मराठेशाहीतील मनस्विनी

पुस्तक: 
मराठेशाहीतील मनस्विनी
लेखक: 
डॉ. सु. र. देशपांडे
प्रकाशक: 
मेहता पब्लिशिंग हाउस 
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपल्या कर्तृत्वावर जोरावर भरारी घेताना दिसतात. स्त्रीमुक्ती कडे वाटचाल करणारी, आजच्या म्हणजे आधुनिक काळातील स्त्री ही अधिक धीट, अधिक स्वतंत्र, अधिक व्यापक क्षेत्रातील आव्हाने स्वीकारणारी आहे. आजच्या स्त्रीचे हे धडाडीचे व्यक्तिमत्त्व आपण आज कौतुकाने स्वीकारतो. पण अशाच धडाडीच्या, शूर आणि कर्तुत्ववान स्त्रिया तीनशे – चारशे वर्षापूर्वी ही होत्या. कट्टर पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील या स्त्रिया प्रवाह विरुद्ध जाण्याची धडाडी ठेवत. इतिहास शिकण्याच्या निमित्ताने ह्या स्त्रियांचा परिचय आपल्याला झाला असला तरी त्यांचे मूळ जीवनचरित्र माहिती नसल्याने त्यांच्या विषयी निर्माण झालेले प्रवाद आणि त्यांच्या कामगिऱ्याच स्मरणात राहतात.


राजघराण्यातील स्त्रिया म्हणजे नाजूक, परावलंबी असतात. महालापलीकडे त्यांचे जग नसते असा सर्वसाधारण गैरसमज असलेला दिसून येतो, पण मराठेशाहीतील काही स्त्रिया आपल्या वैध हक्कासाठी, कर्तव्यासाठी, मुलांसाठी, स्वराज्यासाठी संघर्ष करताना, वेळप्रसंगी जीवाची बाजी लावताना किंवा राजकीय कटकारस्थाने ही करताना दिसल्या. शिवमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, महाराणी जिजाबाई (करवीर), मस्तानी, गोपिकाबाई, आनंदीबाई, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई अशा ९ मनस्विनींचा विस्ताराने परिचय डॉ. सुरेश र. देशपांडे यांनी “मराठेशाहीतील मनस्विनी” या पुस्तकाद्वारे करून दिला आहे.

मराठेशाहीतील अस्सल ऐतिहासिक साधनांचा विशेषत: तत्कालीन पत्रांचा धांडोळा घेऊन या स्त्रियांचा परिचय देण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला असल्याने त्यांच्या विषयी नवी माहितीही आपल्याला या पुस्तकातून मिळते. राज वैभव पायाशी लोटांगण घालत असतानासुद्धा नियतीने प्रत्येकीच्या जीवनात अनेक खडतर प्रसंग उभे केले. या प्रसंगांच्या वेळची त्यांची सोशिकता, सहनशीलता, प्रसंगावधान आणि नियतीवर मात करण्याची जबरदस्त जिद्द व महत्त्वाकांक्षा त्यांच्या जीवनचरित्रातून पाहावयास मिळते.

जानेवारी १६६४ मध्ये शहाजीराजांचे अपघाती निधन झाल्यावर जिजाबाईंनी सती जाण्याचा दृढनिश्चय केला. धर्मशास्त्राचे काटेकोर पालन करणाऱ्या साम्राज्यात वाढलेल्या जिजाबाईंनी पुत्रासाठी व शहाजीराजांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वराज्याच्या ध्येयासाठी सती जाण्याचा निर्णय सोडून देण्याचा धडाडीचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर औरंगजेबाने बाटविलेल्या बजाजी निंबाळकरांना पुन्हा धर्मदिक्षा देवविली. यामुळे ब्राम्हणांनी मोठा गहजब केला पण त्याकडे साफ दुर्लक्ष करत बाजाजीच्या मुलाशी आपल्या नातीची सोयरीक घडवून आणली. असा प्रागतिक विचार करणाऱ्या जिजाऊ आपल्याला या पुस्तकाद्वारे भेटतात.

छत्रपती शिवाजी महाराजांची जेष्ठ सून, संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचे आदरस्थान अशा महाराणी येसूबाईंच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर क्वचितच आली असतील, महाराणी असूनही ऐन उमेदीचा काळ पारतंत्र्यात, तुरुंगात व्यतीत करणारी, खडतर जीवनाला सामोरी जाऊन राजकीय संक्रमणाच्या परिस्थितीत आपल्या पराक्रमी, पण तापट स्वभावाच्या पाठीमागे छायेप्रमाणे एकदिलाने उभी राहिलेली आणि आप्त स्वकीयांचा रोष सांभाळून आपल्या परीने चोख राज्यव्यवहार करणारी महाराणी येसूबाई देखील आपणाला या पुस्तकात भेटते.

एखाद्या मोठ्या साम्राज्याची स्नुषा होणं आणि त्या स्थानाचा अधिकार पेलणं ही गोष्ट सोपी नाही. त्यात महाराणी ताराबाई या साक्षात शिवछत्रपतींच्या स्नुषा. मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री ! शिवाजीराजे आणि संभाजीराजांच्या मागे कणखरपणे तिने राज्याची धुरा सांभाळली. विखुरलेल्या मराठी घराण्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा अथक प्रयत्न करणारी महाराणी ताराबाई; संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचं पान. युद्धक्षेत्र व राज्यकारभार या दोन्हींवर ताराबाईंनी जबरदस्त पकड बसविली होती. शक्य तितका किल्ला लढवून मनुष्यहानी टाळायची, शिबंदी संपत आली कि वाटाघाटी सुरु करून शत्रूला गुंतवून ठेवायचे. अनेक कठीण प्रसंगांनीही खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने आक्रमक भूमिका घेतली. मराठेशाहीतील मुसद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. नवऱ्याचा सहवास जेमतेम सात ते आठ वर्ष लाभलेल्या या महाराणीने जिद्द, जबरदस्त महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर औरंगजेब सारख्या बलाढ्य शत्रूला पण सळो कि पळो करून सोडले. पण हंबीरराव मोहित्यांच्या ह्या सेनापतीची ही कन्या; पण नशिबात मात्र नजरकैदच आली.

ताराबाईप्रमाणे त्यांची सावत्र सून करवीरची महाराणी जिजाबाईनेही कोल्हापूरच्या संस्थानाचा विकास, विस्तार करताना संस्थानाचे हित जपून, एकाच वेळी बलवान पेशव्यांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवून छत्रपती शाहूमहाराजांशी जवळीक साधली व कोल्हापूरच्या गादीचे रक्षण केले. जिजाबाई मुत्सद्देगिरीत चलाख होत्याच पण रणनीतीतही वाकबगार होत्या. राज्यकारभारातही त्यांचे बारीक लक्ष असे. देवदर्शनासाठी निघालेल्या जिजाबाईंनी आपल्या गैरहजेरीत भगवंतराव अमात्य यांना करवीर नगरीची व्यवस्था पाहण्याची आज्ञा दिली. भगवंतरावांनी नकार देताच या स्वाभिमानी महाराणीने “ आपण हे काम न केल्याने फार मोठी अडचण होईल असे समजू नये. हे काम सामान्य कुणबिणींकडून सुद्धा चालवता येईल,” असे भगवंतरावांना कळवून गंगू, रंगू, भागू, नागू आणि लिंगु या पाच सुज्ञ कुणबिणींकडून हे काम करवून घेतले. महिलांसाठी ही घटना म्हणजे प्रेरणा आहे.

उत्तर पेशवाईतील बखरकारांनी मस्तानी-आनंदीबाईसारख्या स्त्रियांना खलनायिका बनविले; मात्र तत्कालीन अस्सल पत्रव्यवहार आणि परिस्थितीजन्य पुरावा पाहता, या स्त्रियांवर इतिहासकारांनी अन्याय केल्याचे जाणवते. आनंदीबाईंना त्यांच्या जीवनात सुयोग्य जोडीदार लाभला असता तर पेशव्यांच्या कुळात ह्या शहाण्या व धूर्त स्त्रीने एक देशाभिमानी, कर्तबगार स्त्री म्हणून मान्यता मिळवली असती असे लेखकाचे म्हणणे आहे. याचा परामर्श लेखकाने तत्कालीन ऐतिहासिक दाखले देऊन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पेशव्यांच्या स्त्रियांपेक्षा अधिक प्रभावी असलेल्या गोपिकाबाई महत्त्वाकांक्षी आणि स्वाभिमानी होत्या. रघुनाथरावांनाही त्यांनी प्रायश्चित्त घेतल्यानंतरच भेट दिली. राजकारण, धूर्तपणा, माणसांची पारख आणि निर्भीडपणा या बाबतीत त्या कारभाऱ्यानंपेक्षा काकणभर भर सरस होत्या. देशी औषधींची, वनस्पतींची त्यांना चांगली जाण होती. कित्येकांना औषधोपचारासाठी त्या आपल्या वाड्यात थांबवून घेत. त्यांचे हे सामाजिक कार्य ही ह्या पुस्तकाद्वारे जाणून घेता येते.

अहिल्याबाई होळकर या मल्हारराव होळकरांच्या सून होत. मुलाचे मृत्युनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. भारतभरात त्यांनी अनेक मंदिरे, घाट बांधली वा त्यांचा जीर्णोद्धार केला. एक महान स्त्री जीची चांगली बुद्धी, चांगुलपणा व गुणांचे उदाहरण देता येउ शकते. अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. अहिल्याबाईचे असामान्य कर्तुत्वाने तिच्या रयतेचे तिने मन जिंकले, ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती. तिचे अलिकडच्या काळातील चरीत्रकार तिला 'तत्वज्ञानी राणी' असे संबोधतात.अशा या कर्तबगार राणीची भेट ही आपल्याला ह्या पुस्तकात होते.

"मेरी झांसी नाही दुंगी" म्हणत , हातात तळपती समशेर घेऊन रणांगणावर शत्रू सैन्यावर झेप घेणारी झाशीची शूर राणी लक्ष्मीबाई हिचे नाव प्रत्येक भारतीयांच्या जिव्हाग्रावर नाचत आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य- संग्रामातील तिच्या धडाडीने, पराक्रमाने प्रतिस्पर्धी इंग्रजी सेनापतीनाही मुग्ध करून टाकले होते. झाशीच्या राणीच्या योग्यतेचे पाच -दहा सेनापती जर क्रांतीकारकांच्या पक्षात असते तर या युद्धात इंग्रजी सत्तेचा कायमचा विनाश झालेला दिसला असता. अशा ही झाशीची राणी काही नवीन पैलुंसह या पुस्तकाद्वारे आपल्या समोर येते.

राजघराण्यातील या तथाकथित अशिक्षित स्त्रिया बुद्धीच्या आणि कर्तुत्वाच्या दृष्टीने आजच्या आधुनिक स्त्रीयांच्याही चार पावले पुढेच होत्या याचा प्रत्यय येतो. त्या काळातही स्त्रियांचे विचार किती पुरोगामी होते हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

 

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!