पर्यावरण संवर्धन...................

माझ्या भाषणाची original script जशी च्या तशी देत आहे.

आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपिठा समोरील आदरणीय ज्ञाते श्रोते आणि वक्ते मी आपण समोर विषय मांडत आहे पर्यावरण संवर्धन. द्रोणागिरी स्पोर्ट्स ची स्पर्धा जाहीर झाली. त्यात दिलेली तीनही विषय वाचल्यावर मला प्रश्न पडला कि मी कोणत्या विषयावर बोलू. मलाच कळत नव्हते विषय काही निश्चित होईना आणि अचानक मी दूरदर्शन वर लागलेला हुप्पा हुया हा चित्रपट पहिला त्यामधला धरणी माय हा एक पात्री संवाद ऐकला आणि वाटलं पर्यावरण संवर्धन ह्याच  विषयावर आपण बोलायचं विषयाला सुरवात करण्यापूर्वी धरणी माय चा एक पात्री संवाद म्हणावसं वाटतोय करणं त्याशिवाय हे भाषण  पूर्णच होऊ शकत नाही 

"अरे धरणी मातेचं रडणं आणि दुखणं समजून घे मेरे भाय
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?
दिसलं ती जमीन कसून घेतो, रस समदा शोषून घेतो 
माय मारू दे,
फायद्याची इकडे साम्द्यानच झाली घाय
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?
कारखान्याच्या चिमणीतून धूर भसाभसा 
वरती समद पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा 
वर्षातले १२ महिने कडक उन्हात जय 
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?
Global Warming वाले म्हणत्यात 
Global वार्मिंग म्हणजे पृथ्वीच वाढत चाललेला तापमान 
Global Warming वाले म्हणत्यात 
हळू जरा धरा धीर
आम्हाला काहीच ऐकू येत नाही कान आमचे बधीर 
तापत चाललंय धरणीचा डोकं, छाती, पोट अन पाय,
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?
असाच चालू राहिला तर आपली काही खैर नाय 
उद्या जाऊन आपलंच पोरगं आपल्याला इचारलं 
बाबा - बाबा हिरवळ म्हणजे काय ?
अरे उठ , वाचव आपल्या आईला झटकून हात अन पाय 
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?

खरं आहे ना मित्रानो काय करतो आपण आपल्या धरणी मातेसाठी सगळीकडे प्रदूषण वाढवून ठेवलय त्यामुळे पर्यावरण हानी होत आहे. तसे बघितले तर   पृथ्वीवरील सार्‍या सजीव सृष्टीचा आधार हे येथील पर्यावरण आहे. पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर व विश्वात इतरत्र असे पर्यावरण नाही. त्यामुळे येथील पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे मानव जातीस नव्हे तर सर्व सजीव सृष्टीस अत्यावश्यक आहे. कोट्यावधी वर्षांच्या स्थित्यंतरानंतर येथील हवा, पाणी व जमीन यांचे असे पोषक वातावरण झाले असले तरी गेल्या काही दशकात मानवी उद्योगांमुळे त्यात बरेच हानीकारक बदल होऊ लागले आहेत.
वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगधंदे आणि जंगलाचा नाश करुन वाढलेली शेती यामुळे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीत घट होत आहे. तसेच हवा, पाणी व जमीन यांच्या प्रदूषणाचा प्रश्न वाढत चालला आहे. या जगाची वाटणी श्रीमंत देश आणि अविकसित गरीब देश अशा दोन गटात करण्यात येते. विकसित देश नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर दरडोई खूपच जास्त करतात परंतु तेथील लोकसंख्या मर्यादित आहे. याउलट अविकसित देशात गरिबी व मोठी लोकसंख्या यामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती कमी वापरूनही पर्‍यावरणाचा र्‍हास जास्त होत आहे. पर्यावरण रक्षण की गरिबी ऊन्मूलन या दुहेरी पेचात हे देश सापडले आहेत. संपन्न राष्ट्रांकडून या राष्ट्रांवर पर्यावरणासाठी कडक निर्बंध पाळण्याचे दडपण येत आहे. परंतु बेरोजगारीवर मात करण्यासाठी औद्योगिकीकरण, वाढ्त्या लोकसंख्येसाठी जंगलतोड व शेती आणि निसर्गसंपदाच पैसे मिळविण्याचे साधन झाल्याने या देशात पर्यावरण रक्षणाचे काम बिकट बनले आहे.
कारखान्यातून बाहेर पडणारा धूर व स्वयंचलित वाहनातून पेट्रोल जाळण्याने निर्माण होणारा दूषित वायू, शिसे व काजळी यामुळे हवा प्रदूषित होत आहे. उद्योगधंदे व शहराच्या सांडपाण्यामुळे जमिनीवरील नदी, तलाव यांचे पाणी दूषित होत आहेच. शिवाय जमिनीखाली असणार्‍या पाण्याचेही प्रदूषण होत आहे. शेतीसाठी पाण्याबरोबर वापरली जाणारी रासायनिक खते पाणीप्रदूषणास कारणीभूत तर आहेतच. शिवाय शेतीसाठी अतिरिक्त पाणी वापरल्याने जमिनीत क्षार वाढून मीठ फुटण्याचे व सारी जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. पायाभूत विकासासाठी होणारे प्रकल्पही पर्यावरणाच्या नव्या समस्या निर्माण करीत आहेत. मोठ्या धरणांमुळे शेकडो एकर जंगले पाण्याखाली जाणे, धरणग्रस्तांच्या जमिनी व घरे पाण्याखाली जाण्याने त्यांचे विस्थापन करण्याची समस्या त्या प्रकल्पाच्या उभारणीत महत्वाचा अडथळा ठरली आहे. जंगलातून जाणारे मोठे महामार्ग जंगलातील प्राण्यांच्या सुरक्षिततेला आव्हान ठरत आहे.
माणसांच्या गरजा वाढल्यामुळे त्यांच्या विकासाचा वेगही त्यानुसार वाढविण्याची धडपड सर्वत्र चालली आहे. मात्र हा विकास करताना आपण पुढील विकासाच्या सर्वच संधी नाहिशा करून टाकीत नाही ना याविषयी माणूस फारसा विचार करताना दिसत नाही. आजची गरज भागली म्हणजे झाले. उद्याचे कोणी बघितले ? अशी वृत्ती झाली आहे व ती पर्यावरणास घातक आहे. शेतकर्‍यास जमीन चांगली ठेवण्यासाठी पिकांची फेरपालटी घ्यावी, पाण्याचा व रासायनिक खतांचा कमी वापर, ऊसासारख्या नगदी परंतु जास्त पाणी लागणार्‍या पिकांऎवजी दुसरी पिके घ्यावी असे कितीही सांगितले तरी ते सहसा पाळले जात नाही. जमीन नापीक होत चालली आहे हे पाहूनही त्यात बदल होत नाही. त्वरित लाभ मिळविण्याच्या हव्यासापोटी दूरदर्शी योजनेकडे दुर्लक्ष होते. जे शेतकर्‍यांचे तेच उद्योगधंद्यांचे. उत्पादनखर्चात बचत करण्यासाठी सांड्पाण्यावर प्रक्रिया करण्याकडे चालढकल केली जाते. नगरपालिका / महानगरपालिका यांना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणेचा खर्च व ती चालविण्यासाठी लागणार्‍या विजेचा खर्च झेपत नाही. साहजिकच प्रदूषण वाढतच जाते. जुन्या गाड्यांमुळे प्रदूषण होते. त्यामुळे त्यांच्या वापरास बंदी, किंवा पेट्रोल, डिझेलऎवजी प्रदूषणरहित इंधनाचा वापर याची कायद्याने सक्ती केली तरी त्याची अंमलबजावणी मुष्किल होते.
एकंदरीत काय ? नैसर्गिक साधनसंपत्तीचे भांडार असणारे पर्यावरण आपल्या साहाय्यास सज्ज असताना सोन्याची अंडी देणारी कोंबडीच कापणार्‍या लोभी माणसाप्रमाणे आपण पर्यावरणाचे अतोनात व भरून न येण्यासारखे नुकसान करीत आहोत.यावर काही उपाय आहे का ? पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी विकास थांबवावा म्हटले तर वाढत्या गरजा भागविणे अवघड होणार व विकास केला तर पर्यावरण दूषित होणार. तसाही  पर्यावरण संवर्धन म्हणजे जैसे थे परिस्थितीच कायम ठेवणं, असं नव्हे. तसा आग्रह धरला जातो कारण पर्यावरणात होणारा बदल आणि पर्यावरणाची हानी यात नेहमीच गल्लत केली जाते. कोणताही विकास प्रकल्प उभा करायचा तर पर्यावरणात बदल होणं क्रमप्राप्त आहे. साधा रस्ता बांधायचा तर जैसे थे परिस्थिती ठेवून तो बांधला जाऊ शकत नाही. वाटेत येणाऱ्या प्रत्येक वृक्षाला वळसा घालूनच पुढं जाणंही व्यवहार्य ठरत नाही. पण त्यापायी घटलेल्या वृक्षराजीच्या जागी नवीन वृक्षारोपण केल्यास पर्यावरणाची हानी होत नाही. यासंबंधीचे नियमही आहेत. त्यांची कडक अमलबजावणी करण्याचा आग्रह धरता येतो. पण चुकीच्या गृहीतापायी रस्ताच नको असा पवित्रा घेणं कितपत समंजसपणाचं होईल? 
ह्या  सर्व समस्यांवर नियोजनबद्ध चिरंतन विकास हे यावर उत्तर आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीतकमी वापर करणे, अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे, प्रदूषण नियंत्रणासह विकासयोजना आखणे व टाळता न येण्याजोग्या पर्यावरण हानीबद्दल भरपाई म्हणून पर्यावरण संवर्धनाची योजना प्रकल्प आराखड्यात समाविष्ट करणे या गोष्टी केल्या तर पर्यावरणाचा दर्जा आपण टिकवू शकू.
गाव, जिल्हा, नदीचे खोरे वा कोणताही विधिष्ट भूभाग यातील विकासाचे नियोजन करताना त्या भूभागावरील पर्यावरणाचे व नैसर्गिक साधनसंपत्तीची क्षमता विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच हवा, पाणी, जमीन या घटकांची प्रदूषके सामावून घेण्याची श्क्ती ही मर्यादा धरली तर त्या धोकादायक मर्यादेपेक्षा खाली आपल्या आजच्या व भविष्याच्या विकासामुळे होणार्‍या प्रदूषणाचे प्रमाण राहील अशी आपण काळजी घेतली पाहिजे. आपले जीवनदायी पर्यावरण हा पूर्वजांकडून मिळालेला मालकीहक्काचा वारसा नसून आपल्या पुढील पिढ्यांकडून उसना घेतलेला ठेवा आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. कर्ज जसे व्याजासह परत फेडावे लागते तसे हे पर्यावरण अधिक सुखदायी व सुरक्षित कसे करता येईल हे आपण पाहिले पाहिजे. आपल्या मुलाबाळांच्या विकासाच्या आशाआकांक्षा उमलतील असे पर्यावरण निराम्न कारणे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी आपण जास्त काही नाही थोडं दक्ष राहिला पाहिजे. 
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

  1. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. पण दुर्दैवाने आपल सरकार, सरकारी यंत्रणा एवढच काय तर सर्वसामान्य जनता सुध्दा याबाबतीत उदासीन आहे.

    माणसाने विकासाची कितीही क्षितीज गाठली तरी तो निसर्गाच्या पुढे कधीच जाउ शकत नाही या वास्तवाची जाणीव होण गरजेच आहे.

    अतिशय संवेदनशील असा विषय..खुप योग्यपुर्ण अशी मांडणी.

    ReplyDelete
  2. very very good talk

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

नमन नटवरा!!!!!!!!!!!