Saturday, September 13, 2014

What an idea sirji!!!

ऐन गणपतीत आजारी पडल्याने गौरी साठी माहेरी येणे झालेच नव्हते. तेव्हा म्हटले आता बरे वाटत आहे माहेरी जाऊन यावे. यावेळी मुहूर्त निघाला तो संकष्टीचा, भाद्रपदातली संकष्टी म्हणजे साखर संकष्टी आमच्याकडे हिला साखर चौथ असे हि म्हणतात. ह्या साखर चौथीला हि आमच्या भागात गणपती बसतात. मामाकडे गणपती  बसत असल्याने माझ्या माहेरी येण्याच्या मुहूर्ताचा फायदा झाला, श्रींचे दर्शन हि झाले आहे सगळ्यांची भेटही झाली. साहजिकच आहे भेट झाली म्हणजे गप्पा होणार आठवणी उजळल्या जाणार अशीच एक गावातील मामांची आठवण निघाली आणि आम्ही खरच म्हणावे लागले What an idea sirji!!!

गणपती घरी येणार म्हटले कि सजावट आलीच सजावट म्हणजे मखर बनवण्यासाठी थर्माकोलचा प्रामुख्याने वापर आणि गणेश या मखरात विराजमान झाले कि अखंड जळणाऱ्या समया आणि अगरबत्ती.
पूर्वी लहान अगरबत्ती यायची त्यामुळे कोणाला न कोणाला सतत तेथे राहावे लागायाचे मग कुणीतरी अक्कल वापरून मोठ्या अगरबत्त्या मार्केट मध्ये आणल्या त्यावेळी त्या खूप महाग असल्याने रात्रीच लावल्या जायच्या आपण झोपल्यावर देखील अगरबत्ती चालू राहावी हा उद्देश.

पण अशा अगरबत्त्या म्हणजे थर्माकोलच्या मखराला धोका कारण कुठे जरा अगरबत्ती हलली तर ती सरळ मखराला टेकणार आणि मग ...........

घरी गणपती असताना एका रात्री साधारण ९ किंवा १० च्या सुमारास माझ्या वडिलांच्या नात्यातील मामा (आम्ही यांना मामाच म्हणत असू) घरी गणपती दर्शनाला आले. त्यावेळी मी हि मोठी अगरबत्ती लावण्याच्या प्रयत्नात होते.
“बाय नीट लाव अगरबत्ती, नाय तर टेकवशील मखराला”  इति मामा आजोबा
“नाही आजोबा नीट लावते मी, भाऊ प्रसाद दे रे आजोबाना” असे म्हणून मी विषय संपवला
“अरे मामा ये, इतक्या रात्री आलास?” वडिलांनी स्वागत केले.
“अरे वेळच भेटत नाही, कामावरून आलो आज ठरवलंच उशीर झाला तरी चालेल आपले ४-५ घर आहेत तिथे दर्शन करायला गेलेच पाहिजे म्हणून निघालो.” हुश्य हुश्य करत आपली कथा ऐकवली. आम्ही मध्येच “प्रदीप, तू एवढ्या मोठ्या अगरबत्त्या कुठून आणल्यास? मखराला चिकटली म्हणजे?” म्हणून चौकशी केली.
“रात्रभर अगरबत्ती जळावी म्हणून आणल्या आहेत, आपल्या उरणला तो गणपती चौकात नाही का अगरबत्तीवाला बसतो त्याच्याकडून.” वडिलांनी माहिती पुरवली.
त्यावर लगेच मामा चालू झाले “ आमचा दिनेश पण म्हणत होता कि आणूया मोठ्या अगरबत्त्या पण मी नको बोललो आणि त्याऐवजी त्याला “कासवछाप” (पूर्वी मच्छर अगरबत्तीला याच नावाने ओळखायचे आता गुड नाईट नावाने ओळखतात) आणायला सांगितली.”
त्यावर दादांनी (माझे वडील) म्हटले “हो, ह्या पावसाच्या जमा होणाऱ्या पाण्यामुळे मच्छर वाढलेत...” त्यांचे वाक्य अर्धवट तोडत मामा म्हणाले “ म्हणूनच सांगितली, ती कशी गोल आणि चापटी येते, सोबत तिचा stand पण येतो त्यामुळे मखराला धोका नाही, ती लावली आपल्याला मच्छर पण लागत नाही आणि हि केळी वगैरे फळे ठेवलेली असतात त्यामुळे येणारी चिलटे पण पळता, म्हणून मी रात्री देवापुढे सरळ ‘कासवछाप मच्छर अगरबत्ती’ लावतो!”

ह्यावर दादा “मच्छर अगरबत्ती?” आणि पुढे आम्ही सगळेच खो-खो हसू लागलो.
त्यावर मामांचा युक्तिवाद असा कि “देवाने कुठे सांगितले आहे मला सुवासिकच अगरबत्ती हवी आहे?”

हे हि बरोबरच आहे म्हणा.  “What an Idea Sirji!!”


आज ते मामा आजोबा नाहीत पण त्यांची हि Idea आम्ही कित्येक पिढ्यांना देऊ शकू.....

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐
 ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, September 09, 2014

महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स

पुस्तकाचे नाव - महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स

लेखकाचे नाव - सुनील पोटेकर

प्रकाशक - शब्दांजली प्रकाशन -पुणे. (संपर्क - ९२७०१०८०८०)

किंमत - रु.१२० /-


महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स या पोर्टलवर ‘ई-संस्कृती' या सदरात सुनीलचे महाराष्ट्र राज्यातल्या ई- क्षेत्रात अंमलबजावणी झालेल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या लोकांसाठीच्या योजना आणि त्यांची सोप्या भाषेतली आवश्यक अशी माहिती सुनील पोटेकरांनी या पुस्तकातून अतिशय सोप्या भाषेत पोहोचवण्याचे काम केलं आहे. भारत सुपर पॉवर झाला पाहिजे आणि भारतानं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हा वापर जास्तीत जास्त तळापर्यंत झाला पाहिजे, पोचला पाहिजे. लोकांसाठी, लोकांना उपयुक्त असं जे जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजेच. पण त्याच बरोबर तांत्रिकदृष्ट्या त्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरणं, हाताळण अवघड वाटत असेल , तर त्यासाठी त्यांना तयार केलं पाहिजे. त्यांना त्याची सवय लावली पाहिजे. गरज ही शोधाची जननी म्हणतात त्याप्रमाणेच काम व्हायला हवं. मोबाईल आला आणि तो अगदी तळागाळापासून ते डोंगरकपारीपर्यंत सर्वच ठिकाणी जिथे म्हणून माणूस आहे, तिथंपर्यंत जावून पोचला ना! याचं, कारणच तात्काळ स्वाम्दाची गरज तर होतीच, पण तंत्रज्ञानानं ही गोष्ट साध्या करून दाखवली. त्याच प्रमाणे आज सरकारच्या अनेक योजना जनतेसाठी निघतात, नवनवीन योजना तयार होतात, पण त्याची माहिती किती लोकांपर्यंत पोहोचते? किती जण त्या योजनांचा लाभ घेतात? त्यात ही माहिती जरा इंटरनेटवर येऊ पाहत असेल, तर इंटरनेटच मुळी किती लोक वापरतात? मनाला पडणारे हे सगळे प्रश्न खूपच महत्वाचे आहेत. पण त्याच बरोबर इंटरनेट सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांनी ते वापरावे यासाठी तळापर्यंतच्या लोकांपर्यंत ई-साक्षरता पसरवणे खूप महत्त्वाचे आहे, आणि ई-साक्षर होत असताना प्रत्येकाला त्या मार्गावरच्या अडचणी दूर करण्यासाठी सुनीलसारखी माणसं विचार करत असतात. सुनीलच्या या पुस्तकाने लोकांचं काम खूपच सोपं झालं आहे. खरोखरचं हे पुस्तक घरोघरी असणं आवश्यक आहे. कारण या पुस्तकातून प्रत्येकाला हवी ती योजना, त्याचे लाभ, त्याची माहिती सारं सारं इंटरनेटवर कसं बघायचं हे सांगितलं आहे, त्यामुळे कम्प्युटरची, इंटरनेटची भीती चमत्कार करावा तशी सुनीलनं पळवून लावली आहे.
    सुनीलच्या पुस्तकात विश्वकोशानं सुरुवात झाली आहे. विश्वकोश कुठल्याही शुल्काविना इंटरनेटवर कसा उपलब्ध आहे आणि तो कसा पाहायचा या विषयीही माहिती हे पान वाचकांना सांगतं. तसंच प्रत्येक व्यक्तीचं आपलं स्वत:चं घर असावं असं स्वप्न असतं. हे स्वप्न पूरम होताना सर्वसामान्य लोकांचा संबंध मुद्रांक आणि नोदंणी कार्यालयाशी येतो. मालमत्तेच्या खरेदी-विक्री संबंधात कागदपत्रांची  नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी होत असते. आय-सरिता नावाचं त्याचं पोर्टल कसं बघायचं हेही या पुस्तकात समजावून सांगितलं आणि दाखवलं आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यासंबंधीची सर्व माहिती दिलेल्या संकेतस्थळावर मिळू शकते. अपंगासाठीचंही पोर्टल इथे बघायला मिळतं. आधार कार्ड कसं काढायचे? याचीही माहिती इथेच एका पेजवर मिळते. आरोग्याच्या संबंधाबाबत आशा स्वयंसेविका योजना यांच्याविषयी माहिती सांगणारं पानही इथे बघायला मिळतं. ई-रिक्रुटमेंट पासून अनेक कामं या संकेतस्थळाला भेट देऊन कमी वेळात करता येतात व ती कशी करावी याची माहिती कळते. सुनीलने अशा ३० प्रकारच्या योजना, प्रकल्प या पुस्तकातून लोकांसमोर आणल्या

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Friday, September 05, 2014

जन्म शाळेचा

परीक्षा तुझ्यासारख्या पोरांनी द्यायच्या नसतात. तुमची औकात तरी आहे काय रे शाळेत शिकायची. म्हणे परीक्षेला का बसून देत नाहीत.” एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक आपल्या शाळेतील विद्यार्थ्याला झापत होते.
“पुन मना ६० % परल्न मागचे सामाईन” तो विद्यार्थी खाली मान घालून आपल्या सरांना आपली योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करत होता.
“तुझ्या बापाला येऊन भेटायला सांग, त्याला सांगतो मी तुला किती मार्क पडलेत ते.....” इति मुख्याध्यापक
*******************

“मास्तर येऊ का?” एक शेतकरी वेशातील माणूस उभा होता.
“कोण रे तू ?” मुख्याध्यापक गरजले
“मी ते बोकडवीरा गावांशी पाटील, पोराला काल निरोप दिल्ताव म्हन्गुन आलतू” तो शेतकरी म्हणाला
“हं..” एखाद्या तुच्छ किड्याबरोबर बोलावे तसे ते मुख्याध्यापक बोलत होते. “तुझ्या पोराला परीक्षा द्यायची आहे तेव्हा 2 पोती तांदळाची माझ्या घरी पाठवून दे, तर तुझ्या पोराला परीक्षा देता येईल, नाहीतर नाही समजल?”
“बर मास्तर, देतो पाठवून” आपल्या पोराच्या भविष्यासाठी कोणताही वादविवाद न करता त्याने ते कबुल केले.
त्याच शेतकऱ्याची नाही तर संपूर्ण महालणातल्या (महालण तालुक्यातील १२ गाव म्हणजे एक महालण) घराघरात हीच परिस्थिती होती. ह्या महालणाचा एकाच देव तो म्हणजे वाजेकर शेठ.

*****************************

सगळे शेतकरी वाजेकर शेठला भेटायला आले “शेट, कयतरी करा तो किंद्रे मास्तर आपले पोरांना परीक्षा नय देऊन देय, कोणाला ४ पोती, कोणाला ३ पोती, २ पोती अस चावूल त्याचे घरा पोचवला सांगतय, अस चावूल दिला तर खावाच काय? आणि दिलं नय तर पोरांना शिकू नय देवाचा तो.......
हाच तो क्षण जिथे महालण हायस्कूल म्हणजेच तू. ह. वाजेकर हायस्कूल चा जन्म झाला.....

*****************

वाजेकर शेठ घरी आले आणि आपल्या जावयाला भेटले व सगळी कथा सांगितल्यावर विचारले “जनार्दन, कस करायचं रे पोरांचं भविष्य टांगणीला आहे. काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. तू पोरांना शिकवू शकतोस का?”
“शिकवायला मी शिकवेन पण शाळा सुरु कशी करायची?” जनार्दनने आपल्या सासऱ्याना प्रतिप्रश्न केला.
“त्याची चिंता तू नको करू मी माझ्या ओळखी वापरतो. त्यावेळी वाजेकर शेतकरी कामगार पक्षात होते आणि एन. डी. पाटील (रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत) हे हि शेतकरी कामगार पक्षात होते. त्यामुळे त्यांनी वाजेकर व रयत शिक्षण संस्था सातारा यांचा संवाद घडवून आणला व येथे उरण येथे गरीब मुलांसाठी शाळा काढावी हि विनंती केली. ती विनंती लगेच मान्य झाली. तुम्ही जागा द्या आम्ही लगेच शाळा काढतो. म्हणून वाजेकरांकडे निरोप आला.

*****************

MSEB (त्यावेळी MSEBच होते आता ते maha-GENCO म्हणून ओळखले जाते) बोकडवीरा चे पदाधिकारी “नमस्कार पाटील साहेब, तुमचे नवीन घर पूर्ण झाल्याचे कळले, एक काम होते. आपल्याला MSEB साठी ऑफिस करायचे होते. तुम्ही तसंही मुंबईला राहता तेव्हा गावाचे घर भाड्याने दिलेत तर बरे होईल.... आम्ही महिना ३०००/- भाडे देऊ (१९६३ साली MSEB ने हि रक्कम ऑफर केली होती.) किमान 2 ते ३ वर्षासाठी हवे आहे  तोपर्यंत MSEBची इमारत तयार होईल, भाडे वाढवून हवे असेल तर ६ महिन्याने वाढवू आपण, बघा विचार करा.”
“भाडे ठीक आहे पण मला येथे महालणातल्या मुलांसाठी शाळा चालू करायची आहे, त्यामुळे मी तुम्हाला जागा देऊ शकत नाही असे स्पष्टपणे सांगून ती ऑफर नाकारली.

आणि ६ जून १९६४ साली इयत्ता आठवीचा वर्ग सुरु करून महालण सभा विद्यालयाच्या शुभारंभाचा श्रीफळ वाजेकरांच्या हस्ते श्री जनार्दन पाटील बोकडवीर यांच्या घरी फोडला गेला व शाळा सुरु झाली. आणि किंद्रे मास्तरांच्या जाचातून मुलांची सुटका झाली. गावात ७ वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा होती तेव्हा त्यामुळे आठवीचा वर्ग सुरु केला गेला. पुढे पुढच्या वर्षी ९ वी चा वर्ग गावाच्या देवळात भरला परंतु दहावीचा वर्ग कुठे भरवणार ह्या प्रश्नाने डोक वर काढायला सुरुवात केली.

एका मोठ्या जागेचा शोध सुरु झाला आणि ह्या १२ गावातील ‘फुंडे’ या गावाने हा प्रश्न आपली जमीन शाळेसाठी दान देऊन सोडवला. पण बांधकाम करायचे म्हणून कामावर जाणाऱ्या प्रत्येकाला शाळेच्या कामासाठी श्रमदान करणे सक्तीचे केले. तसेच पैसे उभे करण्यासाठी कार्यक्रम केले जायचे त्यासाठी तिकीट हि प्रत्येकाला सक्तीची केले होते.

पैसे उभे करण्यासाठी वाजेकर मोठ्या लोकांना जाऊन भेटायचे व त्यांचे कार्यक्रम ठरवायचे यातच संगीतकार कल्याणजी आनंदजी यांचाही कार्यक्रम झाला. प्र. के. अत्रेंनी तर आपले नाटकाचे प्रयोग करण्याची परवानगी दिली व मला कोणतेही मानधन देऊ नका गरज नाही ते पैसे शाळेसाठी वापरा म्हणून सांगितले. अशा प्रकारे 10 वीचा वर्ग आला तेव्हा तेथे ३ खोल्या उभारल्या गेल्या होत्या व हळू हळू शाळा आणि तिची इमारत वाढवली गेली.

१९८१ साली वाजेकर गेल्यावर त्या शाळेला नाव “तू. ह वाजेकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे” असे नामकरण करण्यात आले. मी स्वत ह्याच शाळेत शिकले आम्ही जेव्हा या शाळेत शिकायला गेलो. तेव्हा कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय हि सुरु झाले होते. आज ह्या शाळेत तुम्ही ५ वी साठी प्रवेश घेतला तर किमान कला, विज्ञान, वाणिज्य या डिग्री पर्यंत  शिक्षण घेता येते. आज या शाळेला 50 वर्ष पूर्ण झालीत (१९६४ ते २०१४).

मी गर्वाने सांगू शकते कि ज्या जनार्दन पाटीलांच्या घराचा उल्लेख झाला ते माझ घर आहे त्या घरात माझे सगळ बालपण गेल. ते जनार्दन पाटील माझे आजोबा आणि तू. ह. वाजेकर माझे पणजोबा आहेत. तुम्हा दोघांना हि धन्यवाद तुम्ही शिक्षक नाही झालात पण महालणातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक मिळवून दिलेत. फुंडे ग्रामस्थांनी कोणताही मोबदला न घेता जमीन दान दिली आज त्या जमिनीची किंमत काही कोटी रुपयात आहेत. तुमचे उपकार विसरता येणार नाही तुम्ही नसतात तर आजही कुठल्यातरी शाळेचा मुख्याध्यापक आमची औकात काढत असता आम्ही आम्ही खाली मान घालून उभे राहून ऐकत असतो.