डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक


पुस्तक: 
डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक
लेखक: 
अ‍ॅन फ्रँक, मंगला निगुडकर
प्रकाशक: 
मेहता प्रकाशन
आज कितीतरी दिवसांनी मनाला भिडणारे पुस्तक वाचले. “ मंगला निगुडकर यांनी अनुवादित केलेले “डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक” हे पुस्तक मार्च १९८८ ला प्रथम प्रसिद्ध करण्यात आले. प्रत्यक्षात हि डायरी “Het Achterhuis” १९४७ साली डच भाषेत तर १९५२ साली इंग्रजी भाषेत “अ‍ॅन फ्रँक – द डायरी ऑफ ए यंग गर्ल” या नावाने प्रकाशित झाले नंतर ते इतके गाजले कि, जवळ-जवळ प्रत्येक भाषेत त्याची भाषांतरे झाली आहेत.
असे काय आहे ह्या डायरीत? असा तुम्हाला प्रश्न पडेल. मलाही पडला. पुस्तक वाचायला लागल्यावर अगदी मग्न झाले. अ‍ॅन फ्रँक हि हॉलंड मध्ये राहणारी १२ वर्षाची मुलगी होती. तिने आपल्या या डायरीचे नाव “किटी” ठेवले होते. १४ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ या २ वर्षाच्या काळात तिने डायरीमध्ये जे उतरवले आहे ते या पुस्तकात दिले आहे. त्यानंतर तिने डायरी लिहिणे बंद केले का ?? नाही! पण १ ऑगस्ट १९४४ रोजी तिने जे डायरीत लिहिले ते तिचे शेवटचे लिखाण होते. कारण ४ ऑगस्टला तिच्या संपूर्ण कुटुंबाला जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्या नाझी सैनिकांनी पकडले. अ‍ॅन फ्रँक चे कुटुंब ज्यू होते. त्यामुळे नाझी सैनिकांनी त्यांना पकडून नेले. एका रेल्वेत हजारो ज्यु कोंबून पोलंड ला पाठविण्यात आले. त्यात अ‍ॅन फ्रँक, तिचे आई-वडील, बहिण होते. पोलंड मध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना वेगळे करण्यात आले. त्या क्षणानंतर अ‍ॅन ने आपल्या वडिलांना पुन्हा काही पहिले नाही. क्रूर नाझी सैन्याच्या छळामुळे अ‍ॅनची आई वेडी होऊन वारली. मार्च १९४५ मध्ये अ‍ॅन आणि तिची बहिण मारगॉट खंगून – खंगून मृत्युमुखी पडल्या. अ‍ॅन वारली तेव्हा फक्त १५ वर्षाची होती. या संपूर्ण कुटुंबात अ‍ॅनचे वडील ऑटो फ्रँक जिवंत राहिले. दुसरे महायुद्ध संपून हिटलरचा पराभव झाल्यावर रशियन सैन्याने ज्यूंना सोडविले त्यात ऑटो फ्रँक सुटले.
४ ऑगस्ट ला त्या गुप्तनिवासात लपून रहिलेल्या ८ लोकांना पकडण्यात आले तेव्हा मिएप गाईस व बेप या दोन ऑफिस सेक्रेटरींना अ‍ॅनच्या रोजनिशीचे कागद जमिनीवर विखरून टाकलेले सापडले. मिएप ने ते सर्व गोळा करून मेजच्या खणात सुरक्षित ठेवून दिले. युद्धासामाप्तीनंतर, अ‍ॅन वारल्याचे तिला कळले तेव्हा तिने त्या दोन्ही रोजनिश्या अ‍ॅनचे वडील ऑटो फ्रँक यांच्या स्वाधीन केल्या. त्यानंतर आपल्या कुटुंबाची स्मृती म्हणून त्यांनी अ‍ॅन च्या डायरीचे झेरॉक्स काढून वाटायला सुरुवात केली. ती डायरी इतकी लोकप्रिय झाली कि, एका प्रकाशकाने जून १९४७ मध्ये तिची डायरीच पुस्तक रुपाने प्रसिद्ध केली. अ‍ॅनची इच्छा होती कि युद्ध संपल्यानंतर आपल्या या रोजनिशीच्या आधाराने एक पुस्तक छापायचे. आणि तिच्या मृत्युनंतर खरोखरच तिच्या रोजनिशीचे पुस्तकात रुपांतर झाले.
१९४२ ते १९४५ म्हणजे दुसर्याु महायुद्धाच्या काळात जर्मनीचा हुकुमशहा हिटलर जग पादाक्रांत करायला निघाला होता. पोलंड, फ्रांस चुटकीसरशी पायाखाली तुडवत तो रशियावर चाल करून गेला. हिटलरला ज्यू लोक तर नजरेसमोरही सहन होत नव्हते. हिटलरच्या लष्कराने ज्यूंचे अनन्वित क्रूर हाल करीत त्यांना तीळ – तीळ मारले. लाखो ज्यूंनी मरण यातना भोगल्या. ज्यू दिसला कि नाझी सैनिक त्याला उचलून न्यायचे. मग रात्र असो वा दिवस, लहान मुल असो, गर्भार महिला असो किंवा वृद्ध असोत दयामाया नव्हतीच. महिलांना, मुलांना, भुकेलेल-तहानलेले ठेवून कष्ट करायला लावून ठार केले जायचे. धडधाकट तरुणांना युद्धावर पाठवले जात असे आणि पुरुषांना सरळ गॅस चेंबर होता, विषारी गॅस सोडून हजारो ज्यूंची एकाच वेळी कत्तल केली जात होती.
अशा या काळात अ‍ॅन फ्रँक चे कुटुंब, व्हॅनडॅन कुटुंब आणि दंतवैद्य डॉ. डसेल असे ८ ज्यू एका पोटमाळ्यावर जाऊन लपले. एक- दोन महिने नव्हे तर तब्बल २ वर्षे हे ८ जण पोटमाळ्यावर कसे राहिले असतील ह्याचे वर्णन त्या डायरीत केले आहे. बाहेर पडता येत नव्हते. अंधार पडला कि वरच्या खिडकीतून डोके बाहेर काढून निसर्ग बघायचा एवढाच काय तो बाहेरच्या जगाशी संबध होता.
जेवायला दिवसरात्र बटाटे आणि वाल, सडक्या भाज्या कधीतरी मांस किंवा लोणी असायचे, मनोरंजन म्हणजे फक्त रेडिओ तो ही संध्याकाळी लावायचा खालच्या गोदामात आवाज जाऊन कामगारांना संशय येऊ नये म्हणून दिवसभर शांत राहायचे त्यांची मैत्रीण मिएप त्यांना बाहेरून पुस्तके आणून द्यायची हाच दिलासा होता. त्या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सामान्य माणसाचे आणि विशेषतः ज्यूंचे काय हाल झाले ह्याचे चित्रच त्या डायरीतून उभे राहते.
मिएप पुस्तके घेऊन आली कि, या कुटुंबाना बाहेरच्या जगाची माहिती मिळत असे. बाहेर तर अराजक माजले होते. नोकर्‍या,काम, उद्योगधंदे बंद पडले होते. कोणाकडे पैसे राहिले नव्हते प्रत्यक्षात अ‍ॅन फ्रँक व कुटुंबीय ज्या पोटमाळ्यावर राहत होते त्याच्या खालच्या गोदामात ही चोर्‍या झाल्या होत्या. ज्यूंना पकडून नेले जात होते त्यामुळे अनेक घरे ओस पडली होती. अशा घरातील वस्तू चोरीला जात होत्या. गरिबांना अन्न नव्हते, पांघरायला कपडा नव्हता. लहान मुले पावाच्या तुकड्यासाठी रस्तोरस्ती फाटक्या कपड्यांनी हिंडायची त्यात नाझी सैनिक आले तर त्या इवल्या जिवांनाही फरफटत नेले जायचे ज्यूंची रेशनकार्ड रद्द केली होती. मात्र ब्लॅकमार्केट मध्ये दुप्पट भावला ही कार्ड मिळायची. ही कार्ड मिळवण्यासाठी चढाओढ सुरु होती.
ज्यू लोकांची माहिती देईल त्याला प्रत्येक ज्यू माणसाच्या मागे दीड डॉलर या प्रमाणे बक्षीस ही जाहीर झाले होते. अ‍ॅन फ्रँक आणि तिच्याबरोबरचे सात जण दोन वर्ष पोटमाळ्यावर लपून राहिले आपण कधीही पकडले जाऊ याची भीती, पुरेसे अन्न नाही, कपडे नाहीत, बॉम्ब वर्षावात सतत पोटमाळा थरथरायचा, स्वातंत्र्य नाही अशा स्थितीत राहून त्यांना वेड लागायची वेळ आली होती. अ‍ॅन मात्र मोठ्या जिद्दीने उत्साही राहत होती. ४ ऑगस्टला कुणीतरी नाझी सैनिकांना पोटमाळ्यावर लपलेल्या या आठजणांची माहिती दिली. या बक्षिसाच्या पैशाने तो खबरी जगाला असेल, पण या आठ जणांचे आयुष्य तेथेच संपले.
१२ वर्षाच्या अ‍ॅन ने ३ मे १९४४ रोजी आपल्या डायरीत लिहिले –
लढाईचा उपयोग काय आहे? इतका विध्वंस कशासाठी? माणसे एकत्र शांततेत राहू शकत नाही का? या जगाच्या काही भागात अन्न इतके विपुल आहे कि सडते आहे आणि दुसऱ्या भागात लोक अन्नावाचून तडफडत आहेत असे का? ही लढाई केवळ राजकारणी, नेते आणि भांडवलदारांमुळे होते हे खरे नाही. या लढाईला सामान्य माणूस तितकाच जबाबदार आहे. कारण त्याला लढाई नको असती तर त्यांनी एकत्र येऊन लढाई विरुद्ध उठाव केला असता. पण तो तसे करीत नाही. सत्य हे कि, प्रत्येक माणसाच्या अंगीच विध्वंस आणि हिंसाचाराची ओढ आहे. नष्ट करण्यात, खून करण्यात त्याला आसुरी आनंद मिळतो. समस्त मानवात अमुलाग्र बदल झाला तरच हा विध्वंस टळेल. तोपर्यंत लढाया होत राहतील.
अ‍ॅनचे हे उद्गार आजही तितकेच सत्य आहेत. आणि म्हणूनच अ‍ॅन म्हणाली त्याप्रमाणे तिच्या मृत्यूनंतही तिच्या शब्दांच्या सामर्थ्याने ती अजरामर राहिली. पूर्ण पुस्तक वाचताना कोठेही जाणवत नाही कि अनुवादित आहे. प्रत्यक्ष अ‍ॅन आपल्याशी बोलत आहे. त्या वेळचे पूर्ण चित्रच डोळ्यासमोर उभे राहते.


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!