रॅगिंग.....................एक विकृती


रॅगिंग एक विकृती हा चित्रपट १८ मार्च २०११ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. कॉलेज मध्ये असताना कॉलेज मॅग्झीन मध्ये रॅगिंग वर लेख लिहिला होता. त्यासाठी रॅगिंग वर जवळून केलेला अभ्यास आणि त्याचे भीषण अनुभव, हे सगळे एका क्षणात डोळ्यासमोर तरळून गेले. म्हणूनच हा चित्रपट पाहण्याची फार उत्सुकता होती परंतु ह्या मार्च एंडिंग ने सगळ्या उत्साहावर पाणी ओतले. परंतु ह्या चित्रपटाचा रिव्यू वाचण्याचा योग आला, म्हणूनच कॉलेज मध्ये असताना लिहिलेला लेख येथे देत आहे, काळानुरूप बदल झालेत पण भीषणता अजूनही कायम आहे. गेल्या अनेक वर्षापासून विशेषतः गेल्या दशकात " रॅगिंग " हा शब्द आपल्या अनेकांच्या वाचनात आला असेल. प्रत्येक गोष्टीत प्रगत असणाऱ्या या महाराष्ट्रातसुद्धा विविध ठिकाणी कॉलेज मधून रॅगिंगचे अमानुष प्रकार आपण सर्वानीच वाचले आहे. तरीही त्यांच्या होणा-या मानसिक व शारीरिक छळाविरुद्ध काहीच करू शकत नाही; कारण "परदुख:तील" या नात्याने पेपर मधल्या बातम्या वाचून सारेचजण विसरून जातात. क्षणभर तीव्र दुख: व संताप काही व्यक्ती त्यांच्या जिवंतपणाचे द्योतक म्हणून करत असतीलही, परंतु ते सारे क्षणभरच अन्यथा त्या प्रकाराशी आपले काही देणे-घेणे नाही. अशाच विचाराने वागतात; सर्व घटना विसरून जातात. कारण रॅगिंगला बळी पडलेली मुलगी व मुलगा आपल्या नात्यातील किंवा कुटुंबातील तसेच आपला शेजारी नसतो; म्हणूनहि असेल कदाचित! हा अनुभव जमेस धरला तर आपण सारेचजण अबोलपणाने एका सामाजिक रोगाला, तो पसरण्यासाठी प्रोत्साहनच देत असतो; असे म्हणावे लागेल. 

रॅगिंग पूर्वीही केले जायचे परंतु त्यामागे चांगला उद्देश होता कॉलेज मध्ये खेळी-मेळीचे वातावरण निर्माण व्हावे, नवीन विद्यार्थ्यांच्या ओळखी व्हाव्यात. त्यांनी बुजरेपणा सोडून नव्या वातावरणात रमावे; त्यासाठी साराचे खोटे निरोप दे, उगाच टिंगल-टवाळी कर, नोटबुक लपाव,उगाच खोटे प्रेओफेस्सोर बनून फसवणे, त्यामुळे नुकसान न होता धमाल उडत होती, बाहेरून आलेले विद्यार्थ्यांचा होनेसिकक्नेसस कमी होण्यास मदत मिळत होती. परंतु आत्ता रॅगिंग चे स्वरूप बदलत आहे. आताच रॅगिंग हे विकृत स्वरुपात केले जाते. भर कॉलेज मध्ये विकृत चाळे करायला लावणे, कपडे काढून नाचायला लावणे, विद्यार्थिनीशी गैरवर्तन करायला लावणे; आपली सर्वे कामे करायला लावणे. विद्यार्थी बाहेरून आला असेल तर मग त्याच्याकडून आपली सगळी कामे करून घेणे तसेच अशा प्रकाराला थोडा जरी विरोध दर्शविला तर त्या विद्यार्थ्याला मारहाण केली जाते. आणि "कोणाला सांगितलेस तर याद राख परिणाम ह्याहून अधिक वाईट होतील" अशी गर्भित धमकी हि दिली जाते. तो विद्यार्थी घाबरून गप्पं बसला तरी त्याचा छळ थांबत नाही. पण हे सर्व का ?? ह्या प्रश्नच उत्तर रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्याकडे हि नसते, विचारलं तर सांगतात " वी अरे जस्ट जोकिंग !!" पण त्यांच्या ह्या जोकिंग मध्ये एखाद्या विद्यार्थ्याच भविष्य बदललं जातं ह्याची त्यांना साधी जाणीव हि नसते. एखादा विद्यार्थी उच्च शिक्षणाची स्वप्ने उराशी बाळगून कॉलेजच्या आवारात प्रवेश घेतो. पण हि विकृती सहन करताना त्याच्या आशा - आकांक्षा -स्वप्नांचा चक्काचूर होत असतो, स्वप्नउराशी बाळगणारा, विद्यार्थी कॉलेजच नाव काढण्यास देखील घाबरतो काही तर आत्महत्या हि करतात. गेल्या सुमारे १०-१५ वर्षात सुमारे १०० हून अधिक विद्यार्थिनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतीलच. ती कोण होती? कोणाची होती? त्यांना नेमकं कोणत्या प्रकाराला सामोरे जावे लागले? याचा तपशील आपल्याला माहित नाही. त्या बातम्या आणि ते विद्यार्थी ह्यांच्या संदर्भात पुढे काय झाले ?? या बद्दल हि काहीच माहिती नाही. गुन्हेगारांना शिक्षा झाल्याचे हि ऐकिवात नाही. शक्यता आहे कि, पुराव्याभावी सर्व प्रकरणे नेहमीच्याच पद्धतीने तपासकामाच्या फाईली मध्ये कायमची बंद झाली. ज्या विद्यार्थ्यांना आत्मसमर्पण करावे लागले त्यांच्या बद्दल न कुणाला फारसे दुख:! न खंत! न खेद! न सहानुभूती! आपण सारेच निष्क्रिय - मृतवत सामाजिक जाणिवांची होळी करून घेतलेली म्हणूनच राखेसारखे!

रॅगिंग कशामुळे? संस्कृतीची घसरण झाली म्हून? संस्कारांचा अभाव म्हणून ? कि सर्वांच्याच सामाजिक जाणीव बोथट झाल्यात म्हणून? जीवनाच्या सांस्कृतिक मूल्यांकडे लक्ष देण्यासाठी, जीवन गतिमान झाल्यामुळे, आज कुणालाच वेळ नाही, घराघरातून पूर्वंपार चालणारी संस्कार केंद्रे उदध्वस्त झाली. संध्याकाळच्या वेळी " शुभंकरोती कल्याणम| आरोग्यम धनसंपदा||" अशी सुरुवात करून, लहान मुलांना संस्कृतीबाबत संस्कारवृद्धीसाठी गोष्टी सांगणारे आजी-आजोबा काळाच्या पडद्याआड गेले. एकत्र कुटुंब पद्धती गेली. आई- वडील आहेत! पण "दूरदर्शनमुळे" त्याची दृष्टी भविष्यातील लांब पल्ल्याच्या गोष्टीपासून बरीच दूर गेलेली! घरातील अशा वागण्यामुळे मुलांची माने संस्कारक्षम बनवणे राहून गेलेले! या सर्वांचा परिपाक म्हणून किशोरवयापासून तारुण्याच्या उंबरठ्यापर्यंत प्रवास करणारा विध्यार्थी भरकटलेला आहे. दिशाहीन झाला आहे! सांस्कृतिक मुल्ये जोपासण्याची त्याला गरजच वाटेनाशी झाली असे म्हणावे का ???

कॉलेज मध्ये रॅगिंग कितीही होत असली तरी ते प्रकरण बाहेर आला कि मग कॉलेज संस्थामधून पूर्वी असे प्रकार झाले नाहीत, असे अगदी निर्भयपणे सांगितले जाते. अशा घटनांच्या चौकशी मधून कितीही प्रकाराने बाहेर पडली तरी त्यांचे पुरावे गोळा करण्याचे काम फार अवघड असते. असे प्रकार फक्त मुलच करतात अस नाही तर मुलींच्या वसतिगृहात हि असे प्रकार होत असतात. उच्च मध्यम वर्गातील मुले असल्याने प्रकाराने पैशाच्या जोरावर दडपली जातात. 

राज्यपालांची मान्यता मिळाल्यावर १५ मे १९९९ रोजी महाराष्ट्र आक्ट नो. ३३, १९९९ चा हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामुळे शैक्षणिक संस्थांमधून चालणाऱ्या / चालू असणाऱ्या रॅगिंगच्या प्रकाराला आळा घालण्याची तरतूद आहे. विधिवत मान्यता मिळाल्यावर १ जून १९९९ पासून ह्या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली. एजुकेशन इन्स्टिट्यूशन ची व्य्ख्या करताना, त्यात कॉलेज व अन्य कोणतीही संस्था , कोणत्याही नावाने चालविलेली असो, ज्यातून शिक्षण दिले जाते, त्या संस्था असे नमूद असून त्यात अनाथालये व बोर्डिंग होम व होस्टेल्स व ट्यूटोरियल इन्स्टिट्यूशन चा समावेश करण्यात आला आहे. याच अनुषंगाने शैक्षणिक संस्थेचे प्रमुख, रॅगिंग म्हणजे काय? यांच्याही व्याख्या अंतर्भूत आहेत. त्यातील रॅगिंग ची व्याख्या हि अत्यंत महत्वाची आहे. ती "Ragging means display or disorderly conduct doing of any such act which causes or is liking to cause physical or psychological harm or raise apprehension or tear or shame or embarrassment to a student in any educational institutions and includes teasing, abusing, threatening or playing practical jokes on or causing hurts to such student." अशी आहे. या व्याख्येनुसार एखाद्या विद्यार्थ्याला अशी गोष्ट करायला लावणे व सांगणे, कि सामान्यपणे ती गोष्ट करण्यास तो विद्यार्थी तयार नसेल. वरील व्याख्या विचारात घेतली तर तसेच तिचा अर्थ नित समजावून घेतला तर एखाद्या विद्यार्थी समुदायला किंवा विद्यार्थ्याला मोठ्या विद्यार्थी समुदायाने किंवा विद्यार्थ्याला जबरदस्तीने भाग पडलेल्या किंवा भाग पाडण्यासाठी बळाचा वापर करून केलेल्या अनेक गोष्टी ह्या रॅगिंग प्रकारात मोडतात. ह्यासाठी असणाऱ्या शिक्षेचे स्वरूप पहिले तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या रॅगिंग करण्यामध्ये सहभागी झाल्याचे सिद्ध झाल्यास, अशा व्यक्तीला ५ वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी तुरुंगवासाची शिक्षा व रु. १०,०००/- (रु. दहा हजार ) रकमेपर्यंतचा दंड होऊ शकतो. रॅगिंग करणे, त्याचा प्रसार करणे, सहभागी होणे, प्रोत्साहन देणे, रॅगिंगच्या प्रकारास उत्तेजन देणे ह्या सर्वांसाठी वरील प्रकारची शिक्षा होऊ शकते. 

हा कायदा अस्तित्वात आल्यापासून याची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे ? कशी? केव्हा? कुठे झाली? याचा तपशील उपलब्ध नाही, तसे काही वाचनात पण नाही. विद्यार्थ्यांचा जीवनाचा अंत करणाऱ्या या प्रकाराकडे; न संस्था चालकांचे लक्ष, न प्राध्यापकांचे लक्ष, न त्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेक्टरांचे! रॅगिंगच्या अमानुष प्रकारामुळे व्यथित होऊन मनोधैर्य गमावून बसलेल्या, मुलांनी केलेल्या आत्महत्या तसेच सोडून दिलेले अभ्यासक्रम; हा विषय त्या व्यक्तिगत विद्यार्थ्याच्या जीवनापुरताच मर्यादित राहत नाही.या प्रकरामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात. आपली मुले शिक्षण घेऊन नाव कमावतील, समाजात चांगले स्थान निर्माण करतील व जीवनात यशस्वी होऊन कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावतील, आपले नाव उज्ज्वल करतील, असा आशावाद प्रामाणिकपणे मनाशी बाळगून, मुलांच्या शिक्षणावर वेळी स्वत: अर्धपोटी राहून, आवश्यक तर कर्ज काढूनही शिक्षण पूर्ण करू इच्छिणारी कुटुंबे नातेवाईक हि उद्ध्वस्त होतात. आयुष्याच्या संध्याकाळी तर सुगीचे दिवस लाभतील म्हणून अशा बाळगणाऱ्या पालकांच्या स्वप्ना पुर्तीची पहाट कधी उगवतच नाही. 

एकंदर परिस्थितीवरून कॉलेज जीवनात सुरुवातीलाच नवीन विद्यार्थ्यांच्या संदर्भात हे दादा विद्यार्थी जेव्हा - केव्हा हे प्रकार सुरु करतात, तेव्हा त्वरित रेक्टर, प्राध्यापक, कॉलेज चे संस्थापक, पालक, मित्र यांच्याकडे अत्यंत निर्भयपणे तक्रार केली पाहिजे. छळाला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली तर उत्तमच! पण हे सर्व विनाविलंब केले तरच भविष्यकाळातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपर्यंत होणाऱ्या प्रवासाला काही प्रमाणात आळा बसेल असे प्रकार टाळता येतील अन्यथा हे असेच चालू राहणार आहे. आपण विरोध करणार, मोर्चे काढणार! या व्यतिरिक्त अन्य काहीही होणार नाही. 


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

२६/११ च्या निमित्ताने....................................