द्रोणागिरीच्या माथ्यावरून

मित्रानो गेल्या रविवारी द्रोणागिरीच्या डोंगरावर जाण्याचा योग आला. तसा तो दरवर्षी येतो त्यात काही विशेष नाही. मी लहान असताना आमच्या मातोश्रींना विचारले होते आपण इतक्या वर जाण्याचे कष्ट का घेतो ? त्यावेळी त्यांनी सांगितले होती कि इथे आपल्या कुळाचा मूळ पुरुष म्हणजे वेताळ देव राहतो. त्याची वर्षातून एकदा तरी सगळ्यांच्या उपस्थितीत पूजा व्हावी म्हणून सगळे जातोय. ह्या वर आम्ही पुढचा प्रश्न विचारला " देवाला की दुसरी जागा भेटली नाही का? इतक्या वरती जंगलात का राहायला गेला ? त्यावर मातोश्री डोळे वटारून म्हणाल्या " कार्टे गप्पं बसतेस का आता .............;इतके ऐकूनच आम्ही गप्पं बसण्याचा निर्णय घेतला तो आजतागायत डोंगरावर चढताना कायम असतो. तिकडे गेल्यावर निदर्शनास आले कि फक्त आपणच नाही तर आजूबाजूच्या खेड्यातील लोक पण तिकडे पूजेला येतात. अश्या परिस्थितीत मनात आणखी प्रश्न कि वेताळ देव आमच्या  कुळाचा मूळ पुरुष मग ती लोक का पूजा करतात ( फक्त मनातच ) जाऊ दे असे बरेचसे प्रश्न आहेत. 


द्रोणागिरी संदर्भात बोलायचे झाले तर ह्या डोंगराची निर्मिती कशी झाली त्याबद्दल एक कथा सांगितली जाते (दंतकथा )  असो. ती कथा अशी आहे की राम आणि लक्ष्मण लंकेच्या स्वारीवर असताना; रणांगणावर  मुर्च्छित पडलेल्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमंताला हिमालयातील द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी बूटी आणायला सांगितली. हनुमंताने लगेचच उड्डाण केले व् त्या पर्वतापर्यंत पोहोचला; परंतु त्या पर्वतावर असणाऱ्या वनास्पतिंपैकी संजीवनी बूटी कोणती हे हनुमंताला कळत नव्हते व् त्याने अधिक उशीर केला तर लक्ष्मणाच्या जीवास धोका होता म्हणून मग जास्त विचार ना करता हनुमंताने तो पर्वतच सरळ हातावर उचलून धरला व् लंकेच्या दिशेने प्रयाण केले तो पर्वत नेत असताना काही ठिकाणी त्याचे तुकडे पडले त्या तुकड्या पैकिच हा एक तुकडा आणि द्रोणागिरी पर्वताचा तुकडा म्हणून ह्याला पण द्रोणागिरीचा डोंगर म्हटले जाते. आज ही ह्या  डोंगरावर संजीवनी बुटिचा वृक्ष आहे असे म्हटले जाते ( आपल्याला माहित नाही बुआ


द्रोणागिरी डोंगराची निर्मिती रामायणाच्या काळात झाली असली तरी आमचा देव तेथे केव्हापासून वास्तव्यास आहे माहित नाही आणि तस पण हा द्रोणागिरी उरण च्या रक्षणासाठि ठाम पणे उभ आहे. रस्त्यावरून जाता - येता दर्शन घडत तेव्हा बघितले तर हा डोंगर एका प्रचंड मोठ्या बसलेल्या हत्ती प्रमाणे दिसतो. त्याचा विस्तारही प्रचंड आहे. जसे - जसे वरती चढात जातो त्याचा विस्तार कळत जातो. ( माझे दिशा ज्ञान कच्चे असल्याने दिशा संगता येत नाही. ). डोंगराच्या एका भागात आमच्या देवाचे देऊळ आहे.. देवाची पूजा - अर्चा केली जाते. (आमच्या देवाला फ़क्त गोड पदार्थ दाखवावे लागतात नैवद्य म्हणून . कोंबडयाचा मान त्याचे रक्षण करणाऱ्या सैनिकाना द्यावा लागतो.) मान - पान अटोपले की ते कोंबड आम्ही शिजवून त्याचा प्रसाद म्हणून खातो. पण त्या आधी डोंगर चढून थकलेल्या पायाना विश्रांती देण्यासाठी आमची पाऊले वळतात ती डोंगराच्या दुसरया भागात असलेल्या किल्ल्यावर  . 

ह्या डोंगरावरचा किल्ला फार पुरातन नसला तरी पोर्तुगीज कालीन आहे.  किल्ल्यावर जताना  एकाठिकाणी उतरत जाणाऱ्या  पायऱ्या दिसून येतील; ह्या पायऱ्या उतरून गेल्यावर एक प्रवेशव्दार दिसेल. प्रवेशव्दार म्हणजे दगडात कोरलेली कमान त्याच्या मध्यभागी बसवलेला गणपति खाली पुन्हा उतरत जाणाऱ्या  पायऱ्या प्रवेशव्दाराच्या आतील बाजुस छोटेखानी देव्हाऱ्यासारखे घुमट अशी रचना आहे ( आता ह्या सगाल्याचे अवशेष शिल्लक आहे. गणपति कमानीपासून वेगळा झाला असून आता त्याला त्या  छोटेखानी घुमटात ठेवण्यात आला आहे.) ह्या चे बांधकाम कधी झाले याची ही एक दंतकथा आहे.  ती अशी की पांडवाना एकविरा माता प्रसन्ना झाली, त्यानी तिचे मंदिर बंधावयाचे ठरविले.  मंदिर  बांधताना महत्वाची अट होती की ते एका रात्रीत बांधले गेले पाहिजे. पण प्रवेशव्दाराचे काम झाले अणि पहाट झाली, म्हणून ते काम अर्धवटच राहिले. (पुढे ते मंदिर  पांडवानी कर्ल्याला बांधले. ) पण आता त्या प्रवेश व्दारातुन जो किल्ला दिसतो तो पोर्तुगीज कालीन आहे. कारण डोंगराच्या ह्या टोकावरून संपूर्ण उरण तालुका, मुंबई ते उरण हा समुद्र मार्ग ह्या वर व्यवस्थित नजर ठेवता येते. म्हणूनच त्यानी तो किल्ला बांधला होता. आज त्या किल्ल्याची पडझड झाली असली तरी तो आजही त्याच्या भक्कमपणाची साक्ष देतो आहे. (आता काही बुरुज ढासळलेले  असले तरी तो उन - पाउस सहन करून पण गेली कित्येक वर्ष उभा आहे. ) आज ह्या ठिकाणी ONGC प्रोजेक्ट च्या रक्षणा साठी दोन सेंट्री तैनात असतात. ( येथून संपूर्ण ONGC प्रकाल्पावर नजर ठेवता येते; तसेच समुद्र मार्गे होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवता येते.


ह्या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशीष्ठ्य म्हणजे इथे असणारा पाण्याचा हौद . जमिनीच्या १५ फूट खाली असला तरी इथले पाणी विहिरीच्या पाण्यासारखे मचुळ लागत नाही. कितीही उन असेल तरीही इथले पाणी गार लगते. पूर्वी हा हौद काठो - काठ भरलेला असे आता त्याची पातळी कमी झाली आहे.  हौदा शेजारीच चर्च ची पड़की ईमारत आहे. अस्तित्वात  असलेल्या माहिती अनुसार तरी १९६५ ते १९७० पर्यंत तेथे चर्च चे अस्तित्व होते. दर रविवारी होणारी प्रार्थना पण तिकडे होत असे त्याच प्रमाणे येथे जात्रा ही भारत असे नंतर येथे सिड्को व् ONGC आल्याने चर्च खाली हलवले गेले. आज चर्च पड़की ईमारत देखिल त्याच्या भव्यतेचा इतिहास सांगते आहे. 


अश्या ह्या द्रोणागिरिची पूर्वीची चढ़न बंद करून नविन पायवाट तयार केली आहे. त्यावरून चढताना दमछाक होते आणि उतरताना घसरण .


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Comments

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

२६/११ च्या निमित्ताने....................................