१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - 4


१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख करताना झाशीच्या राणीच्या पाठोपाठ नाव घ्यावे असे नाव म्हणजे बेगम हजरत महल. १८५७ च्या संग्रामातील बेगम हसरत महल चे स्थान अद्वितीय होते. अवधचे विशाल  राज्य खालसा करून इंग्रजी अमलात समाविष्ट केले. हताश झालेल्या मुत्सद्दी व कारभारी यांनीही वनवास पत्करला. पण आपल्या बिर्जीस कादर नावाच्या अल्पवयीन बालकाला घेऊन बेगम हजरत महल हि लखनौतच राहिली होती शेवटी तिनेच आपल्या प्रचंड कर्तुत्वाने  अवधचा एवढा मोठा भाग स्वतंत्र झाला होता कि ईस्ट इंडिया कंपनीच्या खुद्द सरसेनापतीला चतुरंग दलासाहित तिच्याशी टक्कर द्यावी लागली होती. सतत २ वर्षे चालू असलेल्या ह्या युद्धात एकाहून एक धुरंधर इंग्रज सेनापती मारले गेले. अशा या बेगम च्या शौर्याची कहाणी


बेगम हजरत महल चा पूर्ववृत्तांत

१८४७ मध्ये वाजीद आली शहा हे अवध चे नबाब झाले. लखनऊ हि त्यांची राजधानी होती. एका साधारण गरीब घरात जन्म घेतलेली मोहम्मदी खातून ला बेगम हजरत महल हा किताब लग्नानंतर अवधचा बादशहा वाजीद आली शहा ने दिला इतकेच नव्हे तर इफ्तिख़ार उन निसा (स्त्री रत्न ) म्हणून गौरव हि केला. सन १८०१ मध्ये वाज़िद अली शाहच्या पूर्वजांनी इंग्रजांशी करार केला होता आणि हा करार आपण टाळू शकत नाही ह्याच पुरेपूर भान वाज़िद अली शाहला होत. अवधला गिळंकृत करण्यात दोन मोठे अडथळे होते. पहिला अवधचा प्रधान अमीनुद्दौला आणि दुसराअलीशाहची तत्परता आणि योग्यता. अलीशाहची योग्यता आणि इमानदारी यांबद्दल इंग्रजही अनभिज्ञ नव्हते. अवधचं राज्य बरखास्त करणं हे कंपनीचं एकमात्र लक्ष्य होतं. दुसरी गोष्ट म्हणजे अलीशाहचा प्रधान आणि इतर मंत्र्यामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान यशस्वी होत नव्हतं. त्यामुळे कंपनीला फूटनीतीच्या पर्यायावर अधिक विसंबणं शक्य नव्हतं आणि दुसरा चांगला पर्यायही नव्हता, पण सन १८५६ Governor General Lord Dalhousie याने आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षात अवध चा मुलुख गिळंकृत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इंग्रजी सरकारनं अवध बळकावण्यासाठी आणि आपल्या क्रौर्याचं दर्शन घडवण्यासाठी वाज़िद अली शाहला निहायतनिकम्माविलासीआणि गैर जिम्मेदार’ ठरवण्यासाठी अनेक खोटय़ा कहाण्या रचल्या व अवधचा नबाब वाजिदअली शहा याला पदच्युत करून इंग्रजांनी त्याला कलकत्त्याला (कोलकता) पाठवले. पण प्रत्यक्षात जनता इंग्रज सरकार पेक्षा नबाब वाजिदअली शहा यांच्या राज्यात सुखी होती त्यामुळे त्याची बेगम हसरत महल हिने या अन्यायाचा बदला घेण्यासाठी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली.



बेगम हजरत महल चे अदभूत संघटन कौशल्य

अवधचे राज्य खालसा झाल्यानंतर हताश झालेले राज्याचे मुसद्दी व कारभारी यांनी वनवास पत्करला. ते जंगलात निघून गेले. वाजीद आली शाह च्या बेगामांनाही तेथून पलायन करावे लागले. दरबारी मुसद्दी जरी परागंदा झाले तरी बिर्जीस कादर नावाच्या आपल्या अल्पवयीन मुलाला घेऊन बेगम हजरत महल लखनौमध्येच राहिली. तिचे संघटन कौशल्य वाखाणण्याजोगे होते. लखनौमध्ये वास्तव्य करून प्रजेला धीर देण्याचे व पुढील स्वातंत्र्याच्या योजना निश्चित करण्याचे कार्य तिने सुरु केले. धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे प्रभृती क्रांतिनेत्यानी इंग्रजांना या देशातून हाकलवून लावण्याच्या योजना आखल्या त्यात त्यांना प्रारंभापासूनच बेगम हजरत महल चे सहकार्य लाभले होते. बेगम ने आपल्या विश्वासाचे मौलवी व पंडित निवडून त्याच्या मार्फत संपूर्ण राज्यभर आगामी संग्रामाचा प्रचार चालू ठेवला. देवळा – देवळांतून व मशिदी- मशिदीतून हिंदू – मुस्लीम नागरिकांच्या सभा घेऊन या पंडितांनी व मौलवींनी लोकांची मने स्वातंत्र्य युद्धासाठी प्रभावित केली होती. इतकेच नव्हे तर बेगम हजरत महल ने मानसिक तयारी करून घेतलेल्या पंडित आणि मौलवींनी अवध प्रांताबाहेर हि पदभ्रमण करून लोकांची मने वळविली व हिंदू – मुस्लीम जनतेच ऐक्य घडवून आणले होते. हिंदू-मुस्लीम ऐक्याचा इतका सुंदर संगम १८५७ नंतर कधीच दिसला नाही.

बेगम हसरत महलने काही स्त्रियांना युद्ध प्रशिक्षण दिले होते. १८५७ साली या स्त्रिया बेगमबरोबर युद्धभूमीत उतरल्या होत्या. त्या बहुतेक जनानखान्यातील दासी व इतर काम करणाऱ्या स्त्रिया असाव्यात. अजीजननावाची नर्तिका आपले विलासी जीवन सोडून हसरतमलच्या प्रेरणेने क्रांतिकार्यात उतरली. ही नर्तिका इंग्रजी सैनिकांच्या छावणीत जाऊन संगीत व नृत्याद्वारे सैनिकांचे मनोरंजन करी व गुप्तहेराचे काम करी. दिवसा ती पुरुषी वेषात युद्धभूमीवर असे. उठाव दडपून टाकण्यात इंग्रजांना यश येऊ लागले. त्याच वेळी ती पकडली गेली. इंग्रज अधिकारी हॅवलॉकतिचे सौंदर्य पाहून थक्क झाला. ती माफीची साक्षीदार झाली तर तिला जीवदान दिले जाईल, असे तिला म्हणाला. पण तिने जीवदान नाकारले. अजीजन ही शांत चित्ताने व हसतमुखाने फायरिंग स्क्वाडसमोर उभी राहिली. क्षणार्धात तिच्या सुंदर शरीराच्या चिंधडय़ा उडाल्या. अजीजन हुतात्मा झाली. 



बेगम चा झंझावात



बेगम हजरत महल ने ३१ मे १८५७ रोजी उठावणी करण्याची सिद्धता केली. ३० मेलाच रात्री १२ वाजता तोफ वाजली आणि अवध चे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले. आधीच ठरल्याप्रमाणे इंग्रजांच्या इमारती जाळण्यात आल्या, इंग्रजांचे झेंडे फेकून दिले व त्याजागी स्वातंत्र्यचे हिरवे ध्वज फडकविण्यात आले. लखनौचे पोलीस व मुल्की सरकारी कर्मचारीहि स्वातंत्र्यवाद्यांना येऊन मिळाले. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता त्या सर्वानी झुगारून दिली. एका रात्रीत लखनौवरचा इंग्रजांचा अंमल नाहीसा करून बेगम ने आपला अंमल प्रस्थापित केला. लखनौपाठोपाठ ३ जून ला सीतापूर चे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले. त्या नंतर लगेचच फारुकाबादवरही ताबा घेण्यात आला. दि. १० जूनपर्यंत मोहम्मदी व पुढे मालन बहाराईच, गोंडा, सिकारीरा मेलापूर इत्यादी अवध राज्यातील सर्व ठिकाणी इंग्रजांची सत्ता नष्ट करून स्वातंत्र्याचा ध्वज फडकू लागला होता. एकूण बेगम हजरत महल ने क्रांतीयोजानेची केलेली हि इतर कोणत्याही नेत्यापेक्षा निर्दोष व सुसंघटीत होती. 



स्वातंत्र्या च्या जल्लोषात व्यर्थ काळ न घालविता अगदी विजेच्या वेगाने संपूर्ण भागात क्रांती घडवून आणली आणि इंग्रजी सत्ता नष्ट करून दाखविली व मिळालेले स्वातंत्र्य स्थिर करण्याच्या उद्योगाला ती लागली. ७ जुलै १८५७ ला आपला ११ वर्षीय पुत्र बिर्जीस कादर याला तिने गादीवर बसवले व त्याची पालिका म्हणून राज्याचा सर्व कारभार स्वताच्या हाती घेतला. राजा बाळकृष्ण सिंह यांच्या सारख्या श्रेष्ठ योग्यतेच्या हिंदू राजाला प्रधानमंत्री पदाची वस्त्रे देण्यात आली. अशा या न्यायी आणि योग्यता पूर्ण  कारभारामुळे बेगम हजरत महल ने जनतेच्या मनात आदराचे स्थान पटकावले होते. तिच्या प्रजाप्रेमाने मुग्ध होऊन हिंदुस्तानचा तत्कालीन Governor General Lord कॅनींग यानेही म्हटले होते कि तिच्या आज्ञेखातर अवध चा प्रत्येक नागरिक आपल्या सर्वस्वाचे बलिदान करण्यास तयार झालेला होता.



दिल्लीत मोघल बादशहांचे रक्त प्राशन करणारा इंग्रज सेनापती हडसन हा या लखनौ संग्रामात ठार झाला. पण तिच्या नशिबी कदाचित अवध वर राज्य करण्  लिहिले नसावे कारण तिने अवध बरोबर हिंदुस्थान हि स्वतंत्र व्हावा ह्या उद्दात हेतूने सैन्य बाहेर पाठवले होते. तिचे सैन्य दिल्ली मोहिमेवर असताना पराभूत झाले, रसद नीट नाही, त्यात संघटन शक्ती कमी, अजून शाप म्हणून लाभलेली फितुरी अशा अनेक कारणामुळे तिकडे प्रभाव पत्करावा लागला. आणि ब्रिटीश सैन्याच्या प्रचंड आक्रमणाखाली लखनौचा प्रतिकार चिरडला गेला.  १८५७ चे नोहेंबर उजाडताना Sir Colin Campbell ब्रिटीश सैन्याचा Chief Commander लखनौ वर चालून आला. अतिशय कडवी झुंज दिली. क्रांतीवाद्यानी लखनौ मध्ये सुरुवातीला पकडण्यात आलेले ब्रिटीश कैदी यांना ठार मारण्याची बेगम कडे परवानगी मागितली; प्राप्त परिस्थितीत त्यांना नकार देणे शक्य नव्हते पण तरीही बेगमने ६ ते ७ इंग्रज कैदी क्रांतीवाद्यांच्या ताब्यात दिले सैनिकानी तत्काळ त्यांना गोळ्या घालून ठार केले पण आपल्या मानवतेचा साक्षात्कार घडवीत बेगम ने इंग्रज स्त्रियांना आपल्या महालात संरक्षण दिले. बेगम ने या प्रसंगी व्यक्त उदार मानवतेचा गौरव Charles Ball यांनी आपल्या  “Indian Mutiny” या पुस्तकात केला आहे. 


ब्रिटिशांच्या प्रचंड सैन्यापुढे लखनौचा प्रतिकार चिरडला गेला. ब्रिटीशांनी फोडा व राज्य करा ह्या नीतीचा वापर करीत बेगम च्या सैन्यातच फुट पडली. त्यामुळे डिसेंबर १८५७ जौनपुर व आझमगढ ह्या भागात सैन्याला मिळणारी रसद थांबली व तिची पीछेहाट झाली. नानासाहेबांचा हि पराभव झाला. २५ फेब्रुवारी १८५७ आलम बाग पडले. पण बेगम आपल्या अंगीकृत व्रताने जराही ढळली नाही शाही महालातील विलासी जीवनाला तिने कधीच अर्धचंद्र दिला होता. ब्रिटिशांच्या आक्रमणाला तिने जोरदार प्रत्युत्तर दिले, तिच्या या तुफानी प्रतिकाराला तोंड द्यायला अनेक ब्रिटीश अधिकारी पुढे सरसावले पण सेनापती मागून सेनापती यमलोकाची वाट धरू लागले. 



२ मार्च १८५८ Sir Colin Campbell ३०,००० हजाराची फौज घेऊन लखनौ वर चालून आला लखनौविरुद्धच्या लढ्याला नव्याने सुरुवात केली. १८ मार्च १८५८ ला लखनौ चे महत्वाची ठिकाणे पडली होती. बेगमची पीछेहाट होत असली तरी तिने अजून धीर सोडला नव्हता ती निकराने लढत होती. २१ मार्च १८५८ ला लखनौ पडले. बेगम अवध मध्ये थांबली अशावेळी ठिकठिकाणचे क्रांतीनेते बेगमच्या परिसरात गोळा होऊ लागले होते. अवध हाच आशेचा किरण त्यांना दिसत होता. थोड्याच अवधीत नानासाहेब व बाळासाहेब पेशवे, बिलयातशहा, अलीखा मेवाती फिरोजशहा, बक्तरखा, खानबहाद्दूर खा, निजाम आली खा, मामू खा, राजा नरपतीसिंह राजा बक्ष बहुनाथ सिंह, चंदासिंह, गुलाबसिंह, भूपालसिंह, हनुमंतसिंह, राजा वेणीमाधव, जगराजसिंह इत्यादी. क्रांतीनेते अवध मध्ये एकत्र आले. बेगम हजरत महल च्या नेतृत्वाखाली पुनः त्यांची एक प्रबळ संघटना तयार झाली. हि संघटना तयार करताना मौलवी अहमदशहा ची बरीच मदत झाली पुढे तर अहमदशहा आपली लढवय्या वृत्ती पण दाखवली. 

सन १८५८ च्या जून महिन्यात लखनौ वर आक्रमण करून ते काबीज करण्याच्या योजना बेगम हजरत महलच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारक दल आखू लागले. १८५८ च्या मार्च – एप्रिल पासून जून पर्यंत चार महिने गेले या कालावधीत ब्रिटीश सैन्याला एका क्षणाचीची उसंत मिळू शकली नाही. वस्तुत: मूळ संग्राम सुरु होऊन आत्ता वर्ष उलटले होते. इतरत्र भडकलेला हा वणवा आत्ता विझत चालला होता पण अवध अजूनही जळत होते बेगम ने विकसित केले प्रतिकार युद्ध पाहून इंग्रजांची गाळण उडाली. त्यांचा सेनापती Sir Colin Campbell पुन्हा एकदा सेना संचालनासाठी धावून आला व अवध मध्ये ठाण मांडून बसला. प्रचंड ब्रिटीश सामर्थ्यानिशी तो जातीने युध्द खेळू लागला. पण बेगम ने अंगीकारलेले युद्धतंत्र पाहून तो फार अस्वस्थ झाला. १ ऑक्टोबर १८५८ ला तिने आपल्या सेनापतीला पत्र पाठवले व त्यात त्यांना युद्धतंत्राविषयी माहिती देऊन त्यांचा अत्माविशास वाढवला. एवढेच नव्हे तर ती स्वत: मैदानावर लढाईला उतरली होती. 


हिंदी संस्थानिकांची राज्ये खालसा करण्याचे घातक धोरण अवलंबू नका, असे त्याच वेळी Governor General Lord Dalhousie च्या कानी कपाळी ओरडून सांगितले होते पण ते निष्फळच ठरले. हिंदी संस्थानिकांकडून होणारा कडवा विरोध बघता शेवटी पार्लमेंटमध्ये कायदा पास करून ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार काढून स्वतःच्या हाती घेतल्यावर १ नोव्हेंबर १८५८ रोजी महाराणी विक्टोरिया च्या नावे एक जाहीरनामा प्रसिद्ध केला.  हिंदी लोकात या जाहीरनाम्यामुळे बुद्धिभेद होईल हि अपेक्षा होता आणि बऱ्याच अशी ती सफल पण झाली कारण जाहीरनाम्याच्या मायावी भाषेचा तो प्रताप होता पण ह्या मायावी भाषेच्या मागे साम्राज्यवादी ब्रिटिशांची तृष्णा  दडलेली आहे हे बेगम हजरत महल ने जाणले. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारच्या घटनात्मक राज्यकारभाराचा प्रारंभ या जाहीरनाम्यापासूनच झाला, ब्रिटीश सम्राज्ञीने  प्रसिद्ध केलेल्या या मायावी जाहीरनाम्याला तितकेक करारी उत्तर देत बेगम हजरत महल आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

विक्टोरियाच्या जाहीरनाम्याला बरोबरीच्या नात्याने उत्तर देणारा आपला जाहीरनामा बेगम हजरत महल ने प्रसिद्ध केला. तिचा हा जाहीरनामा स्वातंत्र्यवादी साहित्यात सुवर्णाक्षरात झळकत राहील. भारतीय स्वातंत्र्याचे जे युद्ध शास्त्रज्ञांच्या विनाशकारी साधनांनी लढले जात होते त्याची पातळी बेगम हजरत महल च्या उत्तराने एकदम उच्च नैतिक व बौद्धिक स्तरावर उचलली गेली त्यामुळे राणी विक्टोरिया पेक्षा बेगम चे नैतीकपीठ फार उंच असल्याचे सिद्ध होते. बेगम हजरत महल च्या मते विक्टोरिया चा राजीनामा म्हणजे एक मायाजाळ आहे. बेगम चे म्हणणे किती सत्य होते हे इंग्रज लेखकांनीच सिद्ध केले आहे. इतिहास लेखक जेम्स स्टीफनने मायावी कागद कायदेशीर बिनकिमतीचे असे त्याचे वर्णन केले आहे. 

हिंदुस्थानावर राज्य करण्याचा अधिकार जसा ईस्ट इंडिया कंपनीला नव्हता तसा तो ब्रिटीश सरकारलाही असू शकत नाही असे उघड आव्हान बेगम ने इंग्रज सरकारला दिले होते. क्रांतिकारी २ वर्षे लढत होते तेव्हा ब्रीतीशनी आणखी कुमक मागवली शेवटी नानासाहेबांनी नेपाळ दरबारी बोलणी केली कि, भारतीय स्वातंत्र्यवाद्यांना नेपाळ मध्ये आपले केंद्र स्थापन करू द्यावे व तेथून भारतीय स्वातंत्र्यसंग्राम चालू ठेवण्यास आवश्यक त्या सवलती मिळाव्यात परंतु नेपाळ दरबार ने परवानगी नाकारली इतकेच नव्हे तर भारतीय क्रांतिकारक जर नेपाळ मध्ये शिरले तर त्यांचा पाठलाग करण्याची परवानगी ब्रिटिशांना देण्यात आली. अशा तऱ्हेने स्वातंत्र्ययुद्ध स्वदेशाबाहेर जाऊन लढण्याचा प्रयत्न केला पण तोही अपयशी ठरला. शेवटी ब्रिटीश सरकारने चहूबाजूंनी घेरल्याने हिमालय पर्वताच्या कुशीत आश्रय घेणे एवढा एकाच उपाय होता पण तोही सोपा नव्हता ब्रिटीश सैन्याशी मुकाबला करीतच जावे लागले त्या युद्धात ले. ग्रांट हा इंग्रज सेनापती ठार झाला. व ले. बिकार जबरदस्त जखमी झाला. बेगम हजरत महल, नानासाहेब पेशवे व बाळासाहेब हे पहाडाच्या दुसऱ्या रांगेत निघून गेले. पण हिमालयात शिरणे म्हणेज नेपाळच्या हद्दीत प्रवेश करणे असाच होता. ती परवानगी नेपाळ दरबार ने नाकारली होती शिवाय ब्रिटिशांना त्यांचा पाठलाग करण्याची परवानगी हि दिली होती. परंतु हिमालयाच्या दुर्गम भागात शिरलेल्या माणसांचा पाठलाग करून त्यांना शोधणे ब्रिटीश सरकाच्या दृष्टीने हि कठीण होते. परंतु नेपाळ सरकारने स्त्री दाक्षिण्य दाखवत बेगम हजरत महल ला नेपाळ हद्दीत प्रवेश दिला.  तेथूनही बेगम ने क्रांतिकारकांना जमेल तेवढी मदत केली. नेपाळ मधील काठमांडू येथे त्यांचा मृत्य झाला , काही ठिकाणी मृत्यची नोंद १८७४ तर काही ठिकाणी १८७९ अशी दाखवली जातेय. नेपाळ मध्ये आजही तिची कबर आहे.    



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

  1. छान! बेगम हजरत महल बद्दल इतिहासाच्या पुस्तकात वाचाल होत पण हे सविस्तर वाचून खरच खूप छान! आणि हो धन्यवाद!

    ReplyDelete
  2. khupach chan, itaka itihas kharach chan abhyas ahe tujha. keep it up dear.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!