषा आहे. wah farach chhan........

  ReplyDelete
 3. Kharach khup chhan lihile aahe....!!!

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

२६/११ च्या निमित्ताने....................................