Friday, May 28, 2010

"ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला,

                      "ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला," ह्या गीताचे शताब्दी पुरती वर्ष तसेच; हे गीत रचून महासागराला साकडे घालणाऱ्या महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना मनाचा मुजरा. २८ मे १८८३ साली दामोदरपंत आणि राधाबाई या दाम्पत्याच्या  पोटी नाशिक जिल्ह्याच्या भूगुर गावी ची. विनायकचा ( आदरार्थी एकवचन) जन्म झाला. त्यांचे घराणे इनामदारांचे. घरी समृद्धी, म्हणजे ' देशभक्तीचे' फुकटचे श्राद्ध घेण्याची त्यांना अजिबात गरज नव्हती, पण देशभक्ती त्यांच्या नसानसांत भिनलेली होती. पारतंत्र्याची साल त्यांना शांत झोप देत नव्हती. ' मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' म्हणजे स्वातंत्र्यवीरांचे असामान्यत्व त्यांच्या बालवयात दिसून आले. त्यांची बुद्धी शीघ्र व तल्लख, आकलनशक्ती जबरदस्त. ९/१० वर्षाचे असताना ते वृत्तपत्रीय वार्तांवर मित्र मंडळीत चर्चा करीत. लहानपणी त्यांची आई वारली. त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न न करता त्यांचे मातेच्या वात्सल्याने  संगोपन केले. १८९७ साली वयाच्या १४ व्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी ते नाशिकला आले. तेथील गणेश उत्सवातून त्यांनी देशभक्तीच्या चळवळीस प्रारंभ केला. त्याच साली चाफेकर बंधूना Rand  ह्या गोऱ्या साहेबाच्या हत्येबद्दल फाशीची शिक्षा झाली. सावरकरांच्या मनात देशभक्तीचा अंगार फुलविण्यास हि गोष्ट विशेषत्वाने कारणीभूत ठरली. या प्रसंगानातर वयाच्या १५ व्या वर्षी कुलस्वामिनी पुढे ' सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने भारतमातेला स्वतंत्र' करण्याची शपथ घेतली आणि १८९९ साली ' राष्ट्रभक्त समूह' आणि 'मित्रमेळा' नावाच्या क्रांतिकारी गुप्त संघटना काढल्या, तसेच शिवजयंती, गणेश उत्सव आदी अनेक कार्यक्रम सुरु करून सावरकरांनी नाशिकचे समाजजीवन भारून टाकले.
                                              १९०४ साल हे वंग-भंग च्या चळवळीमुळे देशभर गाजले. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रा संतापून उठवला. त्यातूनच 'स्वदेशी' आणि 'बहिष्कार' या चळवळी उत्पन्न झाल्या. या चळवळीचा एक भाग म्हणून स्वातंत्र्यवीरांनी पुण्यामध्ये विलायती कपड्यांची ' सामुदाईक होळी' पेटविली. १९०६ साली लोकमान्य टिळकांचे साहाय्य घेऊन ते इंग्लंड ला गेले. तेथे ते श्यामजी कृष्णवर्मा यांच्या ' india house ' मध्ये उतरले. श्यामजी कृष्णवर्मा हे क्रांतिकारी विचारांचा पूरस्कार करणारे होते. त्या दृष्टीने  india house ' हे इंग्लंड ला उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थांचे वसतिगृह होते. कृष्णवर्मा यांनी तेथे स्वातंत्र्यवाद्यांची 'homerule'  नावाची एक संघटना काढली होती. थोड्याच काळात स्वा. सावरकर त्या संघटनेचे सूत्रधार बनले.  'homerule' च्या तरुणांना क्रांतीवादाची शिकवण देऊन स्वातंत्र्यवीरांनी त्यांना भारून टाकले. त्या काळी क्रांतीची प्रक्रिया सांगणारा ' Joseph Mazzini यांचे आत्मचरित्र व राजकारण' नावाचा लंडन मध्ये लिहिलेला सावरकरांचा ग्रंथ एव्हढा गाजला कि, सरकारला तो जप्त करावा लागला, पण त्यामुळे त्याचे महत्व आणखीनच वाढले. 
                                             १९०७ साली १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाला ५० वर्षे पूर्ण झाली. ' शिपायाची भाऊगर्दी' आशा नावाने इंग्रज आणि त्यांच्या तालावर नाचणारे कातडीबचाऊ तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी- भारतीय विद्वान त्या स्वातंत्र्ययुद्धाला हिणवत होते. तो अपसमज दूर करण्यासाठी सावरकरांनी '१८५७ सालचे स्वातंत्र्यसमर' या नावाचे एक पुस्तक मराठीत लिहिले. एव्हढेच नव्हे तर लंडन मध्ये त्या स्वातंत्र्यसंग्रामाचा ५० व स्मृतीमहोत्सव मोठ्या थाटात साजरा केला. भारतात क्रांतीची चळवळ दडपून टाकण्यासाठी त्या काळात इंग्रज सरकारने अत्याचाराचे थैमान मांडले होते. राजद्रोहाच्या आरोपाखाली अनेक तरुणांना जन्मठेप व फाशीची शिक्षा ठोठावली जात होती. सावरकरांचे सहकारी मदनलाल धिंग्रा यांना १७ ऑगस्ट १९०९ रोजी फाशी देण्यात आली. त्याचा साली सावरकरांचे वडील बंधू बाबाराव सावरकर यांना 'राजाविरुद्ध बंड करणे' या आरोपाखाली अटक होऊन जन्मठेप - काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली, तर लॉर्ड मिंटो याच्यावर बॉम्ब टाकल्याच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव यांना अटक झाली. धिंग्रा प्रकरण थोडेसे शांत झाल्यावर स्वातंत्र्यवीरांनी प्रचारपत्रके, ग्रंथ, बॉम्ब बनविण्याची पत्रके व पिस्तुले भारतात पाठविण्याचा धडाका सुरु केला. भारतातील वातावरण सरकारी अत्याचारांनी तापले होते. आशा स्थितीत अनंत कान्हेरे यांना फाशीची शिक्षा झाली, पण ज्या पिस्तुलाने Jacson ची हत्या झाली ते पिस्तुल सावरकरांचे होते आस शोध लागताच ब्रिटीश सरकारने त्यांना अटक केली. या खटल्यात त्यांना ' दोन जन्मठेपींची' म्हणजे ५० वर्षाच्या काळ्यापाण्याची शिक्षा झाली. हे भवितव्य स्वातंत्र्यवीरांना आधीच कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी ब्रिटनच्या तुरुंगातून बाहेरच्या क्रांतिकारक सहकारयाना ' शेवटचा रामराम' नावाचे अनावृत्त पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, " मित्रानो ईश्वराने आपल्यापैकी प्रत्येकाची भूमिका आधीच ठरवून टाकली आहे. ईश्वराने नेमून दिलेली भूमिका वटवताना प्रसंगी जळत्या खडकांना बांधून, कोंडून पडावे लागेल, तर प्रसंगी क्रांतीच्या उसळत्या लाटांच्या शिखरावर स्वार होता येईल. जगन्नियत्याने कोणत्याही परिस्थितीत ठेवले तरी ती परिस्थिती सर्वोच्च आहे, असे समजून आपले जीवित कार्य पार पाडावे." यावरून स्वातंत्र्यवीरांची दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रखर देशभक्ती, आशावाद, ईश्वरनिष्ठा व द्रष्ठेपणा आणि धीरोदात्त वृत्ती दिसून येते. ' पन्नास वर्षे' काळ्या पाण्याची सजा म्हणजे अंदामांहून जिवंत परत येणे नाही, असा ह्या शिक्षेचा अर्थ होता. त्यांना तिकडे नेण्याआधी त्यांची पत्नी साध्वी यमुनाबाई  त्यांना भेटण्यास जाणून शेवटचे दर्शन घेण्यास गेल्या, तेव्हा सावरकर त्यांना म्हणाले, ' भव्यतम अर्थाने आपणही संसार थाटण्यात यशस्वी ठरलो आहोत. आपली चार चूल - बोळकी आपण फोडून टाकली, पण  पुढे - मागे त्या योगे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघू शकेल.' स्वातंत्र्यवीरांचे हे शब्द, हि भविष्यवाणी आज तंतोतंत खरी ठरली आहे. त्यांनी ज्या मरणयातना भोगल्या, त्यामुळेच आपण आजचे स्वातंत्र्य उपभोगीत आहोत. स्वातंत्र्याचे मालक (राजकर्ते) बनलेल्या सत्ताधाऱ्यांच्या घरी खरोखरच सोन्याचा धूर निघत आहे, पण त्यासाठी सावरकर आणि स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या क्रांतीविरानी आपल्या सोन्यासारख्या संसाराची अक्षरश: होळी केली आहे. याची सतत जाणीव ठेवणे हीच त्या देश्भाक्ताना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. 
                                                       अंदमानच्या सिल्वर जेल मध्ये नरकयातना भोगत असताना 'कमले' सारखे नितांत सुंदर काव्य त्यांना स्फुरले. घायपात्याच्या काट्याने ते तुरुंगाच्या भिंतीवर काव्यचरण लिहून मुखोग्दत करीत. पुढे अंदमानात हि त्यांनी राजकैद्यांची एकी घडवून आणून राजकैद्याना काही सोयी सुधारणा मिळवून दिल्या. तिथले मुस्लीम कैदी हिंदू बांधवांना बाटवीत, तेही त्यांनी थांबवले. १९२४ च्या जानेवारीत सावरकरांची तुरुंगातून सशर्त मुक्तता करण्यात आली. त्यांना राजकीय काम करण्यास बंदी करण्यात आली, पण म्हणून ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी समाजसुधारणेचे कार्य हाती घेतले. पतितपावन मंदिर बांधून ते अस्पृश्यांसह सर्वाना खुले केले. आणि रत्नागिरीच्या सार्वजनिक जीवनातून अस्पृश्यता व रोटीबंदी या प्रथांचे उच्चाटन केले. त्यांच्याच प्रेरणेने गोमंतकमधल्या ख्रिस्ती गावाड्याचे शुद्धीकरण केले गेले. 
                                                            ' हिंदुत्व हे भारताचे राष्ट्रीयत्व ' असे ते मनात. ' हिंदू राष्ट्राचा कर्णधार ' या नात्याने सावरकरांनी स्वत:चा असा स्वतंत्र कार्यक्रम आखून भागानगर व भागलपूरचे दोन नि:शस्त्र प्रतिकाराचे लढे दिले. त्यात ते संपूर्ण यशस्वी झाले. त्यामुळे महात्मा गांधीनी खास तर पाठवून धन्यवाद दिले, मात्र असहकार आणि नि:शस्त्र चळवळीच्या मार्गाने भारताला स्वतंत्र मिळेल, यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता, म्हणून भारतीय तरुणांनी सैनिकी शिक्षण घेऊन शस्त्रसज्ज असले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या ' हिंदू ' महासभेच्या वतीने सैनिकीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी भारतभर प्रचार केला सावरकरांचे सदभाग्य असे कि, त्यांना " याची देही याची डोळा" स्वातंत्र्य देवीचे दर्शन झाले. ( म्हणजे ते हयात असतानाच भारत स्वतंत्र झाला.) 
                                         स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ देशभक्त नव्हते तर द्रष्टे समाजसुधारक हि होते. त्यांच्या ठाई अमोघ वकृत्व आणि महाकवीची प्रतिभा विलासात होती, तसेच आत्मचरित्रकार आणि नाटककार म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. भाषा व लिपी शुद्धी यांचे ते अभिमानी होते, तसेच ते हिंदुत्वाचे, हिंदू राष्ट्रवादाचे कडवे पूरस्कर्ते होते, मात्र चातुवर्ण, जातीभेद, कर्मकांडे आणि अस्पृश्यता  याला त्यांचा कडवा विरोध होता. या रूढी मुळे हिंदू धर्माचा नाश झाला. ' प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम, विज्ञानधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म' असे ते म्हणत. " दोन शब्दात, दोन संस्कृती" या आपल्या निबंधात त्यांनी रूढी - अंधश्रद्धांवर कठोर प्रहर केले आहेत. मी वृत्तीने कवी आणि कलावंत आहे, पण मला परिस्थितीने राजकारणी पुरुष बनवले, असे ते म्हणत. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी कवितेची धूळपाटी हातात घेतली आणि तेव्हापासून पुढे ४० वर्षे अव्याहतपणे त्यांनी काव्यलेखन केले. चळवळीच्या धकाधकीत आणि अंदमानातील यातनामय, उपेक्षित व एकाकी जीवनात त्यांना साथ केली ती कवितेने! जगण्याचे लढण्याचे बळ दिले ते कवितेने! 
                                             त्यांची एकषष्ठी, पंचाहत्तरी सर्व भारतीय जनतेने मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरी केली. त्याच वेळी या महापुरुषाच्या मनात आत्मसमर्पणाचे विचार येवू लागले. त्याप्रमाणे त्यांनी क्रमाक्रमाने औषधपाणी, अन्न आणि शेवटी पाणी घेणेही थांबवले. अखेरीस २६ फेबृवारी १९६६ रोजी त्यांनी जराजीर्ण देह काळाच्या स्वाधीन केला. वेगळ्या अर्थी मृत्युच्या माथी पाय देवून ते अशाश्वतातून  शाश्वतात विलीन झाले आणि एक धगधगते अग्निकुंड थंड झाले. विनायकराव सधन, सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित होते. त्यामळे गलेलठ्ठ पगाराची नोकरी, सुविधा, अधिकार त्यांना सहज मिळू शकला असतं. स्वातंत्र्यवीराऐवजी ते " रावसाहेब" झाले असते, पण ते होणे नव्हते म्हणून सर्व सुखे लाथाडून यातनामय जीवनाचे ' सतीचे वाण' त्यांनी मुद्दाम ( हेतूपूर्वक) घेतले. भारताच्या लाडक्या सुपुत्राला माझे - तुमचे लाख - लाख प्रणाम| जय हिंद , जय महाराष्ट्र | 


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Sunday, May 23, 2010

भारतातील सुर्यमंदिरे

                 वेदांमध्ये सुर्याला आद्य शक्ति म्हणून मानले आहे. सूर्यदेवाला "सूर्य" किंवा "आदित्य" आशा अनेक नवानी संबोधतात. वेदांमध्ये सुर्याला मुख्य स्थान दिले आहे.
           पुराणात सुद्धा सुर्याला मुख्य स्थान दिले आहे. रामाला सुद्धा सुर्याची आराधना करण्यास सांगितले होते. इराण मधल्या काही मुख्य धर्माच्या ग्रंथामध्ये सुद्धा सुर्याला प्रथम स्थान दिले आहे. पुढे पारसी समाजाने सुद्धा "अग्न"  हे त्यांचे आराध्य स्थान मानले आहे. सारांश इतकाच की बहुतेक सर्व धर्माच्या व्यक्ति व् ग्रंथामध्ये  सुर्याला प्रमुख स्थान दिले आहे.अश्या या सूर्य देवाची देवाले जगभर पहावयास मिळतात. ७ व्या शतकात मुलतान ( पकिस्तान ) येथे पहिले सूर्यमंदिर बांधले होते. पण भारतात ७ प्रमुख सूर्य मंदिरे पहायला मिळतात. 
                                   बिहार राज्यात गया येथे हे सूर्यमंदिर आहे. देवळासमोर कुंड असून भाविक सूर्याला पाणी कुंडामध्ये सोडतात. याच परिसरात सूर्याची अनेक लहान - मोठी मंदिरे पहायला मिळतात. मगद राजाच्या  वेळी ही देवळे बांधण्यात आली असावी. येथील देवळाच्या सूर्य मूर्तीवर इराणी देवांची छाप पाहायला मिळते. या देवळात सूर्य रथावर आरूढ झाले असून त्यांनी जाकेट, मनगटात कढे व उंच बूट घातले आहेत. हे देवूळ १३ व्या शतकात दक्षिणेचा राजा प्रतापरुद्रा याने बांधले होते. याचे राज्य आंध्र प्रदेशातील वरंगळ येथे होते. या देवळाचे मुख्य प्रवेशव्दार पश्चिमेकडे असून या देवळाजवळ विष्णूचे प्रसिध्द "विष्णूपाद मंदिर " आहे. मंदिर साधे बांधले असून वरती घुमत आहे. या देवळाचा सभामंडप भव्य आहे व पुर्वीकडे सूर्यकुंड आहे. या मंदिरात अनेक कोरलेले खांब आहेत. या खांबांवर शिव, बुध्द, विष्णू, सूर्य, दुर्गा व गणपतीच्या अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात.
   ब्रम्हणया देव मंदिर :-  
                           ब्रम्हणया देव  (बरामजू) मंदिर मध्य प्रदेशातल्या झांसी जवळ उन्हो येथे आहे. येथील सूर्य देवाची मूर्ती दगडाची बनवली असून काळ्या दगडावर उभी आहे. देवळावर २१ त्रिकोण कोरलेले आहेत. मूर्तीवर तांब्याचे कवच बसवले आहे. रविवारी भाविकांची गर्दी असते. हे देवूळ पेशव्यांनी  बांधले असून त्यानानातर जवळच्या गावातल्या दाडिया यांनी पूर्ण केले आहे. येथील स्थानिक रहिवाशांची ह्या मंदिरावर खूप श्रद्धा आहे. देवाच्या दर्शनामुळे अंधत्व व कुष्टरोग नाहीसा होतो अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे.
  सूर्य पहार मंदिर:-
                     आसामच्या गोलपारा येथे सूर्य पहार डोंगरावर हे देवस्थान आहे. या देवळाच्या पायावर सूर्य देवाचे वडील कश्यप  यांची मूर्ती कोरलेली आहे. व दोन्ही बाजूना सहा अश्या बारा सूर्याच्या वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. हे मंदिर हल्लीच बांधलेले असून या डोंगराच्या पायथ्याशी शंकराची अनेक लिंगे दगडात कोरलेली आढळंतात.   
                              तामिळनाडू येथील कुंभकोनम येथे हे मंदिर पाहायला मिळते. कुंभकोनम येथे अनेक देवळे बांधली आहेत. यात सूर्य, काशी - विश्वेश्वर, विसललक्ष्मी, चंद्र, अंगालकन, उदान, बृहस्पती, सुकर्ण, शनीश्वर, राहू व केतू. भाविकांना आधी गणपतीच्या देवळात प्रवेश करून मग बाकीच्या देवांचे दर्शन घेता येते. येथील भाविक या सर्व देवळात ९ वेळा प्रदक्षिणा घालतात. हे देऊळ ८०० वर्षापूर्वी बांधलेले असून त्यावर द्रविड संस्कृतीची छाप आहे. हे देऊळ चोला राजाने बांधलेले असावे. या देवळाच्या शेजारी कंजमुख १२०० वर्षापूर्वी बांधलेले तिरूमंगलकुडी हे देवस्थान आहे. काही वर्षात ह्या मंदिरांनी पर्यटक आकर्षित केले असून तामिळनाडू सरकारकडून " नवग्रह स्थळ यात्रा " हि खास तीर्थयात्रा सुरु केली आहे.  

                                       आंध्र प्रदेशातील अरासावली येथे ७ व्या शतकात कलिंगा राजाने बांधलेले पुरातन मंदिर पाहायला मिळते. हे एवढे जुने असून सुद्धा देवळाचा परिसर व देऊळ चांगल्या स्थितीत ठेवले आहे. सूर्य देवाची मूर्ती काळ्या ग्रानाइट दगडामाधली असून दोन्ही हातात कमळ धरलेली आहेत. येथे सूर्याला पद्मपाणी असेही संबोधतात. हे देऊळ श्रीकाकुलम गावाजवळ आहे. 

                                  गुजरात येथील मोधीश येथे हे सूर्यमंदिर बांधलेले आहे. हे साधारण १०२६ साली बांधले आसवे. या मुर्तीनेसुद्धा गया मंदिराप्रमाणे बूट व बेल्ट घातलेले दिसतात. या मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार पूर्वेकडे असून सूर्याचे किरण मूर्तीवर पडतात. या देवळाला शिखर नसून भिंतीवर मोधीरा नृत्य  करताना महिला कोरलेल्या आहेत. सभागृहात  तोरण कोरलेले असून पूर्वेकडील प्रवेशव्दाराकडे सूर्यकुंड आहे. या देवळावर मगद घराण्याची छाप दिसून येते.  

                         सर्वात प्रसिद्ध ओरिसातील १३ व्या शतकात बांधलेले सुंदर कोरीव काम केलेले मंदिर आहे. पूर्वीपासून उत्तर- पूर्वेकडे २० मैलावर कोनार्क मंदिर आहे. कोनार्क म्हणजे " कोपऱ्यातला  सूर्य ". संपूर्ण काळ्या दगडात हे मंदिर बांधले असून मंदिराच्या पायावर ७ घोडे कोरलेले आहेत व २४ रथचक्र कोरलेली दिसतात. हे मंदिर गंगा घराण्यातील नृहसिंह  देवा यांनी बांधले आहे. त्यावेळची स्वयंभू मूर्ती ज्यावर सूर्याचे पहिले किरण पडत ती पोर्तुगीजांनी चोरली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या देवळात एक मोठा सभामंडप व नटमंदिर आहे.  

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Sunday, May 09, 2010

प्रवास आई ते mummy चा

जन्म झाल्यावर आईच्या शरीरापासून बाळाची नाळ तोडली जाते पण त्या आईची आणि बाळाची जी भावनिक नाळ जोडली जाते, ती पुढे आयुष्यभरासाठी असते. मातृत्व व्यक्त करणारी. आईपणाचा पवित्र नातं जपणारी. या नात्यात आगदी जन्माला घातल्यापासून ते पुढे जीवनभर कुठेही स्वार्थ नसतो. परतफेडीची अपेक्षा नसते. उलट अखंड पाझरत जातो मातृत्वाचा झरा....................
ईश्वराचे दुसरे रूप म्हणजे आई; मुलांना भरपूर देऊनही आई कधी रिती होत नाही. ती समृद्धच होते सागरासारखी ............. आई कोणत्याही प्रदेशातील किंवा व्यवस्थेने कोणत्याही जातीत  ढकललेली असली तरी तिचा प्रेम सारखाच असतं.......... जातीच्या कप्प्यात ते कधीच मावत नाही... कोणत्याही सीमंजवळ  अडखळत नाही...... जगभरातील कुठलीही आई घ्या तिची  भाषा सारखी नसेल हि पण स्पर्शातलं वात्सल्य सारखच असतं................
आपल्या आईला "आई" हि हाक द्यायची मित्र किंवा मैत्रिणीच्या आईला "काकू" हाक द्यायची हा प्रघात आज पण चालू आहे. पण आई हि आई असते ती तुझी - माझी नसते. आईला जात, धर्म, पंथ नसतो ती फक्त वात्सल्यमुर्ती असते हे मला शिकवला ते माझा मित्र मिलिंद म्हात्रे.  ( मी त्याची खूप आभारी आहे कि त्याने जगातला सर्वात मोठा संस्कार माझ्यावर केला.)  परवाच मी माझ्या एका मित्राच्या आईला " mumma  " हाक दिली (कारण तो स्वत तिला mumma हाक देतोतर तिने माझ्या मित्राला प्रश्न विचारला हि मला " mumma "  का बोलली? त्याने मला सांगितलं कि mumma ला "mumma " म्हणून हाक मारलीस? ती मला विचारात होती? आता मला प्रश्न पडला मी कुठे चुकली ? anyways आई ते mummy च्या प्रवासात आईच्या मायेत झालेला फरक आपल्या मुलाने "mumma किंवा mummy हाक दिली पाहिजे बाकी सगळ्याने " anunty " किंवा "काकू"  अशी हाक दिली पाहिजे. आईच्या हकेताला ओलावा mumma शब्दातलं ममत्व ह्या इंग्रजाळलेल्या वातावरणात हरवत चाललाय का?
आता तर खेड्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. मुलगा किंवा मुलगी इंग्रजी शिकणार म्हणजे कोण रुबाब गळ्यात टाय, पायात बूट, अवतारच बदलला पोराचा. शाळेतून पोर घरी आला कि आईला "mummy " हाक मारणार, बापाला "dady ". आई - बाप एकदम खुश. आभाळ ठेंगणं. पोरगा " mummy " म्हणतं म्हणजे काय ? पोरांना हल्ली बोलायला लागल्या पासून "mummy - dady " बोलायची सवय लावलेली असते so हल्ली "आई" हा शब्द क़्वचितच ऐकायला मिळतो. आई ला " आई" हाक मारणं आता गावंढळपणाचे होत चाललंय. चुकून किंवा अनावधानान पोरानं "आई" म्हटलंच, तर लगेच गुर्कावणारा आवाज 'काय म्हणालास ?' पोर वरमून म्हणत "mummy " ! त्याचा चेहरा कसनुसा झालेला असतो. mummy युद्ध जिंकल्याच्या तोऱ्यात. 
आई म्हटल की तिथे एक ओलावा, मायेचा स्त्रोत आखंड पाझरत असतो. त्या मायेत अखंड भिजलेल्या कोणाही व्यक्तीला आई म्हणजे एक स्वतंत्र विद्यापीठच असत. आई म्हणजे कविता. सतत सळसळणारी, चैतन्याच्या पालवी ने बहरलेली. "आई" म्हणजे जगण्याची संजीवनी. "आई" हा शब्दाच वळचणीला गेला तर जगाना असेल का शिल्लक ? आजच्या "मम्मी" मधून ममत्व हरवत तर नाही ना चालले? 
आभाळभर पसरत असते माय 
सागराभर विस्तारत असते माय
धर्म, पंथ, प्रदेश नि जाती संपवत 
लेकरासाठी उभी थकत असते माय!!
HAPPY MOTHER'S DAY 

~ ●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Thursday, May 06, 2010

महाराष्ट्र - एक नवी सांस्कृतिक ओळख


महाराष्ट्र म्हणजे संस्कृति आणि परंपरा यांनी नटलेल राज्य. ५० वर्षापुर्वीचा आणि आताच्या महाराष्ट्रात खूप बदल झालेत, जसे समुद्रात खूप सारे प्रवाह येऊन एकत्र होतात तसेच काहीसे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे हि आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रवाह इतके   वेगळे पण एकमेकाना जोडणारे आहेत आणि प्रत्येक प्रवाहाचे एक  वेगळे वैशिष्ठ्य आहे; त्यामुळे ह्या प्रत्येक प्रवाह मुळे महाराष्ट्राची एक नवीन ओळख बनते आहे. महाराष्ट्र ही भूमी ही देवांची , संताची अन भक्तांची, वीरांची, लोककलांची, साहित्याची आहे. हा प्रत्येक प्रवाह महाराष्ट्राची एक वेगळी ओळख सांगतो. ह्याच प्रवाहंची ही फ़क्त तोंड ओळख. ( कदाचित काही गोष्टी लिहायच्या राहून गेल्या तर क्षमस्व:   )
देवांचा, संतांचा , भक्तांचा महाराष्ट्र : महाराष्ट्रातील  देवस्थाने  आपल्या  सगळ्याना  माहित  असतीलच.  अष्टविनायक, मुंबई चे  सिद्धिविनायक,  पंढरपुर,  साईं बाबां  सारखा  अवतार  पण  देवाने  महाराष्ट्रातच  धारण  केला  ते  पवित्र  स्थान शिर्डी, गणपति पुळे,  ५१  शक्ती  पीठे  संपूर्ण  देशभरात  आहेत;  त्यातली  साडेतीन शक्ती पीठे हि महाराष्ट्रात आहेत आणि  ती म्हणजे तुळजाभवानी,  महालक्ष्मी, रेणुका  माता, आणि  सप्तशृंगी हे अर्धे पीठ मानले जाते. १२ ज्योतिर्लिंगापैकी  चार आपल्या महाराष्ट्रात  आहेत  ती  म्हणजे  भीमाशंकर,  नागेश्वर,  त्र्यंबकेश्वर,  घ्रिनेश्वर.  घरापुरी  येथील  लेणी  मधे  तर  ब्रम्हा,  विष्णु आणि  महेश  (शंकर)  ह्यांची  दुर्मिळ  मूर्ति  कोरलेली  आहे. अजुनही  बरीचशी  देवस्थाने आहेत.
संताची तर  महान  परंपरा  ह्या  महाराष्ट्राला  लाभली  आहे.  संताच्या  बाबतीत  म्हणतात  की,  " संतकृपा  झाली  ।  इमारत  फळा  आली  ॥ १ ॥ ज्ञानदेवें  रचिला  पाया  ।  उभारिलें  देवालया  ॥ २ ॥ नामा  तयाचा  किंकर । तेणें  केलासे   विस्तार ॥ ३ ॥ जनार्दन   एकनाथें   । ध्वज  उभारिला  भागवत  ॥ ४ ॥  तुका  झाला  तेथें  कळस । भजन  करावें  सावकाश  ॥ ५ ॥"  संत गाडगे  बाबा , संत  जनाबाई, संता  सावता  माळी,  अशी   फार   मोठी   परंपरा   लाभली   आहे.   भक्तांची   तर   वारी  कधी  चुकतच   नाही.  असा  आहे देवा- धर्माचा  आदर करणारा महाराष्ट्र.
विरांचा महाराष्ट्र : देवा - धर्माचा आदर  करणारा  महाराष्ट्र  संकटकाळात  तितक्याच  कणखर  पणे  संकटांचा  सामना  करतो. "गोब्राम्हणप्रतिपालक  क्षत्रिय  कुलावांतास सिंहासनाधीश्वर  छत्रपती  शिवाजी  महाराज  कि  जय "  म्हटलं  कि,  अंगात  वीरश्री  संचारली  नाही;  असा  माणूस  महाराष्ट्रात  औषधालाही  सापडणार  नाही.  शिवाजी  महाराजांच्या  महान पराक्रमानंतर  पेशाव्यानी  लावलेले  अटकेपार  झेंडे,  मोघलंशी  केलेले  युद्ध, " स्वराज्य  हा  माझा  जन्म  सिद्ध  हक्क  आहे आणि  तो   मी  मिळवणारच. "  अशी  सिंह  गर्जना  करणारे  लोकमान्य  टिळक ," मेरी  झांसी  नाही  दुंगी  " हे  ठणकावून सांगणारी  राणी  लक्ष्मीबाई  हिचा  जन्म  हि  महाराष्ट्रातच  झाला.  आपल्या  मातृभूमीला  भेटण्यासाठी  आतुर  होऊन  समुद्र पार  करून  येणारे  विनायक  सावरकर  पण  ह्याच  मातीतले , ब्रिटिश  सरकार  ची वागणूक  बघून  पेटून  उठानारे वासुदेव  फडके हे ही ह्याच मातीने दिले. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जीवनदान दिलेले १०६ हुतात्मे,  स्वातंत्र्यानंतर ही देशाच्या सीमेचे रक्षण करणारे जवान असोत वा अलीकडेच मुंबई वर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर, हेमंत करकरे , अशोक कामटे असो (अजुनही बरीच नावे ह्या यादीत येतील )  हे सगळे वीर म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याची गाथाच आहे.
कलाकारांचा महाराष्ट्र : पूर्वीच्या काळात पंढरीची वारी आणि बारी अश्या दोनच गोष्टी इकडच्या जनतेला माहित. यातूनच सुरवात झाली महाराष्ट्राच्या लोकगीतांची आणि संगीताची ह्या गीताचा उगम बघायला गेला कि प्रथम आठवतं ते "जातं" . प्रश्न पडला ना "जात्याच " अन गाण्याचा काय संबंध तर पूर्वी पहाटे उठून बायका जात्यावर दळण दळत असत त्या वेळी त्यातून येणाऱ्या घराघरीच्या तालात आपले सूर मिसळून ओव्या म्हणत हाच खरा वाद्यांचा उगम होय. रहाटाने विहिरीतून पाणी काढताना होणारा आवाज, बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज ह्या तालावर गाणे बोलणारा शेतकरी राजा, मग पुढे भर पडली ती वासुदेवाच्या चिपळ्यांची. पहाटे ची कामे उरकून दारात सडा- सारवण करून सुंदरशी रांगोळी घालीत असतांना, आगमन व्हायचे ते वासुदेवाचे डोक्यावर मोरपिसाची टोपी हातात चिपळ्या आणि तंबोरा  अन अंगात बाराबंदी घातलेला हा वासुदेव ओव्या, पुराणातील कथा  ह्या गाण्यात गुंफून सांगत असे व माय - लेकी कडे भिक्षेची मागणी करत आणि त्याही दान करत. जसा जसा दिवस सरकत जाई तसे मग मंडळी कामात गुंतत अन रात्री देवळात भजन - कीर्तनाच्या कार्यक्रमाला जमत. पूर्वीच्या काळी रात्री सुरु होणारी हि भजने कधी - कधी पहाटे पर्यंत चालायची (तेव्हा आत्ता सारखे पोलिस दादा येत नव्हते ना! ये १० वाजले बंद करा ! ) तर मग टाळ-मृदुंग ह्यांच्या गजरात लोक मंत्रमुग्ध होत. इकडून मग वाद्यात भर पडली ती टाळ - मृदुंग,  तंबोरा. 
 धनगर गीत (गाजा)
 आपली गुरे (गाई , शेळ्या मेंढ्या) चरायला नेताना त्याच्या गळ्यात वाजणाऱ्या घंट्याचा आवाज व सोबत असणारी बसारी ह्यांच्या तालावर गायली जात.
 कोळी गीत 
कोळी गीत म्हटले कि प्रथम आठवते ती वेसावची पारू नाही का? पावसाळ्या नंतर मासे पकडायला जाताना आपल्या लाडक्या दर्याची पूजा करून " सण आयलाय गो नारळी पुनवेचा"  असा म्हणत आपल्या होड्या पाण्यात सोडतात. कोळी गीतं कोण विसरू शकेल का ? 
 शौर्यगीत किंवा  पोवाडा 
मैदानावर शौर्य गाजवून आल्यावर,  मैदानावर गजवालेल्या शौर्याची गाथा ही सामान्य जनतेला कळावी आणि त्याच इतिहासाने नवीन तयार होणारी पिढी हि धाडसी तयार व्हावी म्हणून शब्दात गुंफून आणि रंगवून सांगितली जायची. (आठवला ना मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मधला पोवाडा! ) 
 लावणी 
महाराष्ट्राच्या संस्कृती मधला सर्वात लावण्य प्राप्त दागिना म्हणजे लावणी. उत्तरेकडच्या राजांच्या कारामुकीसाठी चालवल्या जाणाऱ्या मुजाऱ्याला आतिशय लावण्याकरी भाषेत दिलेलं उत्तर म्हणजे लावणी होय. उत्तरे कडे मुजरा चालतो आणि महाराष्ट्र हि कलेमध्ये मागे नाही हे दाखवण्यासाठी चालू झालेली हि लावणी पुढे महाराष्ट्राची परंपरा बनली ( नटरंग मधल्या अप्सरेने हट्ट धरला ना मला जाऊ द्याना घरी चा ??)
 तमाशा 
तमाशा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची लोककला मानली जाते . तमाशा हा फारशी शब्द असला तरी त्याचा अर्थ मनोरंजन असा होतो ह्या प्रकार मध्ये ढोलकी, तुणतुणे , झांझ, डफ, हलगी (छोटा डफ ), कडे - लेझीम, हार्मोनियम, घुंगरू ह्या वाद्यांचा वापार केला जातो, तमाशा हि कला प्रामुख्याने महाराष्ट्रातील २ समुदायात अधिक प्रमाणात दिसून येतो ते म्हणजे कोल्हाटी व महार. हि कला प्रामुख्याने गावाच्या जत्रेत अधिक प्रमाणात सादर केली जाते. 
दिंडी 
हि एक महाराष्ट्रातील महान परंपरा आहे, मुख्यत: आषाढी व कार्तिकी महिन्यातील एकादशीला च्या वेळी विठ्ठल भक्त जी विठ्ठलाची गाणी गात मिरवणूक काढतात त्याला दिंडी म्हणतात. 
 ह्या सगळ्यात हळूचपणे महाराष्ट्राची संगीत परंपरा घडत गेली. सुरवातीला संतानी सांगितलेली प्रवचने, देवळात होणारी भजने, नंतर घराघरात जात्यावर दळताना गायल्या जाणाऱ्या ओव्या, वासुदेवाचे सकाळच्या वेळातले प्रसन्न करणारे आगमन, ह्याच परंपरेत मग भर पडत गेली. प्रथमत: कवितांना चाली लावणे व त्या सुरात गाणे ह्याचेच पुढचे पाऊल म्हणजे भावगीते ( भावगीते म्हटली कि कानात स्वर गुंजू लागतात ते "मेंदीच्या पानावर" मधले ) अशी हि घराघरातून सुरु झालेली संगीत परंपरेला आज खूप मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. ह्या संगीत प्रवाह बरोबर वाद्यात हि बदल होत गेले. जात्याच्या घरघरी पासून, सुरु झालेल्या ह्या प्रवासात बैलाच्या घळ्यातल्या घंटा, टाळ, मृदुंग, तंबोरा, सतार, हार्मोनियम, तबला, वीणा, बासरी, पियानो, गिटार, ड्रम, ई. वाद्यांची भर पडतच गेली. 
 बदलत्या काळाबरोबर जनजीवन आणि काम्रानुकीचे साधना पण बदलत गेली, पूर्वी घराघरात बायका गायाच्या, पंढरीची वारी आणि बारी, त्या नंतर चित्रपट आले ते पण जत्रेतचं बघायला मिळायचे. मग शोध लागला तो ग्रामोफोनचा मग सुरवातीला काही ठराविक लोकांकडे असलेले हे ग्रामोफोन सगळ्यांच्या घरात स्थानापन्न झाले. १९२७ साली All India radio ची स्थापना झाली व १९५७ साली त्याची आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले आणि सुरु झाली एक नवी "मंगलप्रभात " ( मंगलप्रभात हा आकाशवाणी वर सकाळी प्रसारित होणार्या कार्यक्रमाचे नाव आहे ). १९५९ साली  अचानक एका पाहुण्याचे आगमन झाले आणि तो आपल्याच घरातील सदस्य बनला त्या बद्दल लिहायचे झाले तर " तबकड्या मध्ये तेवती निरांजने अन वाती नव्या Television ची कहाणी सांगते तुझी न माझी प्रीती " त्याचा नाव आहे आपल्या सगळ्यांचा लाडका tv  . मग १९९० ते १९९१ च्या काळात cable TV ची सुरुवात झाली. मग गेल्या २ ते ३ वर्षात DTH पण आले. त्याच बरोबर mobile phones , computer चे पण आगमन झाले.  पण आपल्या लाडक्या TV चे महत्व  कमी झाले नाही उलट तो संगणकाचा  वापर करून कसा बघू शकतो हा शोध लावला गेला आत्ता तर mobile मध्ये पण TV बघायची सोय केली आहे. ( काही माहिती द्य्वयाची राहिली असल्यास क्षमस्व: )
महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर अजय - अतुल ह्यांनी संगीत बद्ध केलेले हे गीत अगदी योग्य ठरते 

हि मायभूमी, हि जन्मभूमी, हि कर्मभूमी आमची 
महावंदनिय अतिप्राणप्रिय हि माय - मराठी आमुची  (2)
हा आमचा आहे बाणा, हि आमुची आहे बोली 
अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची 
महाराष्ट्र भूमी हि जन्मभूमी, हि कर्मभूमी आमची 
महावंदनिय अतिप्राणप्रिय हि माय - मराठी आमुची || धृ ||
राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा 
प्रणाम माझ्या घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा
भीमा, वरदा, कृष्ण - कोयना, भद्रा, गोदावरी 
एक पणाचे भारती पाणी मातीच्या घागरी 
योग्यांची अन संतांची, भक्तांची , माळक-याची  
हि देव, देश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची
योद्धयांची अन वीरांची, तलवारीच्या पात्याची 
देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची 
हि भूमी सप्त सुरांची, रंगांची, अष्टकलांची. काव्याची, 
शास्त्र - विनोदाची, हि भूमी साहित्याची. 
महाराष्ट्र भूमी हि जन्मभूमी, हि कर्मभूमी आमची 
महावंदनिय अतिप्राणप्रिय हि माय - मराठी आमुची || १||


जय महाराष्ट्र !!!!!!!!!!!!!!!!!!!! 

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Monday, May 03, 2010

द्रोणागिरीच्या माथ्यावरून

मित्रानो गेल्या रविवारी द्रोणागिरीच्या डोंगरावर जाण्याचा योग आला. तसा तो दरवर्षी येतो त्यात काही विशेष नाही. मी लहान असताना आमच्या मातोश्रींना विचारले होते आपण इतक्या वर जाण्याचे कष्ट का घेतो ? त्यावेळी त्यांनी सांगितले होती कि इथे आपल्या कुळाचा मूळ पुरुष म्हणजे वेताळ देव राहतो. त्याची वर्षातून एकदा तरी सगळ्यांच्या उपस्थितीत पूजा व्हावी म्हणून सगळे जातोय. ह्या वर आम्ही पुढचा प्रश्न विचारला " देवाला की दुसरी जागा भेटली नाही का? इतक्या वरती जंगलात का राहायला गेला ? त्यावर मातोश्री डोळे वटारून म्हणाल्या " कार्टे गप्पं बसतेस का आता .............;इतके ऐकूनच आम्ही गप्पं बसण्याचा निर्णय घेतला तो आजतागायत डोंगरावर चढताना कायम असतो. तिकडे गेल्यावर निदर्शनास आले कि फक्त आपणच नाही तर आजूबाजूच्या खेड्यातील लोक पण तिकडे पूजेला येतात. अश्या परिस्थितीत मनात आणखी प्रश्न कि वेताळ देव आमच्या  कुळाचा मूळ पुरुष मग ती लोक का पूजा करतात ( फक्त मनातच ) जाऊ दे असे बरेचसे प्रश्न आहेत. 


द्रोणागिरी संदर्भात बोलायचे झाले तर ह्या डोंगराची निर्मिती कशी झाली त्याबद्दल एक कथा सांगितली जाते (दंतकथा )  असो. ती कथा अशी आहे की राम आणि लक्ष्मण लंकेच्या स्वारीवर असताना; रणांगणावर  मुर्च्छित पडलेल्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमंताला हिमालयातील द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी बूटी आणायला सांगितली. हनुमंताने लगेचच उड्डाण केले व् त्या पर्वतापर्यंत पोहोचला; परंतु त्या पर्वतावर असणाऱ्या वनास्पतिंपैकी संजीवनी बूटी कोणती हे हनुमंताला कळत नव्हते व् त्याने अधिक उशीर केला तर लक्ष्मणाच्या जीवास धोका होता म्हणून मग जास्त विचार ना करता हनुमंताने तो पर्वतच सरळ हातावर उचलून धरला व् लंकेच्या दिशेने प्रयाण केले तो पर्वत नेत असताना काही ठिकाणी त्याचे तुकडे पडले त्या तुकड्या पैकिच हा एक तुकडा आणि द्रोणागिरी पर्वताचा तुकडा म्हणून ह्याला पण द्रोणागिरीचा डोंगर म्हटले जाते. आज ही ह्या  डोंगरावर संजीवनी बुटिचा वृक्ष आहे असे म्हटले जाते ( आपल्याला माहित नाही बुआ


द्रोणागिरी डोंगराची निर्मिती रामायणाच्या काळात झाली असली तरी आमचा देव तेथे केव्हापासून वास्तव्यास आहे माहित नाही आणि तस पण हा द्रोणागिरी उरण च्या रक्षणासाठि ठाम पणे उभ आहे. रस्त्यावरून जाता - येता दर्शन घडत तेव्हा बघितले तर हा डोंगर एका प्रचंड मोठ्या बसलेल्या हत्ती प्रमाणे दिसतो. त्याचा विस्तारही प्रचंड आहे. जसे - जसे वरती चढात जातो त्याचा विस्तार कळत जातो. ( माझे दिशा ज्ञान कच्चे असल्याने दिशा संगता येत नाही. ). डोंगराच्या एका भागात आमच्या देवाचे देऊळ आहे.. देवाची पूजा - अर्चा केली जाते. (आमच्या देवाला फ़क्त गोड पदार्थ दाखवावे लागतात नैवद्य म्हणून . कोंबडयाचा मान त्याचे रक्षण करणाऱ्या सैनिकाना द्यावा लागतो.) मान - पान अटोपले की ते कोंबड आम्ही शिजवून त्याचा प्रसाद म्हणून खातो. पण त्या आधी डोंगर चढून थकलेल्या पायाना विश्रांती देण्यासाठी आमची पाऊले वळतात ती डोंगराच्या दुसरया भागात असलेल्या किल्ल्यावर  . 

ह्या डोंगरावरचा किल्ला फार पुरातन नसला तरी पोर्तुगीज कालीन आहे.  किल्ल्यावर जताना  एकाठिकाणी उतरत जाणाऱ्या  पायऱ्या दिसून येतील; ह्या पायऱ्या उतरून गेल्यावर एक प्रवेशव्दार दिसेल. प्रवेशव्दार म्हणजे दगडात कोरलेली कमान त्याच्या मध्यभागी बसवलेला गणपति खाली पुन्हा उतरत जाणाऱ्या  पायऱ्या प्रवेशव्दाराच्या आतील बाजुस छोटेखानी देव्हाऱ्यासारखे घुमट अशी रचना आहे ( आता ह्या सगाल्याचे अवशेष शिल्लक आहे. गणपति कमानीपासून वेगळा झाला असून आता त्याला त्या  छोटेखानी घुमटात ठेवण्यात आला आहे.) ह्या चे बांधकाम कधी झाले याची ही एक दंतकथा आहे.  ती अशी की पांडवाना एकविरा माता प्रसन्ना झाली, त्यानी तिचे मंदिर बंधावयाचे ठरविले.  मंदिर  बांधताना महत्वाची अट होती की ते एका रात्रीत बांधले गेले पाहिजे. पण प्रवेशव्दाराचे काम झाले अणि पहाट झाली, म्हणून ते काम अर्धवटच राहिले. (पुढे ते मंदिर  पांडवानी कर्ल्याला बांधले. ) पण आता त्या प्रवेश व्दारातुन जो किल्ला दिसतो तो पोर्तुगीज कालीन आहे. कारण डोंगराच्या ह्या टोकावरून संपूर्ण उरण तालुका, मुंबई ते उरण हा समुद्र मार्ग ह्या वर व्यवस्थित नजर ठेवता येते. म्हणूनच त्यानी तो किल्ला बांधला होता. आज त्या किल्ल्याची पडझड झाली असली तरी तो आजही त्याच्या भक्कमपणाची साक्ष देतो आहे. (आता काही बुरुज ढासळलेले  असले तरी तो उन - पाउस सहन करून पण गेली कित्येक वर्ष उभा आहे. ) आज ह्या ठिकाणी ONGC प्रोजेक्ट च्या रक्षणा साठी दोन सेंट्री तैनात असतात. ( येथून संपूर्ण ONGC प्रकाल्पावर नजर ठेवता येते; तसेच समुद्र मार्गे होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवता येते.


ह्या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशीष्ठ्य म्हणजे इथे असणारा पाण्याचा हौद . जमिनीच्या १५ फूट खाली असला तरी इथले पाणी विहिरीच्या पाण्यासारखे मचुळ लागत नाही. कितीही उन असेल तरीही इथले पाणी गार लगते. पूर्वी हा हौद काठो - काठ भरलेला असे आता त्याची पातळी कमी झाली आहे.  हौदा शेजारीच चर्च ची पड़की ईमारत आहे. अस्तित्वात  असलेल्या माहिती अनुसार तरी १९६५ ते १९७० पर्यंत तेथे चर्च चे अस्तित्व होते. दर रविवारी होणारी प्रार्थना पण तिकडे होत असे त्याच प्रमाणे येथे जात्रा ही भारत असे नंतर येथे सिड्को व् ONGC आल्याने चर्च खाली हलवले गेले. आज चर्च पड़की ईमारत देखिल त्याच्या भव्यतेचा इतिहास सांगते आहे. 


अश्या ह्या द्रोणागिरिची पूर्वीची चढ़न बंद करून नविन पायवाट तयार केली आहे. त्यावरून चढताना दमछाक होते आणि उतरताना घसरण .


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•