१४ जून २०००

१४ जून २०००, घड्याळात ४ चे ४:३० झाले. आता माझा रिझल्ट कोण बघणार कारण त्यावेळी इंटरनेट वर निकाल जाहीर होत नव्हते आणि ज्याचा निकाल लागणार त्याला घराचे कधीच शाळेत पाठवत नसत कारण उगीच टेन्शन नको दुसरे कोणीतरी बघून यायचे, पण माझ्यासाठी कोण जाणार? शेवटी मीच तयार झाले. आजोबांना आवाज दिला “मी जाते आहे शाळेत निकाल घेऊन येते.”

“तू जाशील ना? नीट जा काही होऊ दे किती मिळतील तेवढे मिळतील चिंता करू नकोस.” असे म्हणून मला पाठवले.

मी अगदी झाशीच्या राणीच्या थाटात मी कोणाला घाबरत नाही (तस आजही मी कोणाला घाबरत नाही!) अशा अविर्भावात शाळेत दाखल झाले. पण आतून पुरती घाबरलेली होते कारण वर्गातील कोणीच दिसत नव्हते, कोणाचा भाऊ, बहिण, काका ई. लोक आले होते.  मी माझे हॉल तिकीट दाखवून रिझल्ट मागून घेतला. बघितला तर हुश्श! मी पास आले होते ५४% ने! घरी गेले.

आजोबा माझी वाटच बघत बसले होते मला बघताच म्हणाले “आलीस! किती पडले?” ( नशीब मी पास होणार हे गृहीत धरले होते, नाहीतर माझ्या मोठ्या वाहिनिसारख नाही केले, नववीत असताना वाहिनीने प्रश्न केला होता “ताई, तुमचे किती विषय गेले? मी ऑन द स्पॉट आउट! पास कि नापास पण नाही? सरळ किती विषय गेले! त्यापेक्षा हे बरे!) मी उत्तर न देता सरळ निकाल हातात दिला, खूष व्हावे कि न व्हावे हेच कळत नव्हते. “अग तो प्रकाश मामा आला होता, दादा बरे आहेत ऑपरेशन व्यवस्थित झाले आहे म्हणून सांगायला आला होता”
******

१३ जुन २००० नॉर्मल पावसाळ्याची संध्याकाळ आमच्या मातोश्री आम्हाला उद्देशून “निवे बाय उद्या रिझल्ट आहे तुमचा दहावीचा, घाबरू नको काय पडतील ते पडतील मार्क!” (असे म्हणून किमान आम्ही पास होऊ असा विश्वास दाखवला होता!) इतक्यात पिताश्रींची एन्ट्री “आई! एक कप चहा दे जरा काम आहे बाहेर जाऊन येतो” (अजूनही मुलांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून आमचे पिताश्री आम्ही समोर असलो तर स्वतःच्या बायकोला आईच म्हणतात, आणि आमच्या मातोश्री दादा )
मातोश्री “देते चहा मी! पण तुम्ही कुठे? हे बघा आता ७ वाजत आलेत पावसाळ्याचे दिवस आहेत उगीच कुठे जाऊ नका!” सरळ आदेशच दिला.
“अग जरा एक काम आहे ते करून येतो पिरकोनला जाऊन येतो.” (जवळच असलेल्या गावाचे नाव) पिताश्री समजावण्याच्या सुरात
“आत्ता पिरकोनला काय काम आहे? काही जाऊ नका! हा घ्या चहा!” इति मातोश्री
“मी भाऊंकडे जाऊन येतो, मी आत्ता गेलो नाही तर ते सक्काळी सक्काळी घरी येऊन माझे डोके खातील” पुन्हा एकदा पिताश्री
“काय करायचे ते करा! निवे वरच्या खिडक्या बंद केल्यास का? करून येजा पहिले” मातोश्री गरजल्या
मातोश्री आणि पिताश्रींचा सुसंवाद ऐकणारी मी माझे नाव ऐकताच दचकून खिडक्या लावायला पाळले.
नेहमीची सटरफटर कामे करण्यात मी वेळ घालवत होते. 

८ वाजले असतील औषधे घ्यायची असल्याने नेहमी प्रमाणे आजोबांनी आईला आवाज दिला “प्रतिभा जेवायला बसुया का?”
आई “भूक लागली असेल तर बसुया पण अजून दादा नाही आलेत.”
“मला जेवण दे, मला औषधे घ्यायची आहेत! दादा काय त्याची कामे केल्याशिवाय येणार नाही!” इति आजोबा
“ये पोरानो तुम्ही पण जेवून घ्या!” आईने आवाज दिला
“तुम्ही तिघे (मी आजोबा आणि माझा मोठा भाऊ) जेवून घ्या मी दादांसाठी थांबते.” आई
“नेहमी जेवून घेतेस ना मग आज तरी कशाला थांबतेस, जेवून घे.” आजोबा आणि आईचा संवाद चालू झाला
आम्ही दोघे (मी आणि माझा भाऊ) दोघे खाली मान घालून जेवू लागलो.
“नको dady मी थांबते” आई
संवाद संपतच होता इतक्यात आईची चुलत बहिण घरी आली,
“ताई जेवला बसलीस?” मावशी
“नाय ग बोल, काय झाल आज अचानक आलीस” आईने विचारले
“काकीचे कडे गेल्तो तिकडून इकडे आलो” मावशी
“ताई तू टेन्शन नको घेऊन.” मावशी पुन्हा
“मी कशाला टेन्शन घेऊ” आई
“नाय म्हणजे....” मावशी
“काय झाल बोल?” आई
“काकीसचे कडे होतो तेव्हा आपल्या कृष्णाकाकाच्या प्रशांत ने फोन केलता....” मावशीचे वाक्य अर्धवट तोडत आई म्हणाली “बोल मी ऐकते आहे.”
“नाय म्हणजे तू घाबरू नकोस पन भाऊंचा अक्सिडेंट झालाय..” मावशीने एका दमात सांगून टाकले.
“तरी मी सांगत होते जाऊ नका म्हणून पण माझ ऐकत कोण, बर निकेतन पटकन जेवण संपव आपण जाऊन, किती लागलंय काही माहित आहे का तुला?” आईने मावशीला प्रश्न केला
“नाय माहिती” मावशी,

“बर ठीक आहे, घाबरू नको मी बघते  काय करायचे ते!” आमची आई मावशीलाच धीर देत होती.
भाऊ आणि मी पटकन जेवण आटोपले. आई आता मध्ये गेली “ Dady दादांचा अक्सिडेंट झालाय, मी जाऊन येते. तुम्ही नीट काळजी घ्या, काय असेल तर मी नंदाबाय च्या घरी फोन करीन. ” आणि आजोबांशी बोलताना कपाटात होते तेवढे पैसे घेतले. आणि निकेतनला आवाज दिला “बाबू जरा मागच्या गल्लीतील लक्षु मामा ला आलाय का ते बघ आणि त्याला दादांचा अक्सिडेंट झालाय तेव्हा रिक्षा काढायला सांग जा!” आणि मला आवाज दिला “निवे मी जातेय, घरात आजोबा आणि तूच आहेस, त्यांच्याबरोबर भांडू नकोस!”

इतक्यात निकेतन ने आवाज दिला “ताई (तो आईला ताई म्हणतो) चल मामाने रिक्षा काढली आहे. बाजूचा शान्त्या दादा पण बाईक घेऊन निघाला आहे पुढे.”
आई नि भाऊ गेले घरी मी आणि आजोबा, काय झाले असेल ह्या विचाराने झोप येत नव्हती सो आम्ही फक्त वाट बघत होतो कि निरोप येईल किंवा आई दादा येतील शेवटी रात्री ११ वाजता दरवाजा वाजला मी लगबगीने दरवाजा उघडला. तेव्हा आई दिसली पाठोपाठ, बाजूचा शान्त्या दादा, निकेतन, D. K. पाटील, दीपक दादा अशी मंडळी दादांना घेऊन घरात येत होती. जास्त कुठे लागलेले नसले तरी पायाला पट्टी बांधलेली दिसत होती. दादांना खुर्चीवर बसवले व “काही हवे असेल तर आवाज द्या म्हणून” एक एक जण निरोप घेऊन गेला.

आईने परत निकेतनला आवाज दिला “निकेतन वरच्या बेडरूम मधून गादी  खाली आणून टाक.” आणि मग आपला मोर्चा दादांकडे वळवत “तरी मी तुम्हाला सांगितलं होत जाऊ नका म्हणून?” दादा खाली मान घालून सगळे ऐकून घेत होते, “चला थोडे खाऊन घेऊ या तुम्हाला औषधे पण घ्यायची आहेत”
जेवून झाल्यावर आई म्हणाली “आता झोपूया उद्या सकाळी तुमचे ऑपरेशन आहे.” आम्ही झोपणार पण दादा अपघाताची कथा सांगण्यासाठी इंटरेस्टेड होते त्यामुळे दादांनी आईला न जुमानता कथा चालू केली
“मी काम उरकून परत येत होतो, इतक्यात पाऊस चालू झाला आता उघड्यावर थांबण्यापेक्षा हळू हळू गाडी काढून घरी येऊ असा विचार करून मी गाडी हळू हळू गाडी चालवत होतो पण पावसामुळे रस्त्यात असलेला खड्डा दिसला नाही आणि  त्या खड्ड्यात असलेला मोठा दगड हि. त्या दगडाला गाडी धडकून मी सरळ बाजूच्या शेतात उडालो सुदैवाने मागून प्रशांतची (आईचा चुलत भाऊ) गाडी येत होती. त्यांनी कोणाला तरी उडालेला बघितलं म्हणून ते माझ्या जवळ आले, त्यांनीच मला उचललं, माझी गाडी चालू केली, मी त्याला म्हटलं पण अरे मला पाय उचलता येत नाही तूच गाडी चालव, त्याने दादांची गाडी ताब्यात घेतली आणि तो चावू लागला आणि प्रशांत मामाची गाडी त्याच्या सोबत असणाऱ्या माणसाने चालवायला घेतली पुढे स्ट्रीट लाईटच्या उजेडात लक्षात आले कि पायातून रक्त येते आहे, म्हणून मग त्याने मला डॉ. खोपकरांच्याकडे नेले. त्यांनी पण  कंडीशन लक्षात घेता मी प्रथमोपचार करतो तुम्ही यांना पनवेलला न्या मी चिट्ठी देतो दगडाला धडकले असल्याने पोलिस केस पासून सुटका होती. तिथे मग तुम्ही सगळे जण जमला होतात.”
“पुरे झाली कहाणी चला झोपा आता उद्या ऑपरेशन आहे उद्या काय ते कळेल” आईने आवाज दिला.
*******
दुसरे दिवशी आमच्या जेवणाची थोडीफार सोय करून आणि उरलेली सोय मला “जसे जमेल तसे कर” असे सांगून आई आणि निकेतन दादांना घेऊन पनवेलला डॉ. म्हात्रेकडे गेले. घरी मी आणि आजोबा.
मी आपल्या नेहमीच्या कामात म्हणजे टीव्ही बघणे, आजोबांना त्रास देणे वगैरे  तसेच आई नसल्याने जी काही कामे वाट्याला आली होती ती करत होती. याच काळात मी स्वयंपाक करायला शिकले पण जसा जसा वेळ जात होता तसे टेन्शन येत होते घरी फोन नव्हता त्यामुळे काही महत्वाचे असेल तरच कॉल येणार. तिकडे दादांचे ऑपरेशन इकडे रिझल्ट! निकाल ४ वाजता जाहीर होणार होता.
******
मी आजोबाना म्हटले कि  “ठीक आहे मी येते जाऊन मामाकडे.”
मामाच्या घरी गेली तर मामा नुकताच आला होता, मला बघितल्यावर म्हणाला “तुझा रिझल्ट आणायचा असेल ना? थांब १० मिनिटे मी जाऊन येतो”
“मामा नको, मी जाऊन आले, पास झाले मी.” मी म्हटले
“शाबास” मामा म्हणाला “दादांना ७ वाजता सोडणार आहेत. तुला दवाखान्याचा नंबर देऊ का?”
मी म्हटले “दे” त्याच्याकडून नंबर घेऊन त्या म्हात्रे हॉस्पिटलला फोन केला. रिसेप्शन वर निरोप देऊन आईला बोलावून घेतले आणि तिला विचारले कि दादा कसे आहेत, झाले का सगळे व्यवस्थित?” पलीकडून आईने  “हो” सांगितले. आणि मग माझ्या रिझल्टची चौकशी केली मी तिला सांगितले कि   मीच रिझल्ट आणला पास झाली आहे” “अभिनंदन” आई एवढेच म्हणाली आणि डॉक्टर बोलावत आहेत डिस्चार्ज देणार आहेत आता मी जाते.”
फोन ठेऊन मी घरी आले आणि आजोबाना घडलेला वृत्तांत कथन केला.
संध्याकाळी ७ च्या आसपास आई दादांना घेऊन आली. मग पुन्हा एकदा दादांच्या ऑपरेशनची चर्चा झाली कि “त्या वेळी फूटरेस्ट चा रॉड पायाच्या अंगठ्याच्या पुढे सरळ हाडापर्यंत आत घुसला होता किमान २ बोटे एकदम जातील अशी जखम झाली होती एक्सरे रात्रीच काढला होता पण रिपोर्ट सकाळी मिळणार होते नशिबाने हाडाला दुखापत झाली नव्हती. पायाची स्कीन हि फाटली होती. आणि आत थोडी माती गेली होती पूर्ण जखम आतून साफ करण्यासाठी ऑपरेशन करायला घेतले होते. नशिबाने त्यांना डायबेटिज नसल्याने जखम भरण्यास जास्त त्रास होणार नव्हता पण किमान ६ महिने पायाच्या पंजावर वजन टाकता येणार नव्हते. ह्याही पुढे जाऊन कळलेली हकीकत अशी कि त्याच ठिकाणी दादांच्या आधी दोन अपघात झाला होता आणि त्या केसस पण सेम हॉस्पिटलला आल्या होत्या, जिथे आता दादांना नेले होते पण ते दोघेही वाचले नाहीत  ह्या सगळ्या गडबडीत मी पास झाल्याचे पेढे आणायलाच झाले नाही. आज २०१४ चालू आहे पण १०वीचा निकाल जाहीर होणार असले कि हि आठवण हमखास येते. 




Comments

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!