Friday, November 11, 2011

मराठेशाहीतील मनस्विनी

पुस्तक: 
मराठेशाहीतील मनस्विनी
लेखक: 
डॉ. सु. र. देशपांडे
प्रकाशक: 
मेहता पब्लिशिंग हाउस 
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपल्या कर्तृत्वावर जोरावर भरारी घेताना दिसतात. स्त्रीमुक्ती कडे वाटचाल करणारी, आजच्या म्हणजे आधुनिक काळातील स्त्री ही अधिक धीट, अधिक स्वतंत्र, अधिक व्यापक क्षेत्रातील आव्हाने स्वीकारणारी आहे. आजच्या स्त्रीचे हे धडाडीचे व्यक्तिमत्त्व आपण आज कौतुकाने स्वीकारतो. पण अशाच धडाडीच्या, शूर आणि कर्तुत्ववान स्त्रिया तीनशे – चारशे वर्षापूर्वी ही होत्या. कट्टर पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील या स्त्रिया प्रवाह विरुद्ध जाण्याची धडाडी ठेवत. इतिहास शिकण्याच्या निमित्ताने ह्या स्त्रियांचा परिचय आपल्याला झाला असला तरी त्यांचे मूळ जीवनचरित्र माहिती नसल्याने त्यांच्या विषयी निर्माण झालेले प्रवाद आणि त्यांच्या कामगिऱ्याच स्मरणात राहतात.


राजघराण्यातील स्त्रिया म्हणजे नाजूक, परावलंबी असतात. महालापलीकडे त्यांचे जग नसते असा सर्वसाधारण गैरसमज असलेला दिसून येतो, पण मराठेशाहीतील काही स्त्रिया आपल्या वैध हक्कासाठी, कर्तव्यासाठी, मुलांसाठी, स्वराज्यासाठी संघर्ष करताना, वेळप्रसंगी जीवाची बाजी लावताना किंवा राजकीय कटकारस्थाने ही करताना दिसल्या. शिवमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, महाराणी जिजाबाई (करवीर), मस्तानी, गोपिकाबाई, आनंदीबाई, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई अशा ९ मनस्विनींचा विस्ताराने परिचय डॉ. सुरेश र. देशपांडे यांनी “मराठेशाहीतील मनस्विनी” या पुस्तकाद्वारे करून दिला आहे.

मराठेशाहीतील अस्सल ऐतिहासिक साधनांचा विशेषत: तत्कालीन पत्रांचा धांडोळा घेऊन या स्त्रियांचा परिचय देण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला असल्याने त्यांच्या विषयी नवी माहितीही आपल्याला या पुस्तकातून मिळते. राज वैभव पायाशी लोटांगण घालत असतानासुद्धा नियतीने प्रत्येकीच्या जीवनात अनेक खडतर प्रसंग उभे केले. या प्रसंगांच्या वेळची त्यांची सोशिकता, सहनशीलता, प्रसंगावधान आणि नियतीवर मात करण्याची जबरदस्त जिद्द व महत्त्वाकांक्षा त्यांच्या जीवनचरित्रातून पाहावयास मिळते.

जानेवारी १६६४ मध्ये शहाजीराजांचे अपघाती निधन झाल्यावर जिजाबाईंनी सती जाण्याचा दृढनिश्चय केला. धर्मशास्त्राचे काटेकोर पालन करणाऱ्या साम्राज्यात वाढलेल्या जिजाबाईंनी पुत्रासाठी व शहाजीराजांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वराज्याच्या ध्येयासाठी सती जाण्याचा निर्णय सोडून देण्याचा धडाडीचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर औरंगजेबाने बाटविलेल्या बजाजी निंबाळकरांना पुन्हा धर्मदिक्षा देवविली. यामुळे ब्राम्हणांनी मोठा गहजब केला पण त्याकडे साफ दुर्लक्ष करत बाजाजीच्या मुलाशी आपल्या नातीची सोयरीक घडवून आणली. असा प्रागतिक विचार करणाऱ्या जिजाऊ आपल्याला या पुस्तकाद्वारे भेटतात.

छत्रपती शिवाजी महाराजांची जेष्ठ सून, संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचे आदरस्थान अशा महाराणी येसूबाईंच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर क्वचितच आली असतील, महाराणी असूनही ऐन उमेदीचा काळ पारतंत्र्यात, तुरुंगात व्यतीत करणारी, खडतर जीवनाला सामोरी जाऊन राजकीय संक्रमणाच्या परिस्थितीत आपल्या पराक्रमी, पण तापट स्वभावाच्या पाठीमागे छायेप्रमाणे एकदिलाने उभी राहिलेली आणि आप्त स्वकीयांचा रोष सांभाळून आपल्या परीने चोख राज्यव्यवहार करणारी महाराणी येसूबाई देखील आपणाला या पुस्तकात भेटते.

एखाद्या मोठ्या साम्राज्याची स्नुषा होणं आणि त्या स्थानाचा अधिकार पेलणं ही गोष्ट सोपी नाही. त्यात महाराणी ताराबाई या साक्षात शिवछत्रपतींच्या स्नुषा. मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री ! शिवाजीराजे आणि संभाजीराजांच्या मागे कणखरपणे तिने राज्याची धुरा सांभाळली. विखुरलेल्या मराठी घराण्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा अथक प्रयत्न करणारी महाराणी ताराबाई; संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचं पान. युद्धक्षेत्र व राज्यकारभार या दोन्हींवर ताराबाईंनी जबरदस्त पकड बसविली होती. शक्य तितका किल्ला लढवून मनुष्यहानी टाळायची, शिबंदी संपत आली कि वाटाघाटी सुरु करून शत्रूला गुंतवून ठेवायचे. अनेक कठीण प्रसंगांनीही खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने आक्रमक भूमिका घेतली. मराठेशाहीतील मुसद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. नवऱ्याचा सहवास जेमतेम सात ते आठ वर्ष लाभलेल्या या महाराणीने जिद्द, जबरदस्त महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर औरंगजेब सारख्या बलाढ्य शत्रूला पण सळो कि पळो करून सोडले. पण हंबीरराव मोहित्यांच्या ह्या सेनापतीची ही कन्या; पण नशिबात मात्र नजरकैदच आली.

ताराबाईप्रमाणे त्यांची सावत्र सून करवीरची महाराणी जिजाबाईनेही कोल्हापूरच्या संस्थानाचा विकास, विस्तार करताना संस्थानाचे हित जपून, एकाच वेळी बलवान पेशव्यांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवून छत्रपती शाहूमहाराजांशी जवळीक साधली व कोल्हापूरच्या गादीचे रक्षण केले. जिजाबाई मुत्सद्देगिरीत चलाख होत्याच पण रणनीतीतही वाकबगार होत्या. राज्यकारभारातही त्यांचे बारीक लक्ष असे. देवदर्शनासाठी निघालेल्या जिजाबाईंनी आपल्या गैरहजेरीत भगवंतराव अमात्य यांना करवीर नगरीची व्यवस्था पाहण्याची आज्ञा दिली. भगवंतरावांनी नकार देताच या स्वाभिमानी महाराणीने “ आपण हे काम न केल्याने फार मोठी अडचण होईल असे समजू नये. हे काम सामान्य कुणबिणींकडून सुद्धा चालवता येईल,” असे भगवंतरावांना कळवून गंगू, रंगू, भागू, नागू आणि लिंगु या पाच सुज्ञ कुणबिणींकडून हे काम करवून घेतले. महिलांसाठी ही घटना म्हणजे प्रेरणा आहे.

उत्तर पेशवाईतील बखरकारांनी मस्तानी-आनंदीबाईसारख्या स्त्रियांना खलनायिका बनविले; मात्र तत्कालीन अस्सल पत्रव्यवहार आणि परिस्थितीजन्य पुरावा पाहता, या स्त्रियांवर इतिहासकारांनी अन्याय केल्याचे जाणवते. आनंदीबाईंना त्यांच्या जीवनात सुयोग्य जोडीदार लाभला असता तर पेशव्यांच्या कुळात ह्या शहाण्या व धूर्त स्त्रीने एक देशाभिमानी, कर्तबगार स्त्री म्हणून मान्यता मिळवली असती असे लेखकाचे म्हणणे आहे. याचा परामर्श लेखकाने तत्कालीन ऐतिहासिक दाखले देऊन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पेशव्यांच्या स्त्रियांपेक्षा अधिक प्रभावी असलेल्या गोपिकाबाई महत्त्वाकांक्षी आणि स्वाभिमानी होत्या. रघुनाथरावांनाही त्यांनी प्रायश्चित्त घेतल्यानंतरच भेट दिली. राजकारण, धूर्तपणा, माणसांची पारख आणि निर्भीडपणा या बाबतीत त्या कारभाऱ्यानंपेक्षा काकणभर भर सरस होत्या. देशी औषधींची, वनस्पतींची त्यांना चांगली जाण होती. कित्येकांना औषधोपचारासाठी त्या आपल्या वाड्यात थांबवून घेत. त्यांचे हे सामाजिक कार्य ही ह्या पुस्तकाद्वारे जाणून घेता येते.

अहिल्याबाई होळकर या मल्हारराव होळकरांच्या सून होत. मुलाचे मृत्युनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. भारतभरात त्यांनी अनेक मंदिरे, घाट बांधली वा त्यांचा जीर्णोद्धार केला. एक महान स्त्री जीची चांगली बुद्धी, चांगुलपणा व गुणांचे उदाहरण देता येउ शकते. अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. अहिल्याबाईचे असामान्य कर्तुत्वाने तिच्या रयतेचे तिने मन जिंकले, ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती. तिचे अलिकडच्या काळातील चरीत्रकार तिला 'तत्वज्ञानी राणी' असे संबोधतात.अशा या कर्तबगार राणीची भेट ही आपल्याला ह्या पुस्तकात होते.

"मेरी झांसी नाही दुंगी" म्हणत , हातात तळपती समशेर घेऊन रणांगणावर शत्रू सैन्यावर झेप घेणारी झाशीची शूर राणी लक्ष्मीबाई हिचे नाव प्रत्येक भारतीयांच्या जिव्हाग्रावर नाचत आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य- संग्रामातील तिच्या धडाडीने, पराक्रमाने प्रतिस्पर्धी इंग्रजी सेनापतीनाही मुग्ध करून टाकले होते. झाशीच्या राणीच्या योग्यतेचे पाच -दहा सेनापती जर क्रांतीकारकांच्या पक्षात असते तर या युद्धात इंग्रजी सत्तेचा कायमचा विनाश झालेला दिसला असता. अशा ही झाशीची राणी काही नवीन पैलुंसह या पुस्तकाद्वारे आपल्या समोर येते.

राजघराण्यातील या तथाकथित अशिक्षित स्त्रिया बुद्धीच्या आणि कर्तुत्वाच्या दृष्टीने आजच्या आधुनिक स्त्रीयांच्याही चार पावले पुढेच होत्या याचा प्रत्यय येतो. त्या काळातही स्त्रियांचे विचार किती पुरोगामी होते हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

 

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, October 24, 2011

डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक


पुस्तक: 
डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक
लेखक: 
अ‍ॅन फ्रँक, मंगला निगुडकर
प्रकाशक: 
मेहता प्रकाशन
आज कितीतरी दिवसांनी मनाला भिडणारे पुस्तक वाचले. “ मंगला निगुडकर यांनी अनुवादित केलेले “डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक” हे पुस्तक मार्च १९८८ ला प्रथम प्रसिद्ध करण्यात आले. प्रत्यक्षात हि डायरी “Het Achterhuis” १९४७ साली डच भाषेत तर १९५२ साली इंग्रजी भाषेत “अ‍ॅन फ्रँक – द डायरी ऑफ ए यंग गर्ल” या नावाने प्रकाशित झाले नंतर ते इतके गाजले कि, जवळ-जवळ प्रत्येक भाषेत त्याची भाषांतरे झाली आहेत.
असे काय आहे ह्या डायरीत? असा तुम्हाला प्रश्न पडेल. मलाही पडला. पुस्तक वाचायला लागल्यावर अगदी मग्न झाले. अ‍ॅन फ्रँक हि हॉलंड मध्ये राहणारी १२ वर्षाची मुलगी होती. तिने आपल्या या डायरीचे नाव “किटी” ठेवले होते. १४ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ या २ वर्षाच्या काळात तिने डायरीमध्ये जे उतरवले आहे ते या पुस्तकात दिले आहे. त्यानंतर तिने डायरी लिहिणे बंद केले का ?? नाही! पण १ ऑगस्ट १९४४ रोजी तिने जे डायरीत लिहिले ते तिचे शेवटचे लिखाण होते. कारण ४ ऑगस्टला तिच्या संपूर्ण कुटुंबाला जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्या नाझी सैनिकांनी पकडले. अ‍ॅन फ्रँक चे कुटुंब ज्यू होते. त्यामुळे नाझी सैनिकांनी त्यांना पकडून नेले. एका रेल्वेत हजारो ज्यु कोंबून पोलंड ला पाठविण्यात आले. त्यात अ‍ॅन फ्रँक, तिचे आई-वडील, बहिण होते. पोलंड मध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना वेगळे करण्यात आले. त्या क्षणानंतर अ‍ॅन ने आपल्या वडिलांना पुन्हा काही पहिले नाही. क्रूर नाझी सैन्याच्या छळामुळे अ‍ॅनची आई वेडी होऊन वारली. मार्च १९४५ मध्ये अ‍ॅन आणि तिची बहिण मारगॉट खंगून – खंगून मृत्युमुखी पडल्या. अ‍ॅन वारली तेव्हा फक्त १५ वर्षाची होती. या संपूर्ण कुटुंबात अ‍ॅनचे वडील ऑटो फ्रँक जिवंत राहिले. दुसरे महायुद्ध संपून हिटलरचा पराभव झाल्यावर रशियन सैन्याने ज्यूंना सोडविले त्यात ऑटो फ्रँक सुटले.
४ ऑगस्ट ला त्या गुप्तनिवासात लपून रहिलेल्या ८ लोकांना पकडण्यात आले तेव्हा मिएप गाईस व बेप या दोन ऑफिस सेक्रेटरींना अ‍ॅनच्या रोजनिशीचे कागद जमिनीवर विखरून टाकलेले सापडले. मिएप ने ते सर्व गोळा करून मेजच्या खणात सुरक्षित ठेवून दिले. युद्धासामाप्तीनंतर, अ‍ॅन वारल्याचे तिला कळले तेव्हा तिने त्या दोन्ही रोजनिश्या अ‍ॅनचे वडील ऑटो फ्रँक यांच्या स्वाधीन केल्या. त्यानंतर आपल्या कुटुंबाची स्मृती म्हणून त्यांनी अ‍ॅन च्या डायरीचे झेरॉक्स काढून वाटायला सुरुवात केली. ती डायरी इतकी लोकप्रिय झाली कि, एका प्रकाशकाने जून १९४७ मध्ये तिची डायरीच पुस्तक रुपाने प्रसिद्ध केली. अ‍ॅनची इच्छा होती कि युद्ध संपल्यानंतर आपल्या या रोजनिशीच्या आधाराने एक पुस्तक छापायचे. आणि तिच्या मृत्युनंतर खरोखरच तिच्या रोजनिशीचे पुस्तकात रुपांतर झाले.
१९४२ ते १९४५ म्हणजे दुसर्याु महायुद्धाच्या काळात जर्मनीचा हुकुमशहा हिटलर जग पादाक्रांत करायला निघाला होता. पोलंड, फ्रांस चुटकीसरशी पायाखाली तुडवत तो रशियावर चाल करून गेला. हिटलरला ज्यू लोक तर नजरेसमोरही सहन होत नव्हते. हिटलरच्या लष्कराने ज्यूंचे अनन्वित क्रूर हाल करीत त्यांना तीळ – तीळ मारले. लाखो ज्यूंनी मरण यातना भोगल्या. ज्यू दिसला कि नाझी सैनिक त्याला उचलून न्यायचे. मग रात्र असो वा दिवस, लहान मुल असो, गर्भार महिला असो किंवा वृद्ध असोत दयामाया नव्हतीच. महिलांना, मुलांना, भुकेलेल-तहानलेले ठेवून कष्ट करायला लावून ठार केले जायचे. धडधाकट तरुणांना युद्धावर पाठवले जात असे आणि पुरुषांना सरळ गॅस चेंबर होता, विषारी गॅस सोडून हजारो ज्यूंची एकाच वेळी कत्तल केली जात होती.
अशा या काळात अ‍ॅन फ्रँक चे कुटुंब, व्हॅनडॅन कुटुंब आणि दंतवैद्य डॉ. डसेल असे ८ ज्यू एका पोटमाळ्यावर जाऊन लपले. एक- दोन महिने नव्हे तर तब्बल २ वर्षे हे ८ जण पोटमाळ्यावर कसे राहिले असतील ह्याचे वर्णन त्या डायरीत केले आहे. बाहेर पडता येत नव्हते. अंधार पडला कि वरच्या खिडकीतून डोके बाहेर काढून निसर्ग बघायचा एवढाच काय तो बाहेरच्या जगाशी संबध होता.
जेवायला दिवसरात्र बटाटे आणि वाल, सडक्या भाज्या कधीतरी मांस किंवा लोणी असायचे, मनोरंजन म्हणजे फक्त रेडिओ तो ही संध्याकाळी लावायचा खालच्या गोदामात आवाज जाऊन कामगारांना संशय येऊ नये म्हणून दिवसभर शांत राहायचे त्यांची मैत्रीण मिएप त्यांना बाहेरून पुस्तके आणून द्यायची हाच दिलासा होता. त्या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सामान्य माणसाचे आणि विशेषतः ज्यूंचे काय हाल झाले ह्याचे चित्रच त्या डायरीतून उभे राहते.
मिएप पुस्तके घेऊन आली कि, या कुटुंबाना बाहेरच्या जगाची माहिती मिळत असे. बाहेर तर अराजक माजले होते. नोकर्‍या,काम, उद्योगधंदे बंद पडले होते. कोणाकडे पैसे राहिले नव्हते प्रत्यक्षात अ‍ॅन फ्रँक व कुटुंबीय ज्या पोटमाळ्यावर राहत होते त्याच्या खालच्या गोदामात ही चोर्‍या झाल्या होत्या. ज्यूंना पकडून नेले जात होते त्यामुळे अनेक घरे ओस पडली होती. अशा घरातील वस्तू चोरीला जात होत्या. गरिबांना अन्न नव्हते, पांघरायला कपडा नव्हता. लहान मुले पावाच्या तुकड्यासाठी रस्तोरस्ती फाटक्या कपड्यांनी हिंडायची त्यात नाझी सैनिक आले तर त्या इवल्या जिवांनाही फरफटत नेले जायचे ज्यूंची रेशनकार्ड रद्द केली होती. मात्र ब्लॅकमार्केट मध्ये दुप्पट भावला ही कार्ड मिळायची. ही कार्ड मिळवण्यासाठी चढाओढ सुरु होती.
ज्यू लोकांची माहिती देईल त्याला प्रत्येक ज्यू माणसाच्या मागे दीड डॉलर या प्रमाणे बक्षीस ही जाहीर झाले होते. अ‍ॅन फ्रँक आणि तिच्याबरोबरचे सात जण दोन वर्ष पोटमाळ्यावर लपून राहिले आपण कधीही पकडले जाऊ याची भीती, पुरेसे अन्न नाही, कपडे नाहीत, बॉम्ब वर्षावात सतत पोटमाळा थरथरायचा, स्वातंत्र्य नाही अशा स्थितीत राहून त्यांना वेड लागायची वेळ आली होती. अ‍ॅन मात्र मोठ्या जिद्दीने उत्साही राहत होती. ४ ऑगस्टला कुणीतरी नाझी सैनिकांना पोटमाळ्यावर लपलेल्या या आठजणांची माहिती दिली. या बक्षिसाच्या पैशाने तो खबरी जगाला असेल, पण या आठ जणांचे आयुष्य तेथेच संपले.
१२ वर्षाच्या अ‍ॅन ने ३ मे १९४४ रोजी आपल्या डायरीत लिहिले –
लढाईचा उपयोग काय आहे? इतका विध्वंस कशासाठी? माणसे एकत्र शांततेत राहू शकत नाही का? या जगाच्या काही भागात अन्न इतके विपुल आहे कि सडते आहे आणि दुसऱ्या भागात लोक अन्नावाचून तडफडत आहेत असे का? ही लढाई केवळ राजकारणी, नेते आणि भांडवलदारांमुळे होते हे खरे नाही. या लढाईला सामान्य माणूस तितकाच जबाबदार आहे. कारण त्याला लढाई नको असती तर त्यांनी एकत्र येऊन लढाई विरुद्ध उठाव केला असता. पण तो तसे करीत नाही. सत्य हे कि, प्रत्येक माणसाच्या अंगीच विध्वंस आणि हिंसाचाराची ओढ आहे. नष्ट करण्यात, खून करण्यात त्याला आसुरी आनंद मिळतो. समस्त मानवात अमुलाग्र बदल झाला तरच हा विध्वंस टळेल. तोपर्यंत लढाया होत राहतील.
अ‍ॅनचे हे उद्गार आजही तितकेच सत्य आहेत. आणि म्हणूनच अ‍ॅन म्हणाली त्याप्रमाणे तिच्या मृत्यूनंतही तिच्या शब्दांच्या सामर्थ्याने ती अजरामर राहिली. पूर्ण पुस्तक वाचताना कोठेही जाणवत नाही कि अनुवादित आहे. प्रत्यक्ष अ‍ॅन आपल्याशी बोलत आहे. त्या वेळचे पूर्ण चित्रच डोळ्यासमोर उभे राहते.


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Sunday, September 18, 2011

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - 4


१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख करताना झाशीच्या राणीच्या पाठोपाठ नाव घ्यावे असे नाव म्हणजे बेगम हजरत महल. १८५७ च्या संग्रामातील बेगम हसरत महल चे स्थान अद्वितीय होते. अवधचे विशाल  राज्य खालसा करून इंग्रजी अमलात समाविष्ट केले. हताश झालेल्या मुत्सद्दी व कारभारी यांनीही वनवास पत्करला. पण आपल्या बिर्जीस कादर नावाच्या अल्पवयीन बालकाला घेऊन बेगम हजरत महल हि लखनौतच राहिली होती शेवटी तिनेच आपल्या प्रचंड कर्तुत्वाने  अवधचा एवढा मोठा भाग स्वतंत्र झाला होता कि ईस्ट इंडिया कंपनीच्या खुद्द सरसेनापतीला चतुरंग दलासाहित तिच्याशी टक्कर द्यावी लागली होती. सतत २ वर्षे चालू असलेल्या ह्या युद्धात एकाहून एक धुरंधर इंग्रज सेनापती मारले गेले. अशा या बेगम च्या शौर्याची कहाणी


बेगम हजरत महल चा पूर्ववृत्तांत

१८४७ मध्ये वाजीद आली शहा हे अवध चे नबाब झाले. लखनऊ हि त्यांची राजधानी होती. एका साधारण गरीब घरात जन्म घेतलेली मोहम्मदी खातून ला बेगम हजरत महल हा किताब लग्नानंतर अवधचा बादशहा वाजीद आली शहा ने दिला इतकेच नव्हे तर इफ्तिख़ार उन निसा (स्त्री रत्न ) म्हणून गौरव हि केला. सन १८०१ मध्ये वाज़िद अली शाहच्या पूर्वजांनी इंग्रजांशी करार केला होता आणि हा करार आपण टाळू शकत नाही ह्याच पुरेपूर भान वाज़िद अली शाहला होत. अवधला गिळंकृत करण्यात दोन मोठे अडथळे होते. पहिला अवधचा प्रधान अमीनुद्दौला आणि दुसराअलीशाहची तत्परता आणि योग्यता. अलीशाहची योग्यता आणि इमानदारी यांबद्दल इंग्रजही अनभिज्ञ नव्हते. अवधचं राज्य बरखास्त करणं हे कंपनीचं एकमात्र लक्ष्य होतं. दुसरी गोष्ट म्हणजे अलीशाहचा प्रधान आणि इतर मंत्र्यामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान यशस्वी होत नव्हतं. त्यामुळे कंपनीला फूटनीतीच्या पर्यायावर अधिक विसंबणं शक्य नव्हतं आणि दुसरा चांगला पर्यायही नव्हता, पण सन १८५६ Governor General Lord Dalhousie याने आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षात अवध चा मुलुख गिळंकृत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इंग्रजी सरकारनं अवध बळकावण्यासाठी आणि आपल्या क्रौर्याचं दर्शन घडवण्यासाठी वाज़िद अली शाहला निहायतनिकम्माविलासीआणि गैर जिम्मेदार’ ठरवण्यासाठी अनेक खोटय़ा कहाण्या रचल्या व अवधचा नबाब वाजिदअली शहा याला पदच्युत करून इंग्रजांनी त्याला कलकत्त्याला (कोलकता) पाठवले. पण प्रत्यक्षात जनता इंग्रज सरकार पेक्षा नबाब वाजिदअली शहा यांच्या राज्यात सुखी होती त्यामुळे त्याची बेगम हसरत महल हिने या अन्यायाचा बदला घेण्यासाठी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली.बेगम हजरत महल चे अदभूत संघटन कौशल्य

अवधचे राज्य खालसा झाल्यानंतर हताश झालेले राज्याचे मुसद्दी व कारभारी यांनी वनवास पत्करला. ते जंगलात निघून गेले. वाजीद आली शाह च्या बेगामांनाही तेथून पलायन करावे लागले. दरबारी मुसद्दी जरी परागंदा झाले तरी बिर्जीस कादर नावाच्या आपल्या अल्पवयीन मुलाला घेऊन बेगम हजरत महल लखनौमध्येच राहिली. तिचे संघटन कौशल्य वाखाणण्याजोगे होते. लखनौमध्ये वास्तव्य करून प्रजेला धीर देण्याचे व पुढील स्वातंत्र्याच्या योजना निश्चित करण्याचे कार्य तिने सुरु केले. धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे प्रभृती क्रांतिनेत्यानी इंग्रजांना या देशातून हाकलवून लावण्याच्या योजना आखल्या त्यात त्यांना प्रारंभापासूनच बेगम हजरत महल चे सहकार्य लाभले होते. बेगम ने आपल्या विश्वासाचे मौलवी व पंडित निवडून त्याच्या मार्फत संपूर्ण राज्यभर आगामी संग्रामाचा प्रचार चालू ठेवला. देवळा – देवळांतून व मशिदी- मशिदीतून हिंदू – मुस्लीम नागरिकांच्या सभा घेऊन या पंडितांनी व मौलवींनी लोकांची मने स्वातंत्र्य युद्धासाठी प्रभावित केली होती. इतकेच नव्हे तर बेगम हजरत महल ने मानसिक तयारी करून घेतलेल्या पंडित आणि मौलवींनी अवध प्रांताबाहेर हि पदभ्रमण करून लोकांची मने वळविली व हिंदू – मुस्लीम जनतेच ऐक्य घडवून आणले होते. हिंदू-मुस्लीम ऐक्याचा इतका सुंदर संगम १८५७ नंतर कधीच दिसला नाही.

बेगम हसरत महलने काही स्त्रियांना युद्ध प्रशिक्षण दिले होते. १८५७ साली या स्त्रिया बेगमबरोबर युद्धभूमीत उतरल्या होत्या. त्या बहुतेक जनानखान्यातील दासी व इतर काम करणाऱ्या स्त्रिया असाव्यात. अजीजननावाची नर्तिका आपले विलासी जीवन सोडून हसरतमलच्या प्रेरणेने क्रांतिकार्यात उतरली. ही नर्तिका इंग्रजी सैनिकांच्या छावणीत जाऊन संगीत व नृत्याद्वारे सैनिकांचे मनोरंजन करी व गुप्तहेराचे काम करी. दिवसा ती पुरुषी वेषात युद्धभूमीवर असे. उठाव दडपून टाकण्यात इंग्रजांना यश येऊ लागले. त्याच वेळी ती पकडली गेली. इंग्रज अधिकारी हॅवलॉकतिचे सौंदर्य पाहून थक्क झाला. ती माफीची साक्षीदार झाली तर तिला जीवदान दिले जाईल, असे तिला म्हणाला. पण तिने जीवदान नाकारले. अजीजन ही शांत चित्ताने व हसतमुखाने फायरिंग स्क्वाडसमोर उभी राहिली. क्षणार्धात तिच्या सुंदर शरीराच्या चिंधडय़ा उडाल्या. अजीजन हुतात्मा झाली. बेगम चा झंझावातबेगम हजरत महल ने ३१ मे १८५७ रोजी उठावणी करण्याची सिद्धता केली. ३० मेलाच रात्री १२ वाजता तोफ वाजली आणि अवध चे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले. आधीच ठरल्याप्रमाणे इंग्रजांच्या इमारती जाळण्यात आल्या, इंग्रजांचे झेंडे फेकून दिले व त्याजागी स्वातंत्र्यचे हिरवे ध्वज फडकविण्यात आले. लखनौचे पोलीस व मुल्की सरकारी कर्मचारीहि स्वातंत्र्यवाद्यांना येऊन मिळाले. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता त्या सर्वानी झुगारून दिली. एका रात्रीत लखनौवरचा इंग्रजांचा अंमल नाहीसा करून बेगम ने आपला अंमल प्रस्थापित केला. लखनौपाठोपाठ ३ जून ला सीतापूर चे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले. त्या नंतर लगेचच फारुकाबादवरही ताबा घेण्यात आला. दि. १० जूनपर्यंत मोहम्मदी व पुढे मालन बहाराईच, गोंडा, सिकारीरा मेलापूर इत्यादी अवध राज्यातील सर्व ठिकाणी इंग्रजांची सत्ता नष्ट करून स्वातंत्र्याचा ध्वज फडकू लागला होता. एकूण बेगम हजरत महल ने क्रांतीयोजानेची केलेली हि इतर कोणत्याही नेत्यापेक्षा निर्दोष व सुसंघटीत होती. स्वातंत्र्या च्या जल्लोषात व्यर्थ काळ न घालविता अगदी विजेच्या वेगाने संपूर्ण भागात क्रांती घडवून आणली आणि इंग्रजी सत्ता नष्ट करून दाखविली व मिळालेले स्वातंत्र्य स्थिर करण्याच्या उद्योगाला ती लागली. ७ जुलै १८५७ ला आपला ११ वर्षीय पुत्र बिर्जीस कादर याला तिने गादीवर बसवले व त्याची पालिका म्हणून राज्याचा सर्व कारभार स्वताच्या हाती घेतला. राजा बाळकृष्ण सिंह यांच्या सारख्या श्रेष्ठ योग्यतेच्या हिंदू राजाला प्रधानमंत्री पदाची वस्त्रे देण्यात आली. अशा या न्यायी आणि योग्यता पूर्ण  कारभारामुळे बेगम हजरत महल ने जनतेच्या मनात आदराचे स्थान पटकावले होते. तिच्या प्रजाप्रेमाने मुग्ध होऊन हिंदुस्तानचा तत्कालीन Governor General Lord कॅनींग यानेही म्हटले होते कि तिच्या आज्ञेखातर अवध चा प्रत्येक नागरिक आपल्या सर्वस्वाचे बलिदान करण्यास तयार झालेला होता.दिल्लीत मोघल बादशहांचे रक्त प्राशन करणारा इंग्रज सेनापती हडसन हा या लखनौ संग्रामात ठार झाला. पण तिच्या नशिबी कदाचित अवध वर राज्य करण्  लिहिले नसावे कारण तिने अवध बरोबर हिंदुस्थान हि स्वतंत्र व्हावा ह्या उद्दात हेतूने सैन्य बाहेर पाठवले होते. तिचे सैन्य दिल्ली मोहिमेवर असताना पराभूत झाले, रसद नीट नाही, त्यात संघटन शक्ती कमी, अजून शाप म्हणून लाभलेली फितुरी अशा अनेक कारणामुळे तिकडे प्रभाव पत्करावा लागला. आणि ब्रिटीश सैन्याच्या प्रचंड आक्रमणाखाली लखनौचा प्रतिकार चिरडला गेला.  १८५७ चे नोहेंबर उजाडताना Sir Colin Campbell ब्रिटीश सैन्याचा Chief Commander लखनौ वर चालून आला. अतिशय कडवी झुंज दिली. क्रांतीवाद्यानी लखनौ मध्ये सुरुवातीला पकडण्यात आलेले ब्रिटीश कैदी यांना ठार मारण्याची बेगम कडे परवानगी मागितली; प्राप्त परिस्थितीत त्यांना नकार देणे शक्य नव्हते पण तरीही बेगमने ६ ते ७ इंग्रज कैदी क्रांतीवाद्यांच्या ताब्यात दिले सैनिकानी तत्काळ त्यांना गोळ्या घालून ठार केले पण आपल्या मानवतेचा साक्षात्कार घडवीत बेगम ने इंग्रज स्त्रियांना आपल्या महालात संरक्षण दिले. बेगम ने या प्रसंगी व्यक्त उदार मानवतेचा गौरव Charles Ball यांनी आपल्या  “Indian Mutiny” या पुस्तकात केला आहे. 


ब्रिटिशांच्या प्रचंड सैन्यापुढे लखनौचा प्रतिकार चिरडला गेला. ब्रिटीशांनी फोडा व राज्य करा ह्या नीतीचा वापर करीत बेगम च्या सैन्यातच फुट पडली. त्यामुळे डिसेंबर १८५७ जौनपुर व आझमगढ ह्या भागात सैन्याला मिळणारी रसद थांबली व तिची पीछेहाट झाली. नानासाहेबांचा हि पराभव झाला. २५ फेब्रुवारी १८५७ आलम बाग पडले. पण बेगम आपल्या अंगीकृत व्रताने जराही ढळली नाही शाही महालातील विलासी जीवनाला तिने कधीच अर्धचंद्र दिला होता. ब्रिटिशांच्या आक्रमणाला तिने जोरदार प्रत्युत्तर दिले, तिच्या या तुफानी प्रतिकाराला तोंड द्यायला अनेक ब्रिटीश अधिकारी पुढे सरसावले पण सेनापती मागून सेनापती यमलोकाची वाट धरू लागले. २ मार्च १८५८ Sir Colin Campbell ३०,००० हजाराची फौज घेऊन लखनौ वर चालून आला लखनौविरुद्धच्या लढ्याला नव्याने सुरुवात केली. १८ मार्च १८५८ ला लखनौ चे महत्वाची ठिकाणे पडली होती. बेगमची पीछेहाट होत असली तरी तिने अजून धीर सोडला नव्हता ती निकराने लढत होती. २१ मार्च १८५८ ला लखनौ पडले. बेगम अवध मध्ये थांबली अशावेळी ठिकठिकाणचे क्रांतीनेते बेगमच्या परिसरात गोळा होऊ लागले होते. अवध हाच आशेचा किरण त्यांना दिसत होता. थोड्याच अवधीत नानासाहेब व बाळासाहेब पेशवे, बिलयातशहा, अलीखा मेवाती फिरोजशहा, बक्तरखा, खानबहाद्दूर खा, निजाम आली खा, मामू खा, राजा नरपतीसिंह राजा बक्ष बहुनाथ सिंह, चंदासिंह, गुलाबसिंह, भूपालसिंह, हनुमंतसिंह, राजा वेणीमाधव, जगराजसिंह इत्यादी. क्रांतीनेते अवध मध्ये एकत्र आले. बेगम हजरत महल च्या नेतृत्वाखाली पुनः त्यांची एक प्रबळ संघटना तयार झाली. हि संघटना तयार करताना मौलवी अहमदशहा ची बरीच मदत झाली पुढे तर अहमदशहा आपली लढवय्या वृत्ती पण दाखवली. 

सन १८५८ च्या जून महिन्यात लखनौ वर आक्रमण करून ते काबीज करण्याच्या योजना बेगम हजरत महलच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारक दल आखू लागले. १८५८ च्या मार्च – एप्रिल पासून जून पर्यंत चार महिने गेले या कालावधीत ब्रिटीश सैन्याला एका क्षणाचीची उसंत मिळू शकली नाही. वस्तुत: मूळ संग्राम सुरु होऊन आत्ता वर्ष उलटले होते. इतरत्र भडकलेला हा वणवा आत्ता विझत चालला होता पण अवध अजूनही जळत होते बेगम ने विकसित केले प्रतिकार युद्ध पाहून इंग्रजांची गाळण उडाली. त्यांचा सेनापती Sir Colin Campbell पुन्हा एकदा सेना संचालनासाठी धावून आला व अवध मध्ये ठाण मांडून बसला. प्रचंड ब्रिटीश सामर्थ्यानिशी तो जातीने युध्द खेळू लागला. पण बेगम ने अंगीकारलेले युद्धतंत्र पाहून तो फार अस्वस्थ झाला. १ ऑक्टोबर १८५८ ला तिने आपल्या सेनापतीला पत्र पाठवले व त्यात त्यांना युद्धतंत्राविषयी माहिती देऊन त्यांचा अत्माविशास वाढवला. एवढेच नव्हे तर ती स्वत: मैदानावर लढाईला उतरली होती. 


हिंदी संस्थानिकांची राज्ये खालसा करण्याचे घातक धोरण अवलंबू नका, असे त्याच वेळी Governor General Lord Dalhousie च्या कानी कपाळी ओरडून सांगितले होते पण ते निष्फळच ठरले. हिंदी संस्थानिकांकडून होणारा कडवा विरोध बघता शेवटी पार्लमेंटमध्ये कायदा पास करून ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार काढून स्वतःच्या हाती घेतल्यावर १ नोव्हेंबर १८५८ रोजी महाराणी विक्टोरिया च्या नावे एक जाहीरनामा प्रसिद्ध केला.  हिंदी लोकात या जाहीरनाम्यामुळे बुद्धिभेद होईल हि अपेक्षा होता आणि बऱ्याच अशी ती सफल पण झाली कारण जाहीरनाम्याच्या मायावी भाषेचा तो प्रताप होता पण ह्या मायावी भाषेच्या मागे साम्राज्यवादी ब्रिटिशांची तृष्णा  दडलेली आहे हे बेगम हजरत महल ने जाणले. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारच्या घटनात्मक राज्यकारभाराचा प्रारंभ या जाहीरनाम्यापासूनच झाला, ब्रिटीश सम्राज्ञीने  प्रसिद्ध केलेल्या या मायावी जाहीरनाम्याला तितकेक करारी उत्तर देत बेगम हजरत महल आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

विक्टोरियाच्या जाहीरनाम्याला बरोबरीच्या नात्याने उत्तर देणारा आपला जाहीरनामा बेगम हजरत महल ने प्रसिद्ध केला. तिचा हा जाहीरनामा स्वातंत्र्यवादी साहित्यात सुवर्णाक्षरात झळकत राहील. भारतीय स्वातंत्र्याचे जे युद्ध शास्त्रज्ञांच्या विनाशकारी साधनांनी लढले जात होते त्याची पातळी बेगम हजरत महल च्या उत्तराने एकदम उच्च नैतिक व बौद्धिक स्तरावर उचलली गेली त्यामुळे राणी विक्टोरिया पेक्षा बेगम चे नैतीकपीठ फार उंच असल्याचे सिद्ध होते. बेगम हजरत महल च्या मते विक्टोरिया चा राजीनामा म्हणजे एक मायाजाळ आहे. बेगम चे म्हणणे किती सत्य होते हे इंग्रज लेखकांनीच सिद्ध केले आहे. इतिहास लेखक जेम्स स्टीफनने मायावी कागद कायदेशीर बिनकिमतीचे असे त्याचे वर्णन केले आहे. 

हिंदुस्थानावर राज्य करण्याचा अधिकार जसा ईस्ट इंडिया कंपनीला नव्हता तसा तो ब्रिटीश सरकारलाही असू शकत नाही असे उघड आव्हान बेगम ने इंग्रज सरकारला दिले होते. क्रांतिकारी २ वर्षे लढत होते तेव्हा ब्रीतीशनी आणखी कुमक मागवली शेवटी नानासाहेबांनी नेपाळ दरबारी बोलणी केली कि, भारतीय स्वातंत्र्यवाद्यांना नेपाळ मध्ये आपले केंद्र स्थापन करू द्यावे व तेथून भारतीय स्वातंत्र्यसंग्राम चालू ठेवण्यास आवश्यक त्या सवलती मिळाव्यात परंतु नेपाळ दरबार ने परवानगी नाकारली इतकेच नव्हे तर भारतीय क्रांतिकारक जर नेपाळ मध्ये शिरले तर त्यांचा पाठलाग करण्याची परवानगी ब्रिटिशांना देण्यात आली. अशा तऱ्हेने स्वातंत्र्ययुद्ध स्वदेशाबाहेर जाऊन लढण्याचा प्रयत्न केला पण तोही अपयशी ठरला. शेवटी ब्रिटीश सरकारने चहूबाजूंनी घेरल्याने हिमालय पर्वताच्या कुशीत आश्रय घेणे एवढा एकाच उपाय होता पण तोही सोपा नव्हता ब्रिटीश सैन्याशी मुकाबला करीतच जावे लागले त्या युद्धात ले. ग्रांट हा इंग्रज सेनापती ठार झाला. व ले. बिकार जबरदस्त जखमी झाला. बेगम हजरत महल, नानासाहेब पेशवे व बाळासाहेब हे पहाडाच्या दुसऱ्या रांगेत निघून गेले. पण हिमालयात शिरणे म्हणेज नेपाळच्या हद्दीत प्रवेश करणे असाच होता. ती परवानगी नेपाळ दरबार ने नाकारली होती शिवाय ब्रिटिशांना त्यांचा पाठलाग करण्याची परवानगी हि दिली होती. परंतु हिमालयाच्या दुर्गम भागात शिरलेल्या माणसांचा पाठलाग करून त्यांना शोधणे ब्रिटीश सरकाच्या दृष्टीने हि कठीण होते. परंतु नेपाळ सरकारने स्त्री दाक्षिण्य दाखवत बेगम हजरत महल ला नेपाळ हद्दीत प्रवेश दिला.  तेथूनही बेगम ने क्रांतिकारकांना जमेल तेवढी मदत केली. नेपाळ मधील काठमांडू येथे त्यांचा मृत्य झाला , काही ठिकाणी मृत्यची नोंद १८७४ तर काही ठिकाणी १८७९ अशी दाखवली जातेय. नेपाळ मध्ये आजही तिची कबर आहे.    ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Friday, July 15, 2011

माझा गुरु

             आयुष्यातला प्रत्येक क्षण काही ना काही शिकवत असतोच जीवनात अनेक गुरु येतात, प्रत्येकाची शिकविण्याची पध्दत वेगळी असते पण आयुष्यभर संस्कारांवर मोहोर उमटवते ती पहिल्या गुरुची शिकवणी!!!
हि पोस्ट माझ्या पहिल्या गुरूसाठी आज ज्यांच्यामुळे मी आज लिहायाला शिकली (म्हणजे मी काही मोठी लेखिका नाही पण जे काही लिहिते ते.... असो ) लोक म्हणतात कि पहिली गुरु म्हणजे आई असते पण मी गर्वाने सांगते माझे पहिले गुरु म्हणजे माझे दादा (वडील). ( माझी आई हि पण माझी उत्तम मार्गदर्शक आहे पण... पहिल्या गुरूचा मन दादानांच)

                  माझं वक्तृत्व आणि माझं लेखन ज्यांनी घडवले ते दादा घडवलेच म्हणावे लागेल (मी घरात शेंडेफळ त्यामुळे फार आळशी आणि झोपेचा छंद तेव्हापासून जडलेला आजही कायम आहे.... असो.) आमच्या गुरूंना म्हणजेच दादांना वक्तृत्वाची देणगी आजोबामुळे लाभलेली पण त्यामुळे त्यांचे वाचन खूप आणि अभ्यासही, लहानपणी खूप बक्षिसे मिळविली होती त्यांनी. आमचे थोरले बंधू आजी – आजोबांकडे मुंबईला शिकण्यास होते, आणि मी आई – दादांसोबत गावाकडे त्यामुळे वक्तृत्वाचे प्रयोग आमच्यावर झाले.

                   पण त्या प्रयोगांचा फायदा फार झाला, उच्चार व आवाजातली स्पष्टता, कोणत्या शब्दावर किती जोर द्यायचा त्यामुळे कसा अर्थ फिरतो हे कळाले. वक्तृत्व स्पर्धेसाठी तर खूप मेहनत घ्यायचे. आधी माझ्यासाठी भाषण तयार करणे मग तो स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करणे, मला ते पूर्णपणे ऐकवणे, माझ्याकडून पाठ करवून घेणे, माझ्या आवाजात ते भाषण रेकॉर्ड करणे व शांतपणे मला ते ऐकवणे, दोघांच्या उच्चारातील फरक चेक करणे, आणि जर ते बरोबर जमले नसतील तर त्यांनी त्यांचे रेकॉर्ड  केलेले भाषण ऐकवत  व त्यानंतर माझे रेकॉर्ड झालेले भाषण ऐकवत. दोघांच्या उच्चार व शब्दांवरील  जोर देण्याच्या पद्धतीतील फरक समजावून सांगत. पुन्हा पाठ करून घेत. बर नुसतीच घोकमपट्टी करायला न लावता त्या विषयीचा इतिहास समजवून सांगत आणि मला तो समजेपर्यंत समजावत.

                   लहानपणी भाषण लिहून देत खरे पण जशी मोठी झाली तशी माझी भाषणे लिहिणे आणि त्यांची तयारी कशी करायचे ते माझे मलाच करायला शिकविले. तिकडूनच मग ह्या लेखनाचा छंद लागला. आयुष्यातला पहिला लेख म्हणजे वक्तृत्व स्पर्धेसाठी नाही तर कॉलेज मासिकासाठी लिहिला होता रॅगिंग वर ते हि त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता करण त्यावेळी ते बाहेर होते कामानिम्मित. ते परत आल्यावर त्यांना तो दाखविला. संदर्भ कुठून घेतलेस? हा एकाच प्रश्न होता आणि पेपर मध्ये आलेल्या बातम्या तसेच कॉलेज सरांना विचारलेली माहिती. त्यावर छान आहे एवढीच प्रतिक्रिया होती.

                  आज जेव्हा मी ब्लॉग वर लेख प्रकाशित करते त्यांची माहिती भेटणारया प्रत्येकाला सांगतात व लिंक देतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यातली चमक सांगून जाते कि मझ्याबद्दल किती अभिमान आहे ते. आणि हाच अभिमान एक नवीन जबाबदारीची जाणीव करून देतो हे सातत्य टिकवायचा आहे. आणि डोक्यात एकाच गोष्ट येते ती म्हणजे Champions are those who can get themselves to constantly improve & consistently perform at peak level.

थांक्यू दादा!!


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, July 04, 2011

मोरपीस

                 नातं म्हणजे मनाच्या पुस्तकात जपलेलं मोरपीसच असतं ना! आपलं मन किती हळवं असत?? काही वेळा आपलंच मन आपलं राहत नाही आणि त्याची समजूत घालणे फार कठीण होऊन बसता.... तेव्हा त्याला समजून घेणाऱ्या.. त्याचा आधार बनणाऱ्या..त्याला प्रेरणा आणि बळ देणाऱ्या विश्वात ते रमत तिथे असतं एक नातं... भावनिक बंधांची गुंफण असणारं.. आपल्या भावनांना जपणारं.. मायेची उब देणार, जाणीवांना समजून आधार देणार अशा नात्याची जवळीक फार थोड्या लोकांना लाभते. मनातल्या भावना अन् नात्याचे नवीन अंकुर त्यांचा गुंता कसाही असला तरी हवाहवासा वाटतोच ना!! एका मित्राने चॅट स्टेटस लावून ठेवलं होतं “एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली – जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे.” किती खर आहे हे वाक्य!!

              कारण कधी कधी एखादी व्यक्ती खूप जवळची, आपलीच वाटू लागते. तिचे विचार म्हणजे आपल्याच हृदयातील भावनांचे प्रतिबिंब वाटू लागते. ती व्यक्ती म्हणजे सर्वस्व. अशा वेळी तिथे जन्म घेतं ते एक नाजूक नातं. या नात्याला रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त महत्व असतं. प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण हाच अनुभव आणि त्यातील Passion आयुष्यभर टिकवणे फार कठीण असत. परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. एकमेकांना गृहीत धरण्याची सवय लागते, काय एव्हढ बोलायचं ? काम पण आहेतच कि! कळत कसं नाही आपण कामात आहोत हे तो / ती समजून का घेऊ शकत नाही. आपणच सवय लावलेली असते कामातून वेळ काढून बोलायची आणि तीच काही काळाने तापदायक वाटू लागते.

             अश्या भावनेच्या भरात कोवळ्या विचारांचे अंकुर घेऊन जन्मणार नातं कधी कधी खुपच हळवं असतं नात्यात येणाऱ्या कठीण प्रसंगात हे नातं कोमजून जात. संयमी, सहनशील माणसेच अशी नाती टिकवू शकतात. कारण गरज असते ती आपल्या माणसाला त्याची space देण्याची. अशा वेळी आपल्या मनातल्या भावना योग्य मार्गानं व्यक्त करता येणं ही एक कलाच आहे. ती आपल्यापाशी असली, की आपण आपली बाजू योग्य शब्दांत चांगल्या प्रकारे मांडू शकतो, अगदी वाईटपणा न येता. त्यासाठी जुन्या आठवणी, सोबत घालवलेले क्षण यांची संयमीपणाने आठवण करून देणे, कामाच्या व्यस्ततेमधून ५ मिनिटे का होईना पण आपल्या माणसासाठी वेळ काढलेला वेळ हेच नात्याला पुनर्जीवन देऊ शकतात.

           नात्यात कृत्रिमता वं जाणिवांचा अभाव असेल तर ते नातं कधी नातं नसताच.... अशी नाती फुलण्याआधीच गळून पडतात. तो फक्त बेगडी संबध असतो. अशी नाती वेळ निभावून नेण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी बनवलेली शिडी असते. काम झाल्यावर अडगळीत टाकण्यासाठी! अशी क्षणभराची नाती भौतिक सुखाशिवाय काही देऊ शकत नाही. हे झालं जोडीदाराबद्दल पण सगळ्याच नात्यांना हे लागू होतं.

                 तसंही नातं कोणता का असेना, त्यात मायेचा ओलावा सुख दु:खात समजून घेण्याची, आधार देण्याची, समर्पण व त्यागाची भावना असायला हवी. अशी नाती आज दुर्मिळच! निसर्गदत्त नाती सुद्धा किती दुरावलेली, विस्कटलेली आहेत. आई-वडील, भाऊ-बहिण तसेच इतर कौटुंबिक आपण जपले पाहिजे. दुरावा असेल तर त्याचे कारण आपण शोधायला पाहिजे. ह्या साठी आपल्या मनातील विचारांचा परीघ ओलांडायला हवा. आयुष्य म्हणजे नात्यांच्या धाग्यात गुंफलेला एक सुंदर बंध आहे. ह्या बंधाचा एक जरी धागा विस्कटला तरी संपूर्ण आयुष्य विस्कळीत होतं. तो धागा व्यवस्थित पणे गुंफून आयुष्य पूर्वपदावर आणणे म्हणजे खूप संयामचे काम असते.

             अन् काही नाती अशीही असतात कि ज्यांना आपण कोणत्याच चौकटीत बांधू शकत नाही किंवा शब्दात मांडू शकत नाही. अशी नाती म्हणजे स्वर्गसुखाची जिवंत अनुभूती असते. अशा या मनापासून जपलेल्या नात्यात कितीही संकटे येऊ देत, रुसवे-फुगवे असू देत पण तरी अशा नात्याशिवाय जगणं कठीण असतं. अशी नाती रक्तापेक्षा भावनीक पातळीवर जास्त गुंफलेली असतात. त्यांना वयाचे, जाती-धर्माचे आणि कुठल्याच परिस्थितीचे बंधन नसते. असं नातं ज्यांना लाभत ते भाग्यवान असतात. अशा नात्याची जपणूक करण हेच महत्वाच असतं.


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Sunday, June 26, 2011

नमन नटवरा!!!!!!!!!!!

                ‘बालगंधर्व’ ही पाचच अक्षरे आहेत पण महाराष्ट्राचे अवघे पंचप्राण या पाच अक्षरांत सामावलेले आहेत, असे आचार्य अत्रे म्हणायचे. शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात कलेची जाण असणा-या मातीमध्ये बालगंधर्व नावाचे रोपटे तरारले आणि नंतरची ५०-६० वर्षे हा गायनाचा, अभिनयाचा कल्पवृक्ष सतत बहरत राहिला. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण बालगंधर्व या नावाची जादू काही ओसरली नाही. संगीत नाटकाचा सुनहरा जमाना संपला तरीही महाराष्ट्राने बालगंधर्वांना दूर लोटले नाही. पल्लेदार नाट्यगीते गाणारा हा आवाज पुढे भक्तिगीते आणि अभंग गाऊ लागला. वृद्धत्व आले, अपंगत्व आले तरीही महाराष्ट्र्राचे या व्यक्तिमत्त्वावरचे प्रेम काही कमी झाले नाही. बालगंधर्वांनीहि महाराष्ट्राला भरभरून दिले.

                लोकमान्य टिळकांचा तो सुवर्णकाळ होता. त्यांनीच नारायण राजहंस या सुरिल्या गळ्याच्या मुलाला ‘बालगंधर्व’ ही उपाधी दिली. लोकमान्य टिळक यांनी गायकवाड वाड्यातील गणेशोत्सवामध्ये छोट्या नारायण राजहंसाचे गाणे ऐकले. खरे तर हे गायन चालू असताना लोकमान्य ‘केसरी’ च्या अग्रलेखाचे लेखन करीत होते. पण नारायणाच्या आवाजाची, आलापाची जादू अशी होती की, लोकमान्यांनी हे लेखन अर्धवट सोडले आणि ते स्वर्गीय स्वर ऐकण्यासाठी ते वाड्याच्या चौकात आले.स्वतः टिळक महाराज तेथे आल्यामुळे श्रोतेही सावध झाले. लोकमान्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले, ‘अरे हा तर बालगंधर्व आहे.’ हे बालगंधर्व विशेषण नारायणराव राजहंस यांना आयुष्यभर चिकटले, नव्हे त्यांचे मूळ नाव मागे पडून केवळ बालगंधर्व एवढेच त्यांचे नाव प्रचलित झाले. ‘गंधर्व’ म्हणजे काय? असा बालसुलभ प्रश्न छोट्या नारायणाने विचारला तेव्हा ‘स्वर्गातील देवदेवतांसाठी सुरेल गाणारा देव म्हणजे गंधर्व’ असे त्याला सांगण्यात आले. ‘गंधर्व’ या बिरुदाची मोहिनी आजही संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय.

जन्म

            बालगंधर्वांसारखा लोकोत्तर कलाकार शंभर वर्षांतून एकदाच जन्माला येतो. या रंगभूमीच्या बादशाहाने सुमारे चार तपे मराठी मनावर राज्य केलं. नारायण श्रीपाद राजहंस, बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अपवादानेच अभिनय करीत असतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. अशा या सव्यसाची कलावंताचा जन्म २६ जून १८८८ रोजी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात नागठाणे या गावी झाला. सतत शोध घेऊनही बालगंधर्वांना लाभलेले विभूतीमत्व कशामुळे? याचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही असे पु.ल. देशपांडे म्हणतात. याचे कारण म्हणजे बालगंधर्व हे प्रचलित मापदंडापलीकडचे व्यक्तिमत्त्व होते.

रंगमंच प्रवेश

                  ``काय सुरेख गातो बुवा हा बालगंधर्व।'' असे लोकमान्य टिळकांनी उद्गार काढले, आणि त्यांचे हे उद्गार सर्व दूरवर पसरले. त्या दिवशी दै. केसरीतील बातमीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ``नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे गाणे लोकमान्यांनी ऐकून त्यांचे कौतुक केले.'' या बातमीने सर्व नाटक कंपन्यांचे लक्ष्य बालगंधर्वकडे गेले. नारायणरावांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत शाहूमहाराजांच्या सूचनेप्रमाणे प्रवेश केला. गोविंद बल्लाळ देवलांच्या हाताखाली बालगंधर्व नाट्याभिनयाचे धडे गिरवू लागले. परंतु बालगंधर्वांची रंगभूमीवरील कारकीर्द किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेत १९०५ मध्ये सुरु झाली असली तरी किर्लोस्कर संगीत मंडळीची स्थापना ता. ३१ ऑक्टोबर १८८० या तारखेस झाली. स्वत: अण्णासाहेब किर्लोस्कर, शंकरराव मुजुमदार, भाऊराव कोल्हटकर, बाळकोबा नाटेकर हा पहिल्या अमदानीतला नटवर्ग - नंतर केशवराव भोसले, बालगंधर्व व दीनानाथ मंगेशकर. हे तिघेही नट-गायक ‘स्वदेश हितचिंतक’ व किर्लोस्कर संगीत मंडळीच्या अंकावर वाढले. हे तीन चिरस्मरणीय झालेले कलावंत म्हणजे महाराष्ट्राच्या नाट्य-नटेश्वराचे त्रि-नेत्रच होते.

                     पुढे किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेचे एक भागीदार नानासाहेब जोगळेकर यांच्या १९११ मध्ये निधनानंतर संस्थेत वाद झाले. परिणामी १९१३ मध्ये बालगंधर्वांनी, गणेश गोविंद (गणपतराव) बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह ती संस्था सोडली आणि गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. या संस्थेने संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवला. संगीत सौभद्र, मृच्छकटिक, शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, मूकनायक, स्वयंवर, विद्याहरण, एकच प्याला अशा अनेक संगीत नाटकांनी व त्यातील बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकांनी रसिकांवर त्या काळी मोहिनी घातली होती. या नाटकांच्या प्रयोगांबाबत बालगंधर्वांच्या गीतांना २- ३ वेळा वन्समोअर; सातत्याने ‘हाऊस फुल्ल’ होणारे प्रयोग आणि पहाटेपर्यंत चालणारे प्रयोग ह्या गोष्टी नित्याच्याच झाल्या होत्या. त्यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्याबरोबर केलेला ‘संयुक्त मानापमान’ या नाटकाचा प्रयोगही प्रचंड गाजला. त्यांनी एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. साधारण १९१० ते १९३० हा कालखंड रंगभूमीचा, नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो, तो प्रामुख्याने बालगंधर्वांच्या कर्तृत्वामुळेच.

                 आपल्या तान्ह्या कन्येचे निधन झाले असतानाही आपल्या मायबाप प्रेक्षकांची निराशा होऊ नये महणून `मानापमान'चा पहिला प्रयोग त्यांनी रद्द केला नाही. गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस यांच्या बरोबर `गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. पुढे अंतर्गत वादामुळे अन कर्जबाजारीपणाने ती बंद पडली. बॅ. जमनादास मेहता, डॉ. भडकमकर आणि वालचंद हिराचंद यांनी बालगंधर्वांना कर्जमुक्त करण्यासाठी फंड उभारण्याचा निर्णय घेतला पण बालगंधर्वांनी, `देवा माझ्यासाठी फंड जमवू नका, माझ्या चुकीने ते कर्ज झाले आहे, मी ते फेडीन` असे स्पष्ट सांगितले. १९२१ मध्ये कर्जात अडकलेल्या या नव्या कंपनीचे नारायणराव राजहंस हे एकमेव मालक होते. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यापुढच्या सात वर्षांत कंपनीने सर्व देणी फेडली. मात्र त्यापुढच्या काळात या संस्थेची आर्थिक स्थिती चढउताराचीच राहिली. नाटकाच्या प्रॉपर्टीसह अनेक गोष्टींमध्ये दर्जा आणि अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह हेही त्याचे एक कारण सांगितले जाते.

                    बालगंधर्वांनी रंगमंचावर पाऊल टाकले तरी त्यांच्या दर्शनाने हजारो प्रेक्षक अक्षरशः वेडे होत. ते कोणत्याही भूमिकेत आणि कोणत्याही प्रकारची वस्रे परिधान करून येवोत, लोक त्यांच्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहात राहात. अबोध शकुंतला म्हणून येवोत, अर्जुनाच्या प्रेमाने पागल झालेली सुभद्रा म्हणून येवोत, नटखट भामिनी आणि लवलवती वसंतसेना म्हणून येवोत किंवा प्रणय देवता रुक्मिणी म्हणून येवोत किंवा अगदी फाटके लुगडे नेसून येणारी सुधाकराची सिंधू म्हणून येवोत, लोक आपल्या आसनावर ठार खलास होऊन जात. नंतर त्यांचा अभिनय आणि गाणे असे. पण बालगंधर्वांचे प्रथमदर्शनच मुळी किलिंग असे. स्रियांच्या वेषातून पुरुष अशा नजाकतीने वावरायचा की, सौंदर्यवती महिलाही त्यांचे अनुकरण करायच्या. शब्दाचा घाट, त्याचा लाडिकपणा, त्याची अचूक फेक यातून बालगंधर्वांच्या दर्शनाएवढेच बोलणेही प्रसन्न व्हायचे. संवादातून सहजपणे ते गाणे सुरू करायचे. गाणे कसे गावे आणि गाणे कसे ऐकावे हे बालगंधर्वांनी महाराष्ट्राला शिकविले. बालगंधर्व हे नुसत्या गळ्याने कधी गात नसत. ते ओठांनी गात, चेह-याने गात, हसण्याने गात, गालावरच्या खळीने गात, चेह-यावरच्या मिश्किल हावभावाने गात. त्यांचे गद्य बोलणे हेही सुरेल संगीतासारखे सुमधुर वाटायचे. मग ते गायला लागले तर सा-या रंगमंचावर आणि नाट्यगृहात सप्तसुरांचे जणू कारंजे उडत राहायचे. ‘शाकुंतल’ नाटकातील ‘मना तळमळशी’ , ‘सौभद्र’ मधील ‘किती किती सांगू तुला’ , ‘पांडू नृपती जनक जया’ , ‘मानापमान’ मधील ‘टकमक पाही’ , ‘खरा तो प्रेमा’ किंवा ‘मला मदन भासे’ किंवा ‘नाही मी बोलत आता’ , ‘विद्याहरण’ मधील ‘मधुमधुरा गिरा मोहना’ , ‘मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला’ , ‘स्वयंवर’ मधील ‘नाथ हा माझा’ , ‘सुजन कसा मन चोरी’ , ‘मम आत्मा रमला’ , ‘संशयकल्लोळ’ मधील ‘संशय का मनी आला’ किंवा ‘मजवरी तयांचे प्रेम खरे’ , ‘एकच प्याला’ मधील ‘कशी या त्यजू पदाला’ , ‘सत्य वदे वचनाला नाथा’ अशी पदे म्हणजे रागदारी आणि सुगम संगीताचा अमृतानुभव असे.

                 ``कशी या त्यजू पदाला'' `सत्य वदे वचनाला नाथा' `प्रभू अजि गमला' काय आठवतात का ही गाणी? नाही म्हणणारच हो. पण ती तुमच्याआमच्या वडिलांच्या पिढीची गाणी म्हणून दुर्लक्षून कस चालेल. ही गाणी तिचे गायक, बालगंधर्व हे तर अवघ्या महाराष्ट्राचे भूषणच होते. `दादा ते आले ना` हा डायलॉग तर त्याकाळी घरोघर पोहोचला होता. स्वयंवर नि एकच प्याला एका पाठोपाठ रंगभूमीवर आली. स्वयंवरातली ही हाक कृष्णदर्शनासाठी अधीर झालेली, बावरलेली रुक्मीणीची पहिलीच एंट्री प्रेक्षकांना जिंकून जाई. `काय कला ही सदना आली', त्या मदन मनोरम रुपी', माडीवरी चल ग गडे, `प्रियासी रमवाया जाऊ' हे प्रत्येक पद अभिनयात भिजून जो तो प्रसंगी डोळ्यासमोर उभा राही.

         १९३१ साली रत्नाकर मासिकाचा `बालगंधर्व' विशेषांक प्रसिद्ध झाला होता. संशयकल्लोळमधील बालगंधर्वांची भूमिका हीच पहिली सामाजिक भूमिका त्यांची अल्लड, किंचित हट्टी `रेवती' रसिकांच्या विशेषत: तरुणांच्या मनात प्रेयसींचे चित्र उभारुन गेली. `मजवरी तयांचे प्रेम खरे' `संशय का मनी आला, ` `नित्य जीवनक्रम आमुचा` अशी कितीतरी पदे लोकांच्या तोंडी घोळू लागली. बालगंधर्व मात्र म्हणत, ``आपण मला बालगंधर्व म्हणता पण मायबाप हो, मी अजून खरोखरच बाल आहे. अजून मला कितीतरी शिकायचे आहे.' नाट्यसृष्टीत अनेक नायिका आपल्या अभिनयाने साकार करणारे बालगंधर्व एरवी सुध्दा विनम्र आणि गोड बोलत.

                  भाऊराव कोल्हटकरांच्या १९०१ मधील निधनानंतर जेंव्हा संगीत नाटक परंपरेला उतरती कळा आली, त्यानंतर बालगंधर्वांनी या परंपरेत मोलाची भर घालत ती पुढे नेण्याचे महत्वाचे कार्य केले. बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारतानाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली.

                   १९३३ च्या सुमारास बोलपटांचे युग सुरू झाले. साहाजिकच रंगभूमीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. बालगंधर्वांनीही प्रभातच्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटात संत एकनाथांची भूमिका केली. ‘पण प्रेक्षकांशी थेट संगीत संवाद साधणारा बालगंधर्व यांच्यासारखा कलाकार या प्रसार माध्यमात रमला नाही. तीन मिनिटांमध्ये नाट्यगीत किंवा अभंग बसविणे आणि त्याची रेकॉर्ड काढणे बालगंधर्वांना त्रासदायक वाटू लागले. बोलपटात त्यांचे मन रमेना. मात्र नंतरच्या ध्वनिमुद्रिकाद्वारे गायक घरोघरी जाऊ लागले, आकाशवाणीमुळे रेडिओ घरोघरी आले. तरीही त्यांचा ओढा रंगभूमीकडेच राहिला. १९३९ च्या सुमारास त्यांनी रंगभूमीवर पुरुष भूमिका साकारल्या. त्यामुळे स्त्री भूमिकांसाठी महिला कलाकारांची गरज निर्माण झाल्यानंतर एप्रिल १९३८ मध्ये गोहर कर्नाटकी यांचा गंधर्व नाटक मंडळीत समावेश झाला. गोहरबाईनी चित्रपटांतूनही भूमिका केल्या होत्या. मात्र मराठी रसिकांनी गोहरबाईनां स्वीकारले नाही. बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकाच प्रेक्षकांना जास्त प्रिय होत्या. बालगंधर्वांच्या पुरुषी भूमिका स्वीकारायची लोकांची तयारी नव्हती. यानंतर मात्र रंगभूमीचा एक सम्राट जणू त्याचे कलेचे राज्य खालसा झाल्याप्रमाणे वावरू लागला.

राजहंस माझा निजला

                    कान्होपात्रा नाटकातील, `अवघाची संसार`, `पतित तू पावना` इ. गीते म्हणताना शक्ती खर्च होई म्हणून ते प्रत्येक प्रवेशानंतर ते एक ग्लासभर दूध घेत. माझ्या मायबापांसाठी मला अक्षरश: माझे रक्त आटवावे लागते याची कल्पना इतरांना येत नाही. असे ते म्हणत. अशाच एका मुक्कामात बालगंधर्वांना खूप खोकला झाला डॉक्टरांनी त्यांना, अति दूध पिणे बंद करा, असे सुचविले.चहा घ्या खूप बरं वाटेल तुम्हाला. बालगंधर्व हसले आणि म्हणाले. दादा गेले (लोकमान्य टिळकांना ते दादा म्हणत) त्या दिवसापासून चहा सोडला आहे. चार दोन वर्षे आणखी जगण्यासाठी चहा घेऊ? १९५५ रोजी त्यांनी एकच प्याला नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली.

                   गोहरबाईने अपंग झाल्यावरही बालगंधर्वांना सांभाळले. अखेरच्या काळात गोहरबाई आचार्य अत्रे यांना ‘शिवशक्ती’ मध्ये भेटत असे आणि आपण किती काळ बालगंधर्वांची सेवा करायची असे विचारीत असे. बालगंधर्वांची हार्मोनियम आचार्य अत्रे यांनी गोहरबाईकडून विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवली होती. पुढे गोहरबाईचे निधन झाले आणि गोहरबाईच्या निधनानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १५ जुलै १९६७ या दिवशी वयाच्या ७९ वर्षी जीवनाच्या रंगमंचावरून कायमची या अभिनयसम्राटाने  निवृत्ती घेतली.

पुरस्कार

                     १९२९ सालच्या २४ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. १९२९ साठी पुणे येथे झालेल्या नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. १९४४ ला नाट्यशताब्दी महात्सवाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. १९५५ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचे राष्ट्रपतीपदक मिळाले. १९६४ साली त्यांना पद्मभूषण मिळाले. महात्मा गांधींनी ज्यांना मुंबईत बोलावून त्यांचे गाणे ऐकले, राजधानी दिल्लीत पंतप्रधान नेहरू यांची दोन तासांची मैफिल ऐकून गेले.

                   नाटकांमधील त्यांची अनेक पदे गाजली. शास्त्राचा बाज राखून, अभिनयाला अनुकूल असे गाणे त्यांनी गायले. त्यांची गाणी घरोघरी पोचली. नाट्यसंगीताच्या माध्यमातून बालगंधर्वांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला हातभार लावला. एका अर्थाने त्यांनी शास्त्रीय संगीत सोपे करून रसिकांसमोर मांडले. नाट्यसंगीताची अभिरूची सामान्य रसिकांमध्ये निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालगंधर्वांनी केले. आपल्या हयातीतच आख्यायिका बनून राहिलेल्या या असामान्य कलाकाराची स्मृती रसिकांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने जतन करून ठेवली आहे. १९६८ साली पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिर हे नाट्यगृह त्यांचे स्मृतीमंदिर तयार केले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी यात पुढाकार घेतला होता, तर त्याचे उद्घाटन आचार्य अत्रे यांनी केले. खुद्द बालगंधर्व हयात असताना त्यांच्याहस्ते जिमखान्यावर या वास्तूसाठी भूमिपूजन झाले होते. सांस्कृतिक पुण्याचे केंदबिंदू मानले जाणारे बालगंधर्व रंगमंदिर २६ जून रोजी चाळीशी पूर्ण करत असून बालगंधर्व उर्फ नारायणराव राजहंसांचा हा १२० वा जन्मदिन आहे.

अशा या सव्यसाची कलावंताला कोटी कोटी प्रणाम अन् मनाचा मुजरा

संकल्पना व शब्दांकन : निवेदिता पाटील
माहितीस्त्रोत : अंतरजाल 

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Sunday, June 19, 2011

कहानी चंद्रकांता कि !!!!

आज सकाळी TV वर चॅनेल सर्फ करत असताना अचानक सहारा वन वर कार्यक्रम बघितला  कहानी चंद्रकांता कि !!!! आणि मनात विचार आला आयला चंद्रकांता परत चालू झाली?? १९९४ ते १९९६ च्या दरम्यात दूरदर्शन वर चालणारी दर रविवारी लागणारी सिरीयल मी आणि माझा भाऊ न चुकता बघणारे. कालांतराने हि सिरीयल दूरदर्शन वरून बंद होऊन सोनी तव वर आली . आपण हि सहारा वन वर चालू झालेली हि नवीन चंद्रकांता डेली सोप सारखी कहानी पुढे नेलेली निघाली. आता मात्र हद्द झाली म्हणत मी आपला  चॅनेल बदलला. शेवटी काहीच नाही म्हणून गाणी ऐकत बसली. पण मन मात्र मागच्या आठवणींमध्ये अडकून बसला ह्या चंद्रकांता मधला सर्वात लक्षात राहिलेलं पात्र  म्हणजे अखिलेंद्र मिश्र यांनी साकारलेला  "क्रूर सिंग" आणि त्याची ती "याक्कू" म्हणण्याची पद्दत. ते आठवण आली आणि अचानक कंटाळेल्या चेहऱ्यावर हसू फुटलं. त्यानंतर लगेच आठवला तो भाऊ आणि त्याच्या उद्योगामुळे त्याला आम्ही क्रूर सिंग नाव ठेवला होता. 

क्रूर सिंग त्याच्या दोन चेल्यांसह 
झालं असा होता हि भावाच्या केसात झाला होता कोंडा आणि ह्या पट्ठ्याला वाचनाची फार आवड. त्याचमुळे  त्याच्या  वाचनात आलं होतं कि केसांना लिंब लावलं कि कोंडा कमी होतो. मग काय हि स्वारी पोहोचली आई कडे म्हणायला लागली मी केसांना लिंब लावतो. आई बिच्चारी कामात होती म्हणाली आपण नंतर लावू मी आत्ता कामात आहे. थोड्यावेळाने आईचे काम आटोपले तसे भावाने परत आठवण करून दिली केसांना लिंब लावून दे म्हणून. मी बघितलं या मायलेकांचा केसांना लिंब लावायचा कार्यक्रम चालू होतोय आपण आपला पळाव म्हणून मी वरच्या मजल्यावर गेली थोड्या वेळाने दादा म्हणेज आमचे वडील आले. त्यांचा आवाज ऐकून मी खाली आली आणि भावाला बघून जोरात हसू आला ते हसू आवारत मी विचारलं हा क्रूर सिंग का झाला?? कारण लिंब लावल्यामुळे त्याचे केस उभे राहिले होते.  हे ऐकून तो आरशात बघायला गेला आणि आम्ही सगळे हसू लागलो. तेव्हापासून कितीतरी महिने त्यांना तेच नाव पडल होतं. आजही आठवलं कि हसू आवरत नाही. आता ती चंद्रकांता हि नाही आणि तशी वेळ हि येत नाही फारशी. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असाच मनाच्या कुपीत असलेला आठवणींचा अत्तर जीवन सुखी करत असतं.

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Thursday, June 09, 2011

चिकन बिर्याणी आणि उपोषण


माझ्या जन्माच्या आधी घडलेली घटना आहे. माझ्या दादांनी सांगितलेली हि उपोषण कथा आहे. खरे तर रामदेव बाबांचे उपोषण चिरडले त्यावेळी हा किस्सा त्यांनी सांगितला होता. पण कामाच्या व्यस्ततेमुळे लिहावयास जमले नाही. म्हणून आज पोस्ट टाकते आहे. 


१९७० च्या आसपास उरणमधील एक पुढारी उपोषणास बसले, १,२,३, असे करत ४ था दिवस उजाडला नेहमी प्रमाणे डॉक्टर येऊन आले उपोषणकर्त्याचे ब्लडप्रेशर तसेच इतर चेकअप करण्यात आले सगळे नॉर्मल, एखाद्याला असते सवय म्हणून डॉक्टरांनी जास्त चर्चा न करता आपला रिपोर्ट वर पाठवला.

५ व्या दिवशी जिल्हाधिकारी पहाणी करण्यास आले असता त्यांनी कोणतीही चर्चा न करता, आश्वासन न देता सरळ त्यांच्या सगळ्या मागण्या तत्काळ मान्य केल्या. कारण जिल्हाधिकारी आले तेव्हा उपोषणकर्त्याची चौकशी करतानाच अचानक व्यासपीठाच्या खाली प्रचंड मोठे असे कुत्र्यांचे खेखाट झाले. ते बघण्यासाठी खाली वाकले असता चिकन च्या हाडांसाठी कुत्र्यांचे भांडण चालू होते त्यामुळे सगळे भांडे फुटले. 

प्रत्यक्षात उपोषणकर्त्यावर नजर ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस शिपायाला पैसे देऊन पटवण्यात आले होते. दिवसभर पाणी हि न पिणारे हे रात्री मस्त पैकी चिकन बिर्याणी वर ताव मारून श्रमपरिहार करीत. एव्हढ्या रात्री खरकटे कुठे टाकायला जाणार अधिच दिवसभर च्या उपासामुळे थकलेले असायचे तेव्हा ते व्यासपीठाखाली ढकलून द्यायचे. 

हि सगळी रामकथा कळाली तेव्हा जिल्हाधिकारी म्हणाले, उभ्या आयुष्यात इतका डोकेबाज माणूस नाही पहिला पण तुम्ही फसवणूक केलीत सरकारची. त्यावर सरकार तरी आमच्याशी कुठे निष्ठेने वागतंय?? असा प्रतिसवाल करीत त्यांना गप्प केले.  यावर निरुत्तर झालेल्या जिल्हाधीका~यांनी लिंबू सरबताऐवजी चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली.  ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Thursday, June 02, 2011

गच्च भरला पाऊस

धूसर प्रकाश, वाटा अंधारल्या 
गच्च भरला पाऊस, दिशा मोहरल्या 


माझ्या बेडरूम च्या खिडकीतून ढगांनी गच्च भरलेल आकाश 


घरच्या बाल्कनी मधून टिपलेले आभाळ 

बेडरूम च्या खिडकीतून टिपलेला देवळाचा कळस 


पावसात खेळायला आलेली अध्यांतरी 
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Saturday, May 28, 2011

पोटोबा !!!!!!!!!!

शनिवार नेहमीप्रमाणे डब्बा नाही म्हणून मग काय McD जिंदाबाद

Medium Fries , Mcspicy with tomato sauce ani coke :)  


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

TIMEPASS

काल संध्याकाळी ऑफिस मधून लवकर सुटका झाली. वाशी डेपो ऑफिस पासून ५ मिनिटे अंतरावर असल्याने चालत निघाले डेपो जाऊन बह्गते तर काय बस स्टॉप माणसांच्या गर्दीत फुलून वाहत होता. स्वताशीच म्हटलं ह्या परिस्थिती आपल्याला काय बस मिळणार नाही, तेव्हा पुढच्या स्टॉप वर प्रस्थान करावे तो हि पुढे ५ मिनिटाच्या अंतरावर म्हटल्यावर मग चालत मार्गक्रमण केले तर तिकडे  संध्यकाळी मार्केटच भरले होते. तेव्हा त्या गर्दीत जमेल तसे वाट आणि फोटो काढत मार्गक्रमण केले. पण त्या गोंधळत एक बस गेली असो त्याचे दुख नाही करण लगेच आणि कधी नव्हे तर १० मिनिटात दुसरी बस आली ती हि रिकामी त्यामुळे पुढचा प्रवास सुखकर झाला असो. त्या मार्केट ची क्षणचित्रे

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

क्षितिजा पलीकडे.... आता facebook वर