Friday, July 15, 2011

माझा गुरु

             आयुष्यातला प्रत्येक क्षण काही ना काही शिकवत असतोच जीवनात अनेक गुरु येतात, प्रत्येकाची शिकविण्याची पध्दत वेगळी असते पण आयुष्यभर संस्कारांवर मोहोर उमटवते ती पहिल्या गुरुची शिकवणी!!!
हि पोस्ट माझ्या पहिल्या गुरूसाठी आज ज्यांच्यामुळे मी आज लिहायाला शिकली (म्हणजे मी काही मोठी लेखिका नाही पण जे काही लिहिते ते.... असो ) लोक म्हणतात कि पहिली गुरु म्हणजे आई असते पण मी गर्वाने सांगते माझे पहिले गुरु म्हणजे माझे दादा (वडील). ( माझी आई हि पण माझी उत्तम मार्गदर्शक आहे पण... पहिल्या गुरूचा मन दादानांच)

                  माझं वक्तृत्व आणि माझं लेखन ज्यांनी घडवले ते दादा घडवलेच म्हणावे लागेल (मी घरात शेंडेफळ त्यामुळे फार आळशी आणि झोपेचा छंद तेव्हापासून जडलेला आजही कायम आहे.... असो.) आमच्या गुरूंना म्हणजेच दादांना वक्तृत्वाची देणगी आजोबामुळे लाभलेली पण त्यामुळे त्यांचे वाचन खूप आणि अभ्यासही, लहानपणी खूप बक्षिसे मिळविली होती त्यांनी. आमचे थोरले बंधू आजी – आजोबांकडे मुंबईला शिकण्यास होते, आणि मी आई – दादांसोबत गावाकडे त्यामुळे वक्तृत्वाचे प्रयोग आमच्यावर झाले.

                   पण त्या प्रयोगांचा फायदा फार झाला, उच्चार व आवाजातली स्पष्टता, कोणत्या शब्दावर किती जोर द्यायचा त्यामुळे कसा अर्थ फिरतो हे कळाले. वक्तृत्व स्पर्धेसाठी तर खूप मेहनत घ्यायचे. आधी माझ्यासाठी भाषण तयार करणे मग तो स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करणे, मला ते पूर्णपणे ऐकवणे, माझ्याकडून पाठ करवून घेणे, माझ्या आवाजात ते भाषण रेकॉर्ड करणे व शांतपणे मला ते ऐकवणे, दोघांच्या उच्चारातील फरक चेक करणे, आणि जर ते बरोबर जमले नसतील तर त्यांनी त्यांचे रेकॉर्ड  केलेले भाषण ऐकवत  व त्यानंतर माझे रेकॉर्ड झालेले भाषण ऐकवत. दोघांच्या उच्चार व शब्दांवरील  जोर देण्याच्या पद्धतीतील फरक समजावून सांगत. पुन्हा पाठ करून घेत. बर नुसतीच घोकमपट्टी करायला न लावता त्या विषयीचा इतिहास समजवून सांगत आणि मला तो समजेपर्यंत समजावत.

                   लहानपणी भाषण लिहून देत खरे पण जशी मोठी झाली तशी माझी भाषणे लिहिणे आणि त्यांची तयारी कशी करायचे ते माझे मलाच करायला शिकविले. तिकडूनच मग ह्या लेखनाचा छंद लागला. आयुष्यातला पहिला लेख म्हणजे वक्तृत्व स्पर्धेसाठी नाही तर कॉलेज मासिकासाठी लिहिला होता रॅगिंग वर ते हि त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता करण त्यावेळी ते बाहेर होते कामानिम्मित. ते परत आल्यावर त्यांना तो दाखविला. संदर्भ कुठून घेतलेस? हा एकाच प्रश्न होता आणि पेपर मध्ये आलेल्या बातम्या तसेच कॉलेज सरांना विचारलेली माहिती. त्यावर छान आहे एवढीच प्रतिक्रिया होती.

                  आज जेव्हा मी ब्लॉग वर लेख प्रकाशित करते त्यांची माहिती भेटणारया प्रत्येकाला सांगतात व लिंक देतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यातली चमक सांगून जाते कि मझ्याबद्दल किती अभिमान आहे ते. आणि हाच अभिमान एक नवीन जबाबदारीची जाणीव करून देतो हे सातत्य टिकवायचा आहे. आणि डोक्यात एकाच गोष्ट येते ती म्हणजे Champions are those who can get themselves to constantly improve & consistently perform at peak level.

थांक्यू दादा!!


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, July 04, 2011

मोरपीस

                 नातं म्हणजे मनाच्या पुस्तकात जपलेलं मोरपीसच असतं ना! आपलं मन किती हळवं असत?? काही वेळा आपलंच मन आपलं राहत नाही आणि त्याची समजूत घालणे फार कठीण होऊन बसता.... तेव्हा त्याला समजून घेणाऱ्या.. त्याचा आधार बनणाऱ्या..त्याला प्रेरणा आणि बळ देणाऱ्या विश्वात ते रमत तिथे असतं एक नातं... भावनिक बंधांची गुंफण असणारं.. आपल्या भावनांना जपणारं.. मायेची उब देणार, जाणीवांना समजून आधार देणार अशा नात्याची जवळीक फार थोड्या लोकांना लाभते. मनातल्या भावना अन् नात्याचे नवीन अंकुर त्यांचा गुंता कसाही असला तरी हवाहवासा वाटतोच ना!! एका मित्राने चॅट स्टेटस लावून ठेवलं होतं “एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली – जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे.” किती खर आहे हे वाक्य!!

              कारण कधी कधी एखादी व्यक्ती खूप जवळची, आपलीच वाटू लागते. तिचे विचार म्हणजे आपल्याच हृदयातील भावनांचे प्रतिबिंब वाटू लागते. ती व्यक्ती म्हणजे सर्वस्व. अशा वेळी तिथे जन्म घेतं ते एक नाजूक नातं. या नात्याला रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त महत्व असतं. प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण हाच अनुभव आणि त्यातील Passion आयुष्यभर टिकवणे फार कठीण असत. परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. एकमेकांना गृहीत धरण्याची सवय लागते, काय एव्हढ बोलायचं ? काम पण आहेतच कि! कळत कसं नाही आपण कामात आहोत हे तो / ती समजून का घेऊ शकत नाही. आपणच सवय लावलेली असते कामातून वेळ काढून बोलायची आणि तीच काही काळाने तापदायक वाटू लागते.

             अश्या भावनेच्या भरात कोवळ्या विचारांचे अंकुर घेऊन जन्मणार नातं कधी कधी खुपच हळवं असतं नात्यात येणाऱ्या कठीण प्रसंगात हे नातं कोमजून जात. संयमी, सहनशील माणसेच अशी नाती टिकवू शकतात. कारण गरज असते ती आपल्या माणसाला त्याची space देण्याची. अशा वेळी आपल्या मनातल्या भावना योग्य मार्गानं व्यक्त करता येणं ही एक कलाच आहे. ती आपल्यापाशी असली, की आपण आपली बाजू योग्य शब्दांत चांगल्या प्रकारे मांडू शकतो, अगदी वाईटपणा न येता. त्यासाठी जुन्या आठवणी, सोबत घालवलेले क्षण यांची संयमीपणाने आठवण करून देणे, कामाच्या व्यस्ततेमधून ५ मिनिटे का होईना पण आपल्या माणसासाठी वेळ काढलेला वेळ हेच नात्याला पुनर्जीवन देऊ शकतात.

           नात्यात कृत्रिमता वं जाणिवांचा अभाव असेल तर ते नातं कधी नातं नसताच.... अशी नाती फुलण्याआधीच गळून पडतात. तो फक्त बेगडी संबध असतो. अशी नाती वेळ निभावून नेण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी बनवलेली शिडी असते. काम झाल्यावर अडगळीत टाकण्यासाठी! अशी क्षणभराची नाती भौतिक सुखाशिवाय काही देऊ शकत नाही. हे झालं जोडीदाराबद्दल पण सगळ्याच नात्यांना हे लागू होतं.

                 तसंही नातं कोणता का असेना, त्यात मायेचा ओलावा सुख दु:खात समजून घेण्याची, आधार देण्याची, समर्पण व त्यागाची भावना असायला हवी. अशी नाती आज दुर्मिळच! निसर्गदत्त नाती सुद्धा किती दुरावलेली, विस्कटलेली आहेत. आई-वडील, भाऊ-बहिण तसेच इतर कौटुंबिक आपण जपले पाहिजे. दुरावा असेल तर त्याचे कारण आपण शोधायला पाहिजे. ह्या साठी आपल्या मनातील विचारांचा परीघ ओलांडायला हवा. आयुष्य म्हणजे नात्यांच्या धाग्यात गुंफलेला एक सुंदर बंध आहे. ह्या बंधाचा एक जरी धागा विस्कटला तरी संपूर्ण आयुष्य विस्कळीत होतं. तो धागा व्यवस्थित पणे गुंफून आयुष्य पूर्वपदावर आणणे म्हणजे खूप संयामचे काम असते.

             अन् काही नाती अशीही असतात कि ज्यांना आपण कोणत्याच चौकटीत बांधू शकत नाही किंवा शब्दात मांडू शकत नाही. अशी नाती म्हणजे स्वर्गसुखाची जिवंत अनुभूती असते. अशा या मनापासून जपलेल्या नात्यात कितीही संकटे येऊ देत, रुसवे-फुगवे असू देत पण तरी अशा नात्याशिवाय जगणं कठीण असतं. अशी नाती रक्तापेक्षा भावनीक पातळीवर जास्त गुंफलेली असतात. त्यांना वयाचे, जाती-धर्माचे आणि कुठल्याच परिस्थितीचे बंधन नसते. असं नातं ज्यांना लाभत ते भाग्यवान असतात. अशा नात्याची जपणूक करण हेच महत्वाच असतं.


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐